Bhujal Department : कोरडवाहू उत्पादनवाढीसाठी ७ हजार हेक्टरवर पथदर्शी प्रकल्प

Dry Land Agriculture : कोरडवाहू भागातील शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी भूजल विभागाच्या अटल भूजल योजनेअंतर्गत पावले उचलण्यात येत आहेत.
Bhujal
BhujalAgrowon
Published on
Updated on

Pune News : कोरडवाहू भागातील शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी भूजल विभागाच्या अटल भूजल योजनेअंतर्गत पावले उचलण्यात येत आहेत. त्यासाठी भूजल विभागाने प्रायोगिक तत्त्वावर राज्यातील सात कोरडवाहू गावांची निवड केली आहे.

एका गावांतील एक हजार हेक्टरवर पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येईल. या भागातील माती, हवामान, भूजल पातळी, भूस्तर, पाऊस यांचा शास्त्रीय व समग्र अभ्यास करून या भागातील पिकांची उत्पादकता वाढल्यास शेतकरी विकासाच्या दिशेने वाटचाल करतील, अशी अपेक्षा आहे.

शेतकऱ्यांना सहकार्य करण्यासाठी हैदराबाद येथील इक्रिसॅट आणि भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा यांच्यात पुण्यात नुकताच सामंजस्य करार करण्यात आला. या करारामुळे कोरडवाहू भागातील नैसर्गिक संसाधनांचा शास्त्रीय अभ्यास करून पिकांची निवड करणे, शेतीमध्ये संशोधन करून पिकांचे व्यवस्थापन करणे, गावाचा आणि शेतकऱ्यांचा शाश्‍वत विकास करणे यासाठी ‘इक्रिसॅट’ भूजल सर्वेक्षण विभागाला सहकार्य करेल.

Bhujal
Bhujal Punarbharana : भूजल पुनर्भरणासाठी उपयुक्त नकाशे मोफत उपलब्ध

करारानुसार, या प्रकल्पांतर्गत वेगवेगळ्या भागातील पाण्याचे दुर्भिक्ष असणारी कोरडवाहू भागातील १ हजार हेक्टरची ७ गावे निवडली आहेत. ‘इक्रिसॅट’चे विविध विषयातील २० शास्त्रज्ञ, विषयतज्ञ या गावांना भेट देऊन त्यांची गरज ओळखतील.

माती परीक्षण, भूस्तर, पाऊस याचा अभ्यास करून गावामध्ये कोणत्या प्रकारची पीकपद्धती राबवायची याचे सर्वेक्षण करतील. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतील. पीक काढणी, प्रक्रिया, विक्री व्यवस्था असे सुरुवातीपासून शेवटपर्यंत परिपूर्ण मार्गदर्शन करतील, असे नियोजन आहे.

Bhujal
Atal Bhujal Yojana : ‘अटल भूजल’द्वारे जिरणार १६ कोटी लिटर पाणी

मार्च २०२५ पर्यंत अंमलबजावणी :

प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे. या प्रकल्पांतर्गत मुख्यत्वे: ७ घटकांची मार्च २०२५ पर्यंत प्रकल्पांतर्गत निवडलेल्या ७ गावांमध्ये ‘इक्रिसॅट’च्या मदतीने अंमलबजावणी करण्यात येईल.

उत्पादनवाढीसाठी निवडलेली गावे :

जिल्हा-गावे (कंसात तालुका)

पुणे-चांबळी (पुरंदर),

सोलापूर-भेंड (माढा)

नाशिक-घोरवड (सिन्नर)

लातूर-माटेफळ (लातूर)

जालना-मसेगाव (घनसांगवी)

बुलडाणा- उबारखेड (मोताळा)

नागपूर-खुर्सापार (काटोल)

करारामुळे कोरडवाहू क्षेत्रातील पीक व्यवस्थापनाला नवी दिशा मिळेल. या भागाला ऊर्जितावस्था प्राप्त होण्यासाठी साह्य होईल. या प्रकल्पांतर्गत ‘मॉडेल व्हिलेज’ तयार होतील. ती कोरडवाहू शेतीसाठी दिशादर्शक ठरतील.
- चिंतामणी जोशी, आयुक्त, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, पुणे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com