Amaravati Agriculture News : राज्यस्तरीय कुक्कुट समन्वय समितीची (Poultry Coordination Commieettee) बैठक तब्बल पाचवेळा रद्द करण्यात आली. यामुळे समिती सदस्यांना नाहकचा मानसिक त्रास सहन करावा लागला.
सोबतच पुणे-मुंबईवारीसाठी प्रवासावरही त्यांचा खर्च झाला. मात्र याबाबत खुद्द पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe Patil) अनभिज्ञ असल्याचे समोर आले आहे.
मंत्री राधाकृष्ण विखे हे सोमवारी (ता.२७) अमरावती दौऱ्यावर होते. या वेळी कुक्कुट समन्वय समितीच्या बैठका समिती सदस्यांना प्रवासात रद्द झाल्याचे व्हॉटसॲप, संदेशाद्वारे कळविण्यात येत असल्याबाबत विखे यांना विचारण्यात आले. गेल्या दोन महिन्यांत अशाप्रकारे पाच बैठका ऐनवेळी रद्द करण्यात आल्या. यामुळे सदस्यांचा वेळ, पैसा खर्ची होतो.
विदर्भातून या समित्यांवर शुभम महल्ले, अतुल पेरसपूरे, रवींद्र मेटकर या तिघांचा समावेश आहे. राज्याच्या इतर भागांतील पोल्ट्री व्यवसायिकांना देखील यावर प्रतिनिधित्व देण्यात आले आहे.
मात्र बैठक रद्द होत असल्याने प्रवासावर नाहक खर्च होतो. वेळ वाया जातो ते वेगळेच. पशुसंवर्धन विभागाचे कोणतेच नियोजन नसल्याने या बैठका सातत्याने रद्द करण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवत आहे.
अशातच त्यांच्याकडून कोणताही परतावा मिळत नसल्याने हा नाहकचा भुर्दंड समिती सदस्यांना बसत आहे.
पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मात्र बैठक रद्दच झाल्या नसल्याचा दावा केला. ऐनवेळी पशुसंवर्धन मंत्री म्हणून मी उपस्थित नसलो तरी पशुसंवर्धन आयुक्त ही बैठक घेतात. त्यामुळे असा कोणताच प्रकार झाला नसल्याचे त्यांनी सांगितले.
सप्टेंबरमध्ये लम्पी स्कीनची लस
पुणे येथील प्रयोगशाळेत लम्पी स्कीन प्रतिबंधक पहिल्या लसीचे उत्पादन होणार आहे. सप्टेंबरपर्यंत ती राज्यासह देशात उपलब्ध करून दिली जाईल. या लसीच्या उत्पादनासाठी महाराष्ट्रातील प्रयोगशाळेला मान्यता दिली आहे. केंद्र सरकारने ७५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.