Chana Market : यंदाच्या हंगामात हमीभावाने सुरु असलेली हरभऱ्याची खरेदी अंतिम टप्प्यात पोचली आहे. खरेदीसाठी अवघे दोन दिवस शिल्लक आहेत. या वर्षात राज्यात सुमारे ७६ लाख क्विंटल खरेदीचा टप्पा ओलांडला आहे.
राज्यात या हंगामात १४ मार्चपासून हरभरा खरेदीचे आदेश देण्यात आले होते. आठ खरेदीदार संस्थांच्या वतीने सब एजन्ट्सनी टप्प्याटप्प्याने खरेदी केंद्रे सुरु केली.
आतापर्यंत सुमारे ६१० केंद्र सुरु झाली. या केंद्रांत ८ जूनपर्यंत ७६ लाख १४ क्विंटल हरभरा खरेदी झाली. यंदाच्या हंगामातील ही खरेदी उद्यापर्यंत (ता.११)सुरु राहील. शेवटचे दोनच दिवस शिल्लक असल्याने ही खरेदी आज (ता. १०) आणि उद्या (ता.११) सार्वजनिक सुटीच्या दिवशीही सुरु राहील.
अद्यापही हजारो शेतकऱ्यांचा हरभरा विक्री व्हायचा आहे. किती शेतकऱ्यांचा माल खरेदी केला जाईल, हे निश्चित सांगणे शक्य नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. खरेदीचे उद्दिष्ट दोन वेळा जिल्ह्यांना वाढवून देण्यात आले. तरीही सर्व शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी झालेला नाही.
या हंगामात हरभरा विक्रीसाठी सुमारे ५ लाख ८२ हजार ८३३ शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे. त्यापैकी तीन लाख ८५ हजार शेतकऱ्यांचा हरभरा स्वीकारण्यात आला. तरीही सुमारे दोन लाखांपर्यंत नोंदणीकृत शेतकऱ्यांचा हरभरा अद्याप मोजायचा आहे.
यंदाच्या हंगामात विदर्भ मार्केटिंग फेडरेशन, मार्कफेड व महाएफपीसी या तीन खरेदीदार संस्थांनी एकूण खरेदीच्या ५७ लाख ६० हजार क्विंटल हरभरा खरेदी केला आहे. खरेदी केंद्र संख्या (५१) कमी असूनही ‘व्हीसीएमएफ’ने तब्बल १० लाख ३८ हजार ३७४ क्विंटल हरभरा खरेदीचा टप्पा गुरुवारपर्यंत (ता.८) पूर्ण केला होता.
संस्थानिहाय झालेली हरभरा खरेदी (क्विंटल)
विदर्भ मार्केटिक फेडरेशन - १० लाख ३८ हजार ३७४
मार्कफेड - २८ लाख ८३ हजार ११७
महाएफपीसी - १८ लाख ३९ लाख ३४५
पृथाशक्ती एफपीसी- ७ लाख ९३ हजार ५५४
वॅपको- ५ लाख ६ हजार ६१५ क्विंटल
महाकिसान व्ही- १ लाख ९० हजार ७४६
महाकिसान संघ-१ लाख ९२ हजार २४३
महास्वराज्य- १ लाख ४९ हजार २१
एकूण- ७६ लाख १४ क्विंटल
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.