Bhujal Punarbharana : भूजल पुनर्भरणासाठी उपयुक्त नकाशे मोफत उपलब्ध

Groundwater Survey : पाणलोट क्षेत्र हा मूलभूत घटक धरून भूजल पुनर्भरण प्राधान्यक्रमाचे नकाशे तयार करण्यात आले आहेत. या नकाशांचा वापर शासकीय यंत्रणा, कृषी यंत्रणा, ग्रामपंचायतींना करता येणार आहे.
Bhujal
Bhujal Agrowon

सतीश खाडे

प्रत्येक गावाचा एक गाव नकाशा असतो. त्यात गावातील क्षेत्राचे गट नंबर, सर्व्हे नंबर, तलाव, ओढे, डोंगर, पाणथळ जागा अशा विविध गोष्टींची नोंद केलेली असते. हे नकाशे बऱ्याच काळापासून उपलब्ध आहेत.

याचप्रमाणे आता ‘महाराष्ट्राच्या भूजल सर्वेक्षण (Groundwater Survey) आणि विकास यंत्रणा’ (GSDA) आणि ‘महाराष्ट्र सुदूर संवेदन व उपाययोजना केंद्र’ या यंत्रणांनी उपग्रहाद्वारे घेतलेली छायाचित्रे (सॅटेलाईट इमेज) आणि जमिनीवर प्रत्यक्ष सर्वेक्षण करून मिळविलेली माहिती यांचे एकत्रीकरण करून पाणलोट क्षेत्र हा मूलभूत घटक धरून भूजल पुनर्भरण प्राधान्यक्रमाचे नकाशे बनविले आहेत.

हे नकाशे भूजल पुनर्भरणाच्या विविध उपाययोजना या अधिक अचूक व तांत्रिकदृष्ट्या परिणामकारक होण्यासाठी तयार करण्यात आलेले आहेत. हे नकाशे जीएसडीएच्या संकेतस्थळावर (gsda.maharashtra.gov.in) सर्वांसाठी मोफत उपलब्ध आहेत.

या नकाशांमध्ये विविध रंगांचा वापर करण्यात आलेला आहे. रंगांवरून सदर क्षेत्र भूजल पुनर्भरणाकरिता कितपत उपयुक्त आहे याची माहिती देण्यात आलेली आहे.

Bhujal
Water Shortage : रत्नागिरीत भूजल पातळीत कमालीची घट

भूजल पुनर्भरण प्राधान्यक्रम नकाशातील रंग :

१) निळा रंग :

यास हाय प्रायॉरिटी सेक्टर (high priority sector) असे म्हणतात. या क्षेत्रात भूजलाची उपलब्धता अधिक असते. ती कायम राहण्यासाठी मुख्यत: नालाबांध, चेक डॅम, विहीर पुनर्भरण, बोअरवेल रिचार्ज यासारख्या उपाययोजना करण अपेक्षित असते.

२) पिवळा रंग :

या भागात भूजलाची उपलब्धता ही साधारण असते. पुनर्भरणासाठी हा भाग खूप उपयुक्त असतो. येथे मुख्यतः नालाबांध, पाझर तलाव, पुनर्भरण खड्डा, शेततळे अशा उपाययोजनांचा सल्ला दिला जातो.

३) गुलाबी किंवा फिक्कट जांभळा रंग :

या ठिकाणी भूजलाची उपलब्धता अत्यंत कमी असते. नालाबांध, पुनर्भरण खड्डा, शेततळे या प्रकारच्या उपाययोजनांचा करण्याचा सल्ला दिला जातो.

४) लाल रंग :

इथे भूजलाची उपलब्धता अतिशय कमी असते. तसेच हा भाग पुनर्भरणास अयोग्य समजला जातो. समतल चरासारखेच उपाय( तेही ठराविक ठिकाणीच शक्य )

५) तपकिरी रंग :

पुनर्भरणास अयोग्य पण मृदसंधारणास योग्य. या नकाशांचा वापर शासकीय यंत्रणा, कृषी यंत्रणा यांनी करणे अपेक्षित आहेच. पण, त्याचबरोबर ग्रामपंचायत, लोकसमूहाबरोबरच वैयक्तिक पातळीवरील याची उपयुक्तता मोठी आहे.

