
Amravati News ‘गाव करी ते राव न करी’ हा आदर्श सांगत अंजनगावसूर्जी तालुक्यातील चौसाळा ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून शेतरस्त्याची सोय करण्यासोबतच जलसंधारणाचाही उद्देश साधला आहे. तब्बल ३३०० मीटरचा रस्ता आणि २१ लाख लिटर पाणी संकलित होणारे तीन डोहही बांधण्यात आले आहेत.
हंगामात शेतीच्या निविष्ठा पोचविण्यासोबतच काढणीपश्चात शेतीमाल घरापर्यंत, बाजारपेठेपर्यंत नेण्यात शेतरस्ते उपयोगाचे ठरतात. परंतु सद्यःस्थितीत रस्त्यांची देखभालीअभावी प्रचंड दुरवस्था झाली आहे. त्यामुळे चौसाळा येथील ग्रामस्थांनी शासकीय योजनेवर अवलंबून न राहता लोकवर्गणीतून पाणंद रस्त्याचे काम करण्याचा निर्णय घेतला.
चौसाळा ते नबापूर असा हा रस्ता असून, त्याशेजारी १६३ शेतकऱ्यांची शेती आहे. ७९ हेक्टर क्षेत्राला या रस्त्याचा फायदा होईल. त्यातील ६७ शेतकरी संत्रा उत्पादक आहेत.
परिणामी, या मार्गावरील शेतकऱ्यांसमोर लोकवर्गणीचा प्रस्ताव मांडण्यात आला. संत्रा बागायतदारांनी एकरी दोन हजार तर कोरडवाहू शेतकऱ्यांनी एकरी १ हजार रुपये याप्रमाणे वर्गणी देण्याचे ठरले. त्यातून एकूण तीन लाख २६ हजार रुपये गोळा झाले.
स्वामी विवेकानंद जीवनज्योत संघटना, पुणे आणि लोकजागर समूह (अंजनगाव) यांनी ही खोदकाम व इतर कामासाठी पोकलॅंड व इतर यंत्रे पुरविली. या पाणंद रस्त्यालगत एक नाला वाहतो. त्यात गाळ साचल्याने अपेक्षित पाणीसाठा होत नव्हता. या नाल्यातील माती आणि दगड व इतर साहित्याचा वापर पाणंद रस्त्याच्या कामासाठी करण्यात आला.
परिणामी प्रत्येकी २१ लाख लिटर पाणी संकलित होईल, असे तीन डोह रस्त्यालगत तयार झाले. त्यासाठीच्या प्रस्तावाला लघू पाटबंधारे विभागाचे अभियंता राहुल सव्वालाखे यांनी तत्काळ मान्यता दिली.
उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर, अंजनगावसुर्जी तहसीलदार अभिजित जगताप यांनी गावाला भेट देत कामाचे कौतुक केले. हर्षद काळमेघ, मंगेश ढोरे उपसरपंच, सागर ढोकणे, अनुप काळमेघ, सूरज हिरळकर, अंगद ढोरे, संदीप ढोरे यांनी यासाठी पुढाकार घेतला होता.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.