
Washim News : आपल्या परिवाराच्या पोषणाची जबाबदारी महिलांवर असते, त्यामुळे महिला परिवारातील सदस्यांना सकस आहार कसा मिळेल याकडे सातत्याने लक्ष देतात. विशेषतः महिलांना सुरक्षा गटांमार्फत बहुस्तरीय एक पद्धतीचा अवलंब करून परसबाग निर्मिती व त्यामधून गटातील महिलांना विविध भाजीपाला व फळे उपलब्ध व्हावीत, यासाठी महिला पुढे येत आहेत, ही समाधानाची बाब आहे, असे प्रतिपादन आत्मा प्रकल्प संचालक अनिसा महाबळे यांनी केले.
मंगळवारी (ता.८) कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेअंतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी अध्यक्ष म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक डॉ. प्रशांत घावडे होते.
जिल्ह्यातील सहा तालुक्यांतून महिलांचे अन्नसुरक्षा गटाचे प्रत्येकी १६ गटाप्रमाणे जिल्ह्यात ९६ महिला अन्नसुरक्षा गटांची स्थापना करण्यात आली आहे. संबंधित शेतकरी गटातील प्रतिनिधी महिला या प्रशिक्षणास उपस्थित होत्या. कार्यक्रमाचा उद्देश आणि मल्टीलेयर फार्मिंगमध्ये घेतल्या जाणाऱ्या विविध भाजीपाल्याचे व फळझाड लागवड पद्धती आणि विविध फळझाडे, औषधी वनस्पतींचे आहारातील महत्त्व याविषयी जयप्रकाश लव्हाळे यांनी माहिती दिली.
आत्मा अंतर्गत अन्नसुरक्षा गटास भाजीपाला रोपे, बियाणे, फळझाडे रोपे साहित्य उपलब्ध करून देण्यात येत असून ते उत्कृष्ट दर्जाचे असल्याने सदर भाजीपाला हा योग्य पद्धतीने लावून त्याचा सदुपयोग घ्यावा, असे डॉ. प्रशांत घावडे म्हणाले. आत्मा प्रकल्प उपसंचालक तथा स्मार्ट नोडल अधिकारी संतोष वाळके, स्मार्ट योजनेच्या पुरवठा व मूल्य साखळी विकास तज्ज्ञ अनुजा कोळी, प्रकल्प विशेषज्ञ (पोकरा) प्रदीप गुट्टे यांची या कार्यक्रमास उपस्थिती होती. सूत्रसंचालन तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक जयप्रकाश लव्हाळे यांनी केले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.