
नांदेड : जिल्ह्यात जुलैमध्ये पर्जन्यवृष्टीमुळे (Heavy Rainfall) तीन लाख ५८ हजार ७३१ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान (Crop Damage Due To Heavy Rain) झाल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने पाठविला होता. परंतु यात मुखेडमध्ये केवळ ६४५ हेक्टर क्षेत्र बाधित दाखविल्याचा प्रकार घडला होता. याबाबत टीकेची झोड उठल्यानंतर सुधारित अहवाल पाठविण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विपिन यांनी दिले होते. यामुळे मुखेडसह इतर तालुक्यातही बाधित क्षेत्रात वाढ होऊन सात लाख शेतकऱ्यांचे चार लाख ९७ हजार ४४३ हेक्टर क्षेत्राचे नुकसान (Agriculture Damage) झाल्याचा अहवाल पाठविण्यात आला आहे. यासाठी एनडीआरएफच्या (हेक्टरी सहा हजार आठशे रुपये मदतीच्या) निकषानुसार ३३८ कोटी ५० लाख ६३ हजार चारशे रुपयांची मागणी शासनाकडे केली आहे.
नांदेड जिल्ह्यात मागील काही वर्षांच्या तुलनेत यंदा जुले महिन्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. जिल्ह्यातील तब्बल ८० मंडलांत अनेक वेळा अतिवृष्टीची नोंद झाली. जुलैमध्ये विक्रमी ६०६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. या पावसाचे प्रमाण प्रचंड असल्याने नदी-नाल्यांना पूर येऊन नदीकाठची जमीन खरडून गेली. सखल भागातील पिके पाण्याखाली गेली. यामुळे आठ लाख १२ हजार ३२३ हेक्टर पिकाखालील क्षेत्र असलेल्या जिल्ह्याला फटका बसला. जिरायतीमधील सोयाबीन, कपाशी, ज्वारी, तूर, उडीद, मूग या चार लाख ९७ हजार ९८ हेक्टरवरील पिकांसह ३१४ हेक्टरवरील बागायती व ३१ हेक्टरवरील फळपिके असे एकूण चार लाख ९७ हजेरी ४४३ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले. यात अतिवृष्टीचा फटका सहा लाख ९९ हजार ९६७ शेतकऱ्यांना बसल्याच सुधारित अहवाल जिल्हा प्रशासनाने नव्याने शासनाला पाठविला आहे. यासाठी एनडीआरएफच्या हेक्टरी सहा हजार आठशे रुपये प्रतिहेक्टर मदतीच्या प्रचलित दरानुसार जिल्ह्यासाठी ३३८ कोटी ५० लाख ६३ हजार ४०० रुपयांची मागणी विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून राज्य शासनाकडे केली आहे.
सकाळ ॲग्रोवन इफेक्ट...
मुखेडचे बाधित क्षेत्र ६४५ वरून ४० हजार हेक्टरवर मुखेड तहसीलकडून यापूर्वी ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान दाखविताना फक्त ६२५ शेतकऱ्यांचे ६४५ हेक्टरमधील बाधित झाल्याचा अहवाल जिल्ह्याला पाठविला होता. यासाठी केवळ ४३ लाख ८६ हजारांची मागणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात सर्वच तालुक्यांत नुकसान मोठ्या प्रमाणात असताना मुखेड तालुक्यातच नुकसान कमी दाखविण्याचा प्रकार शेतकऱ्यांवर अन्याय करणारा असल्याची बातमी सकाळ ॲग्रोवनमध्ये प्रसिद्ध होताच तालुक्यात खळबळ उडाली होती. अनेक शेतकऱ्यांनी लोकप्रतिधिंना धारेवर धरले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शिवशंकर पाटील यांनी तहसील कार्यालयात ठिय्या करण्याचा इशारा दिला होता. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सुधारित अहवाल पाठविण्याचे निर्देश होते. यामुळे आता मुखेडचे बाधित क्षेत्र ४० हजार हेक्टर दाखविले आहे. यामुळे शेतकऱ्यांना आता २७ कोटी ३५ लाख रुपये मिळणार आहेत. तालुका प्रशासनाचा गलथानपणा योग्यवेळी चव्हाट्यावर आणल्याने शेतकऱ्यांनी सकाळ ॲग्रोवनचे ऋण व्यक्त केले आहेत.
तालुकानिहाय बाधित शेतकरी, बाधित क्षेत्र व मागणी रक्कम
तालुका....बाधित शेतकरी....बाधित क्षेत्र....मागणी रक्कम
नांदेड....३४,०९८....१८,९४७....१२,९४,७६,१००
अर्धापूर....२७,४२६....२१,४४५....१४,५८,२६,०००
कंधार....७६,४८१....४०,५१०....२७,५६,३०,०००
लोहा....६४,८१५....३४,६५७....२३,५६,६७,६००
देगलूर....३९,५६८....३१,५६८....२१,४६,६२,२००
मुखेड....७४,०८४....४०,२२२....२७,३५,०९,६००
बिलोली....३३,२८६....२३,४६२....१५,९५,४१,६००
नायगाव....४२,७३७....२१,१०३....१४,४२,०३,९००
धर्माबाद....२८,५५०....१५,४९४...१०,६०,४२,६००
उमरी....३३,६४६....२९,४९५....२०,०५,६६,०००
भोकर....४५,४६०....३८,५५२....२६,२१,५३,६००
मुदखेड....२८,७१४....१५,८९४....१०,८०,६९,२००
हदगाव....५९,४९२....६२,६०३....४२,६०,१४,०००
हिमायतनगर....३३,२१५....३१,४२७....२१,३७,०३,६००
किनवट....५३,४५१....४९,३३२....३३,५४,५७,६००
माहूर....२४,९४३....१६,३२०....११,१०,०९,६००
एकूण....६,९९,९६७....४,९७,४४३...३३८,५०,६३,४००
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.