पुणे ः गेल्या तीन ते चार दिवसांपासून ढगाळ वातावरण (Cloudy Weather) असून, तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी पडल्याने फळबाग उत्पादक (Horticulture Farmer) चांगलेच धास्तावले आहेत. जोरदार पाऊस आल्यास पुन्हा नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांना लागून राहिली आहे.
हवामान विभागाने राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यानुसार वातावरणात मोठे बदल होत असून, पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. काही दिवसापासून थंडी कमी-अधिक होत आहे. रविवारी (ता. ११) सकाळपासून ढगाळ वातावरण तयार झाल्याने द्राक्षे, डाळिंब, सीताफळ, पेरू, अंजीर या फळबागांवर कीड-रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे.
पावसाळ्यातही जिल्ह्यातील शेती क्षेत्राचे मोठे नुकसान झाले असून, अनेक ठिकाणी बागांचे नुकसान झाले आहे. आता पुन्हा ढगाळ वातावरणामुळे या बागा संकटात सापडण्याची शक्यता बळावली आहे. याशिवाय डाळिंब, बाजरी, मका, ज्वारी, कांदा पिकांनाही ढगाळ हवामानाचा फटका बसण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसाच्या संकटाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला जाण्याची शक्यता असल्याने शेतकरी चांगलाच चिंतेत आहे.
पुणे जिल्ह्यात द्राक्षे, डाळिंब, सीताफळ, पेरू अशा फळबांगाचे मोठे क्षेत्र आहे. जिल्ह्यातील नारायणगाव, बारामती, इंदापूर, दौड या तालुक्यांतील परिसरात अनेक शेतकरी द्राक्षांच्या थॉमसन, शरद, फ्लेम, सोनाका, फनटासी, क्रिमसन या वाणांच्या द्राक्षांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. थंडी आणि ढगाळ हवामानामुळे फळे संकटात सापडण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.
फुलगळ व फळगळसारख्या नुकसानीचा सामनाही शेतकरी करीत आहेत. सध्या द्राक्ष बागा फ्लॉवरिंग अवस्थेत, तर काही बागा पाणी उतरण्याच्या अवस्थेत आहेत. बदलेल्या हवामानामुळे फ्लॉवरिंग अवस्थेतील मण्याची गळ होऊ शकते. तसेच डाऊनी, भुरीसारखे बुरशीजन्य रोग द्राक्षे बागेवर हल्ला करू शकतात.
याशिवाय तयार होत असलेल्या घडांचे मणी फुटू शकतात. यामुळे अतिरिक्त पावडर फवारणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर येणार असल्याने खर्चातही वाढ होणार आहे. तसेच पुरंदर, इंदापूर, जुन्नर, आंबेगाव, शिरूर, खेड, दौड, बारामती या भागांतही फळबाग उत्पादक शेतकरी धास्तावले आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.