यातून रिचार्ज झोन (पुनर्भरण क्षेत्र) डिस्चार्ज झोन (भूजल उपलब्धतेचे क्षेत्र) याची माहिती उपलब्ध होते. पिवळा रंग हा पुनर्भरणास योग्य क्षेत्र असल्याचे दर्शवितो.

- हे नकाशे गाव नकाशे त्यातील सर्व्हे नंबर, गट नंबर यांच्यासोबत जुळवून आपल्या शेतात कोणत्या उपाययोजना करता येतील हे निश्चित करता येते. तसेच सार्वजनिक जमीन (उदा. गायरान) येथे पुनर्भरणासाठी काय उपाय करता येईल याचेही नियोजन करता येईल.

- ग्रामसभा, ग्रामपंचायत यांनी या नकाशातील माहितीच्या आधारे गावपातळीवर जलसंवर्धनासाठी विविध विकासकामे करता येतील. उदा. पिवळा झोन असलेल्या जागेवर पाझर तलाव तसेच ओढ्यावर बंधारा बांधल्यास तिथेच पाणी जिरवण्यासाठी खूप अनुकूलता आहे. तसेच पिवळ्या झोनमधील शेतकऱ्यांनी सामूहिकरीत्या शेतात पाणी जिरवण्यासाठी उपाययोजना केल्यास त्याच नक्कीच फायदा होईल.

- विविध भूजल विषयांसाठीचे निर्णय व योजना यांची आखणी करताना या नकाशांचा मोठा उपयोग होतो. कोणालाही सहज समजतील अशा सोप्या पद्धतीने नकाशे बनविण्यात आले आहेत.

वैयक्तिक पातळीवर भूजल पुनर्भरणाचे पर्याय :

१) विहीर पुनर्भरण, २) बोअरवेल पुनर्भरण ३) शोषखड्डे ४) शोष चर ५) रिचार्ज शाफ्ट

१) विहीर व बोअरवेल पुनर्भरण :

विहीर व बोअरवेल पुनर्भरण हा बऱ्यापैकी सर्वांना माहिती असलेला उपाय आहे. विहीर किंवा बोअरवेल पुनर्भरणासाठी शेतात जमा होणारे पाणी वापरले जाते. मात्र, याशिवाय विहीर व बोअरवेलच्या जवळून वाहणाऱ्या ओढा किंवा नदीचे पाणी पंप करून फिल्टर मीडिया वापरून पुनर्भरण करता येते.

अशावेळी फिल्टर टॅंकचा आकार मोठा असावा. कारण, पंपाने येणाऱ्या पाण्याचा वेग बोअरवेलचा पाणी शोषण्याच्या वेगापेक्षा अधिक असतो.

२) शोषखड्डे :

शेतामध्ये पावसाचे पाणी काही ठिकाणी जमा होऊन तेथेच सुकून वाया जाते. अशा जागांमध्ये जमा होणाऱ्या पाण्याचा अंदाज घेऊन तेथे गरजेनुसार खड्डे घ्यावेत. खड्डा घेताना वर उल्लेख केलेल्या रंगीत नकाशांचा आधार घ्यावा.

खड्ड्यामध्ये दगड आणि वाळूची गाळणी तयार करावी. दगड वाळूच्या गाळणीत (filter media) लहान-मोठे तसेच जाड आणि बारीक वाळू यांचा वापर केला जातो.

Bhujal
Ground Water Level : परभणी जिल्ह्यातील भूजल पातळीत खालावली

३) शोष चर :

- नकाशाचा संदर्भ घेऊन शेतात एक किंवा अधिक चर काढून त्यात छोट्यामोठ्या दगडांची गाळणी करावी. त्यावर दीड फूट माती टाकावी, जेणेकरून चरामुळे शेतातील जागा वाया जाणार नाही. आणि त्याजागी पीक लागवड करून जागा वाया न जाऊ देता पाणी जिरवणे शक्य होईल.

- शेतात पावसाचे तसेच पाट पाण्याचे जास्तीचे पाणी यातून जमिनीत मुरेल. काही शेतकरी या चरांचा उपयोग शेतातील फांद्यायुक्त काडी कचऱ्याचे खत करण्यासाठी करतात. या खतातून शेतातील कर्ब वाढीस मदत होते. म्हणजेच या एकाच उपायातून जल पुनर्भरण अन् कंपोस्ट खत असे दोन्ही उद्देश साध्य होतात.

