
Dhule News : जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे. यातच शेती कर्जवाटपासाठी दिलेल्या उद्दिष्टापेक्षा अत्यंत निश्चांकी पिककर्ज वाटप झाले आहे. अर्थात फक्त २० टक्के पीक कर्ज वाटप राष्ट्रीयकृत बँकांनी केले असून पालकमंत्री, जिल्हाधिकरी यांचे या प्रक्रियेकडे दुर्लक्ष होत आहे.
शेतकरी, लोकप्रतिनिधी याबाबत वारंवार तक्रारी करीत आहेत. पण दखल घेतली जात नाही, या बॅंकांवर त्यांनी कारवाई करावी, अशी मागणी शिवसेने (उबाठा)चे माजी आमदार प्रा. शरद पाटील यांनी केली आहे.
याबाबत दिलेल्या निवेदनात प्रा. पाटील यांनी म्हटले आहे, की धुळे जिल्ह्यात यंदा कोरड्या दुष्काळाचे संकट ओढवले आहे. खरीप हंगामाचे ७० टक्के नुकसान झाले आहे. कापूस, ज्वारी, मका, बाजरी हि प्रमुख पिके हातातून गेलेली आहेत. येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना जगणे जिकरीचे होणार आहे.
शेतकरी आर्थिक संकटात आहे, तरीदेखील जिल्ह्यात पीक कर्ज वाटपाचे काम संथ आहे. जिल्ह्यात ९४९ कोटी रुपये पीक कर्ज वितरणाचे उद्दिष्ट राष्ट्रीयकृत, खासगी व सहकारी बँकांना देण्यात आले होते. मात्र ऑगस्ट महिना संपत आला तरी धुळे-नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक वगळता सर्वच बँकांनी पिककर्ज वाटपात हात आखडता घेतला आहे.
एकट्या धुळे - नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती बँकेने उद्दिष्टापेक्षा अधिक म्हणजेच १२२ टक्के पिककर्ज वाटप केले आहे. इतर सर्व बँकांनी फक्त १५ ते१८ टक्के कर्ज वाटप केले आहे. म्हणजेच उद्दिष्टापेक्षा ८० टक्के पिककर्ज वाटप राष्ट्रीयकृत बँकांनी केले नाही, हे उपलब्ध आकडेवारी वरून सिद्ध होत आहे.
खरीप पिककर्ज वाटपाचे उद्दिष्ट खरीप हंगाम आढावा बैठकीत मुख्यमंत्री घालून देतात. या उद्दिष्टानुसार जिल्ह्यात ९४९ कोटी पिककर्ज हे १ लाख १० हजार ४९ शेतकऱ्यांना वाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. साधरणत: ३० जूनपर्यंत हे कर्ज वितरण अपेक्षित होते, मात्र तसे झाले नसल्याचे प्रा. पाटील यांनी सांगितले.
...तर आंदोलन करणार
याप्रश्नी पालकमंत्री, जिल्हाधिकारी व लिड बँकेचे व्यवस्थापक यांनी स्पष्ट भूमिका घेऊन राष्ट्रीयकृत बँकावर कारवाई करावी. कारवाई न केल्यास संबंधित बँकाच्या कार्यालयापुढे व जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने केली जातील. तसेच अशा बँकातील शेतकऱ्यांच्या ठेवी इतरत्र वळत्या कराव्यात यासाठी शिवसेना(उबाठा) शेतकऱ्यांसह आंदोलन करील, असा इशारा माजी आमदार प्रा.पाटील यांनी दिला आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.