पुणे : खरीप हंगामातील सततच्या पावसामुळे कांदा (Onion Cultivation) लागवडी अडचणीत आल्या आहेत. मात्र, ज्या भागात पाऊस कमी होता, अशा भागात लागवडी झाल्या आहेत. जिल्ह्यात अवघ्या ५ हजार १३४ हेक्टरवर कांदा लागवड (Onion Production) झाली आहे, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
खरीप कांदा तीन ते चार महिन्यात काढणीस येतो. नाशिक, नगर पाठोपाठ पुणे जिल्ह्यांतही कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड होते. खरीप आणि लेट खरीप आणि उन्हाळी (रब्बी हंगामात) कांद्याचे उत्पादन जिल्ह्यात होते. खरिपात पश्चिम भागांत भाताचे मोठे आगार आहे. त्यामुळे या भागात लागवडी कमी होतात. मात्र, पूर्व भागातील शिरूर, खेड, पुरंदर, इंदापूर, बारामती या भागांत कमी पाऊस आहे. त्यामुळे बऱ्यापैकी लागवडी होतात. परंतु चालू वर्षी जुलै ते सप्टेंबर या काळात झालेल्या सततच्या पावसामुळे या कांदा लागवडी काही प्रमाणात कमी झाल्या आहेत.
परतीच्या पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला होता. त्यामुळे अनेक ठिकाणी कांदा पिकांचे नुकसान झाले आहे. सध्या खरीप कांद्याची आवक कमी आहे. त्यामुळे अनेक शेतकरी गेल्या वर्षीचा रब्बीतील कांदा हळूहळू बाहेर काढत आहेत. गेल्या काही दिवसापासून कांद्याला बऱ्यापैकी दर मिळत आहे. काही वेळा बाजारात एकाच वेळी आवक वाढत असल्यामुळे कांद्याच्या दरावर परिणाम होत आहे.
किरकोळ विक्रीच्या ठिकाणी कांद्याचा प्रतिकिलोचा दर १० ते ४० रुपयांच्या दरम्यान आहे. मात्र कांदा मार्केटमध्ये हा दर अत्यंत कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कांदा पिकांतून काही प्रमाणात तोटा सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे.
खरिपात जिल्ह्याच्या पश्चिम भागात भात हे मुख्य पीक घेतले जाते. तर पूर्व भागात सोयाबीन, मका हे पीक घेतले जाते. त्यामुळे कांदा लागवडी कमी प्रमाणात होतात. यंदा सतत झालेल्या पावसामुळे कांदा लागवड कमी प्रमाणात झाल्याचे दिसून येते.
- सुभाष काटकर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, पुणे.
तालुकानिहाय कांदा
लागवड (हेक्टर)
तालुका झालेली लागवड
हवेली १९४
शिरूर १२७
बारामती १८४७
इंदापूर ६३५
दौंड ४९४
पुरंदर १८३७
एकूण ५१३४
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.