
Jalgaon News : उष्णतेच्या लाटेत कमी झालेली खानदेशातील पपईची आवक मागील काही दिवसांत काहीशी वाढली आहे. पपईचे दर सध्या शेतकऱ्यांना जागेवर १२ ते २० रुपये प्रतिकिलो मिळत आहेत.
पपई उष्णतेत सेवन करणे ग्राहक टाळतात. थंड प्रदेशात याची मागणी असते. अर्थात खानदेशात ऑक्टोबर ते फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत पपईची आवक जोमात असते.
यंदा ऑक्टोबर ते नोव्हेंबर अखेरीस प्रतिदिन सरासरी ८० ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) एवढी पपईची आवक होती. या काळात प्रतिकिलो सरासरी ११ रुपये प्रतिकिलोचा दर थेट खरेदीत शेतकऱ्यांना मिळाला. डिसेंबर ते फेब्रुवारी अखेरीस प्रतिदिन सरासरी १२० ट्रक पपईची आवक झाली.
या काळात दर कमी-अधिक झाले. डिसेंबरमध्ये दर दबावात होते. कारण या काळात आवक अधिक होती. परंतु जानेवारीच्या मध्यानंतर आवक कमी झाली. ती फेब्रुवारीतही कमीच होती. यामुळे या दरम्यान दर स्थिर होते.
यंदा मार्चमध्येही फारशी उष्णता नव्हती. यामुळे पपईला मार्चमध्येही उठाव होता. परंतु पपईचे पीक हवे तसे उत्पादनक्षम राहिले नाही. फक्त काही वाणांचे पीक उत्पादनक्षम होते. या क्षेत्रातून आवक सुरू होती. मार्चमध्ये प्रतिदिन सरासरी ४० ट्रक पपईची आवक झाली. पण एप्रिलमध्ये आवक आणखी घटली आणि या महिन्यातील आवक तोकडी सरासरी १३ ट्रक राहिली.
पपईचे दर मार्चमध्ये १० रुपये प्रतिकिलो सरासरी राहिले. एप्रिलमध्ये दर कमी झाले. त्यात नंतर सुधारणाच झाली नाही. मध्यंतरी आवक अल्प होती. मे ते जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यापर्यंत प्रतिदिन १५ ट्रक (एक ट्रक १२ टन क्षमता) आवक झाली. परंतु मागील आठवड्यात आवक प्रतिदिन १८ ट्रक झाली आहे. आवकेत काहीशी वाढ झाली आहे.
सध्या आगाप लागवडीच्या बागा व दीर्घ काळ उत्पादन देणाऱ्या पपईच्या बागांमधून आवक सुरू आहे. पाठवणूक दिल्ली, पंजाब येथे केली जात आहे. दरही स्थिर आहे. जून ते जुलैदरम्यान पपईला थेट जागेवर १५ रुपये प्रतिकिलोचा दर मिळाला.
या काळात आवक नंदुरबारमधील तळोदा, शहादा, धुळ्यात शिरपूर, जळगावमधील चोपडा, धरणगाव, एरंडोल, पाचोरा, जामनेर या भागात होती. आगाप लागवडीच्या पपई बागांत आवक रखडत सुरू आहे. ही आवक सप्टेंबरमध्ये वाढेल, अशी माहिती मिळाली.
उत्तरेकडूनही मागणी
उत्तरेकडील पंजाब, हरियाना, राजस्थान, दिल्ली, काश्मीर आदी भागात खानदेशातून पपईची पाठवणूक केली जाते. उष्णतेमुळे एप्रिलमध्येच या भागातून मागणी कमी झाली होती. परंतु उत्तरेकडील पूरस्थिती काहीशी दूर झाल्याने तेथून मागणी येत आहे.
सध्या पंजाब, काश्मीर, दिल्ली येथील मॉल्स तसेच दिल्लीच्या आझादपूर बाजारातील मोठे खरेदीदार पपईची मागणी नोंदवीत आहेत. मुंबई, पुणे, नागपूर येथेही काही प्रमाणात पपईची पाठवणूक अधून-मधून केली जाते, अशी माहिती मिळाली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.