४) रिचार्ज शाफ्ट :

- शेतात, ओढ्यात, तळ्यात, बंधाऱ्यात करता येतो. रिचार्ज शाफ्ट म्हणजे जमिनीवरचे पाणी जमिनीत खोलवर ड्रील मारून खालच्या सछिद्र खडकाच्या थरात सोडणे. यात बोअरवेल सारखेच ड्रील केले जाते. या ड्रीलच्या तोंडावर फिल्टर चेंबर बांधून त्यात फिल्टर मीडिया (दगड वाळूची गाळणी) भरतात.

वाळूचे विविध स्तर ओढ्याचे व तळ्यातील पाणी गाळून बोअरवेलमधून खालच्या खडकांमध्ये जाऊन तिथे साठून राहण्यासाठी ही उपाययोजना केली जाते. हेच पाणी भूजल पातळी वाढविण्यास मदत करते. त्यातून आजूबाजूच्या विहिरी, बोअरवेलची पाणी पातळी वाढण्यास मदत होते. हेच पाणी जमिनीवर राहीले तर त्याचे बाष्पीभवन होते.

- ओढे, तलाव यातील जमिनीवर साठवलेल्या पाण्याचा वापर हा फक्त आजूबाजूच्या शेतकऱ्यांना अधिकाधिक होतो. मात्र, रिचार्ज शाफ्ट सारख्या उपाययोजनांमुळे जलधर अधिकाधिक भागात पसरत जाऊन दूरपर्यंत पाणी उपलब्ध होते. ‘भूजल पुनर्भरण प्राधान्यक्रम नकाशांचा’ संदर्भ घेऊन ‘पुनर्भरण क्षेत्र’ पिवळा व निळ्या रंगाचे क्षेत्र पाहून रिचार्ज शाफ्ट घ्यायला हवा.

घ्यावयाची खबरदारी :

या पद्धतीच्या मदतीने भरपूर पाणी भूजलाच्या रूपात साठवले जात असले तरी काही खबरदारी घेणे आवश्यक आहे. ती पुढीलप्रमाणे..

- फिल्टर मीडिया म्हणजेच वाळूमध्ये गढूळ पाण्यातील माती अडकून तो गच्च होतो. त्यासाठी दरवर्षी ही वाळू बाहेर काढून स्वच्छ करून पुन्हा फिल्टर चेंबरमध्ये टाकावी लागते, अन्यथा पाणी खाली जाण्याची क्रिया बंद होते किंवा माती मिश्रित पाणी खाली बोअरच्या होलमधून खडकांच्या भेगांपर्यंत जाते. आणि भेगांमध्ये माती अडकून भेगा बुजण्याची शक्यता असते.

परिणामी, जलधराची पाणी साठवण क्षमता, पाणी मुरण्याची क्षमता संपून जाते आणि तो जलधर कायमचा निकामी होतो.

- अभ्यासकांच्या मते भूजल शास्त्र हे शरीरशास्त्रा प्रमाणेच आहे. शरीरात विना अडथळा रक्त प्रवाहित होणे जसे आवश्यक आहे. अगदी तसेच पाणी साठवणे आणि पाण्याचा प्रवाह चालू असणे, हा जलधर जिवंत राहण्यासाठी गरजेचे आहे.

यासाठी पुढील सोपी उपाययोजना कामी येईल. याठिकाणी तीन ते चार फिल्टर चेंबर बांधावेत. या चेंबरमध्ये नायलॉनच्या जाड दोरापासून बनविलेल्या जाळ्या ठेवून त्यात फिल्टर मीडियाचा थर बनवावा. त्यानंतर जाळीचे तोंड बांधून हूक बसवावा.

यामुळे फिल्टर मीडिया स्वच्छ करतेवेळी या जाळ्या क्रेन किंवा जेसीबीच्या मदतीने वरती उचलून वाळू स्वच्छ करता येते. अशाप्रकारे नियोजन केल्यास फिल्टर मीडिया स्वच्छ ठेवणे सहज शक्य होते. पाणी उपलब्धतेसाठी वर्षातून किमान एक वेळ ही क्रिया करावी लागेल.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com