Palkhi Sohala 2023 : भक्तीचा महापूर विठुरायाच्या चरणाकडे

Ashadhi Vari 2023 : पुण्याकडून माऊलीच्या पालखीचे वाजतगाजत प्रस्थान
Palkhi Sohala
Palkhi SohalaAgrowon

Pune News : संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या महापालखीसह राज्यभरातून आलेल्या शेकडो दिंड्यांनी बुधवारी (ता.१४) पहाटे पुण्यातून सासवडच्या दिशेने सनईचौघड्यांच्या निनादात पुण्यमय वातावरणात प्रस्थान केले.

या दिंड्यांमध्ये राज्यभरातील वारकरी सहभागी झाले आहेत. त्यात बहुतांश शेतकरी आहेत. ते आता भक्तिभावाने विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या दिशेने निघाले आहेत.

देहूमधून निघालेली तुकाराम महाराजांची पालखी आणि आळंदीहून निघालेली ज्ञानोबारायांची पालखी पुण्यात पोहचल्यानंतर शहरवासीयांनी त्यांचे हर्षोल्हासात स्वागत केले.

दोन्ही पालखीचे रथ ५०० ते ६०० किलो फुले वापरून सजविण्यात आले होते. पालखी मार्गात भाविकांनी दुतर्फा रांगा लावल्या होत्या. त्यामुळे पोलिसांची तारांबळ उडत होती.

रांगोळ्या व पताका लावून सजवलेल्या पालखी मार्गातील वाहतूक इतर वाहनांसाठी बंद होती. ठिकठिकाणी वारकरी मंडळींचे जंगी स्वागत केले जात होते.

शहरवासीयांनी पालखी मार्गात उत्स्फूर्तपणे वारकऱ्यांसाठी भोजन व अल्पोपाहाराची सुविधा केंद्रे उभारली होती. विशेष म्हणजे दिंड्यांमध्ये यंदा माता भगिनींबरोबरच शेतकरीपुत्रांचा सहभाग लक्षणीय होता.

Palkhi Sohala
Palkhi Sohala: माऊलींची पालखी दिवेघाटात पोहचली; आजचा मुक्काम सासवडला

नांदेडच्या पळसगावहून १०० शेतकरी वारकऱ्यांना घेऊन आलेले दिंडीमालक पंढरीनाथ महाराज उपासे म्हणाले, ‘‘पंढरपूरच्या वारीसाठी मराठवाड्यातून सर्वाधिक वारकरी येतात. आम्ही ५ जून रोजी शेतशिवारं सोडून वारीला निघालेलो आहोत

परळीहून निघालो आहोत. आता पुण्याहून पायी जेजुरी-लोणंद-तरडगाव-फलटण-नातेपुते-माळशिरस-वेळापूर-पंढरपूर मार्गे आम्ही दिंडीने जाणार आहोत. आम्ही माऊलीच्या विश्वासाने घरंदारं सोडून दिंडीने निघतो. या काळात आम्हाला केवळ माऊलीच्या दर्शनाची ओढ लागलेली असते.’’

Palkhi Sohala
Kartiki Wari : कार्तिकीसाठी पंढरीत फुलला भक्तीचा मळा

शेतकऱ्यांच्या दिंडीत मालवाहतूक करण्यासाठी मालमोटारी आणल्या जातात. त्या चालविणाऱ्या वारकऱ्याला दिंडीचालक म्हटले जाते. दिंडीचालक ज्ञानेश्वर वडजे म्हणाला, ‘‘मी शेतकरी असून कला पदवीधर आहे. गेल्या दहा वर्षांपासून मी ट्रक चालवतो.

वारकऱ्यांची सुरक्षित ने-आण करणे, पाणवठे शोधणे, भोजनाची व्यवस्था याचे नियोजन आम्हाला करावे लागते. वारी करून गावी गेलेला शेतकरी नव्या दमाने शेती काम करतो. संकटाच्या स्थितीतदेखील शेतीत लढण्याची ऊर्जा त्याला वारीमुळे मिळते.’’

पंढरपूरला आषाढी वारीला निघालेला वारकऱ्यांचा हा महापूर २९ जून रोजी आषाढीच्या महासोहळ्याच्या निमित्ताने चंद्रभागेच्या काठी अवतरणाऱ्या भाविकांच्या महासागराला जाऊन मिळेल.

पाच-सात किलोमीटर दर्शनासाठी लागणाऱ्या रांगा आणि चंद्रभागेच्या किनारी भाविकांची होणारी गर्दी बघता ६५ एकर जागेत भव्य वाहनतळ उभारले गेले आहे. तसेच, यंदा तीन दिवस व्हीआयपी दर्शन बंद करण्यात आले आहे. यंदा किमान १५ लाख भाविक वारीला येतील, असा अंदाज बांधून प्रशासनाने पंढरपूरमध्ये नियोजन केले आहे.

‘शेतीत तोटा झाला तरी जगण्याचं बळ माऊली देते’
मराठवाड्यातून वारीत सहभागी झालेला २७ वर्षांचा शेतकरीपुत्र तानाजी उपासे म्हणाला, ‘‘विदर्भ आणि मराठवाड्यात ऐन उन्हाळ्यात शेतकऱ्यांची अवस्था अतिशय बिकट होते. शेतीला सोडाच; पिण्यालाही पाणी नसते. त्यामुळे मनःस्थिती विचलित होते.

अशावेळी वारीत सहभागी झाल्यास आम्ही सारी दुःखं विसरतो. महिनाभर भजनकीर्तनात दंग होतो. वारी पूर्ण होईपर्यंत उन्हाळ्याचा शेवटचा टप्पा निघून जातो. गावी गेल्यानंतर आम्ही नव्या दमाने शेतीच्या कामांना लागतो. शेतीत तोटा झाला तरी जगण्याचं बळ आम्हाला माऊली देते.’’

‘पंढरपूर, आळंदीत वृध्दाश्रमासाठी पाठपुरावा करू’
राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या वारकरी मंडळींशी पुण्यात आमदार सिध्दार्थ शिरोळे यांनी संवाद साधला. ते म्हणाले, “तुम्हाला विठुरायाचे दर्शन घेण्याची जितकी ओढ लागलेली असते आणि त्याला पाहताच जितका आनंद तुम्हाला होतो; तशीच ओढ आम्हा
पुणेकरांना वारकऱ्यांच्या दिंड्यांच्या स्वागताची झालेली असते.

तुम्हाला बघताच आम्हाला अत्यानंद होतो. पंढरपूर व आळंदीत सुविधायुक्त वृद्धाश्रम उभारण्यासाठी राज्य शासनाकडे आम्ही सर्व आमदार विधिमंडळात पाठपुरावा करू.”

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com