पुणे ः पावसाळ्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे (Rain) जमिनीत असलेली पुरेशी ओल आणि गेल्या वीस ते पंचवीस दिवसांपासून सुरू झालेल्या थंडीमुळे रब्बी हंगामात (Rabi season) हरभऱ्याची पेरणी झाली आहे. आतापर्यंत पुणे विभागात सरासरीच्या एक लाख ८२ हजार ११९ हेक्टरपैकी एक लाख ३ हजार ९६४ हेक्टर म्हणजेच ५७ टक्के पेरण्या झाल्या आहेत. विभागात अजूनही पेरण्या सुरू असल्याने या क्षेत्रात आणखी वाढ होण्याची शक्यता कृषी विभागाच्या सूत्रांनी वर्तविली आहे.
पुणे विभागात हरभऱ्याचे मोठे क्षेत्र आहे. मागील दोन वर्षापासून हरभरा पिकाकडे शेतकरी मोठ्या प्रमाणात वळत आहेत. यंदाही शेतकऱ्यांनी ज्वारी, गहू, हरभरा या पिकांची पेरणी केली आहे. यामध्ये शेतकऱ्यांनी हरभरा पिकामध्ये विद्यापीठाकडील विजय, विशाल यासारख्या वाणाच्या हरभऱ्याची पेरणी केली आहे.
यंदा पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले असताना हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी आर्थिक परिस्थिती नसताना पीक कर्ज घेऊन रब्बीची तयारी केली आहे. अनेकांनी खते, बियाणांची खरेदी केली असून बैलाच्या व ट्रॅक्टरच्या सहाय्याने पेरणी करत आहेत.
पाण्याची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी हरभरा पिकाची पेरणी केली. परंतु ज्या ठिकाणी ओल कमी आहे, अशा ठिकाणी कमी प्रमाणात पेरण्या झाल्या आहेत. विभागात सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात सर्वाधिक पेरणी झाली असून सरासरीच्या १६ हजार ९५० हेक्टरपैरी १७ हजार २१६ हेक्टर म्हणजेच १०२ टक्के पेरणी झाली आहे. तर उत्तर सोलापूर, बार्शी, सांगोला, मंगळवेढा या तालुक्यात चांगली पेरणी झाली आहे.
तर दक्षिण सोलापूर, मोहोळ, माढा, करमाळ, पंढरपूर, माळशिरस या तालुक्यात कमीअधिक प्रमाणात पेरणी झाली आहे. नगर जिल्ह्यातील नगर तालुक्यात १० हजार ४९ हेक्टरपैकी सुमारे ९ हजार ८७९ हेक्टर म्हणजेच ९८ टक्के पेरणी झाली आहे. तर पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, श्रीरामपूर या तालुक्यांत ५० टक्क्यांहून अधिक तर शेवगाव, पाथर्डी, राहुरी, संगमनेर, अकोला, राहाता या तालुक्यांत ५० टक्क्यांहून कमी पेरणी झाली आहे.
पुणे जिल्ह्यात पुरंदर तालुक्यात सर्वाधिक पेरणी झाली असून सरासरीच्या ३ हजार ६७ हेक्टरपैकी २ हजार १७६ हेक्टर म्हणजेच ७१ टक्के पेरणी झाली आहे. तर उर्वरित तालुक्यांत कमीअधिक प्रमाणात पेरणी झाली आहे. ज्या ठिकाणी पेरणी झाली आहे, तेथे हरभरा उगवून आला असून पीक वाढीच्या अवस्थेत आहे.
जिल्हानिहाय झालेली हरभरा पिकाची पेरणी (हेक्टरमध्ये) ः
जिल्हा --- सरासरी क्षेत्र --- झालेली पेरणी -- टक्के
नगर --- ८८,३७७ -- ४२,६२२ -- ४८
पुणे -- ३४,३३० -- ८,०५७ -- २३
सोलापूर -- ५९,४१२ -- ५३,२८५ -- ९०
एकूण -- १,८२,११९ -- १,०३,९६४ -- ५७
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.