
Nagpur News : अचूक आणि गतीने पंचनामे होण्यासाठी नागपूर विभागात प्रथमच प्रायोगिक तत्त्वावर ‘ई-पंचनामे’ पद्धती राबविण्यात येत आहे. देशात व राज्यात अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग आहे. ई-पंचनाम्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने मदत देणे शक्य होणार आहे. विभागातील नुकसानीचे पंचनामे येत्या ५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज (ता. १ ऑगस्ट) दिली.
श्रीमती बिदरी यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात प्रसार माध्यमांना ‘ई- पंचनामे’ या उपक्रमाबद्दल माहिती दिली. नैसर्गिक आपत्तीच्या काळात पीक, पशुधन आदींचे होणारे नुकसान व त्याचे पंचनामे होऊन शासनाकडून मिळणारा निधी ही सर्व प्रक्रिया पारदर्शी व गतिमान करण्यासाठी नागपूर विभागात ‘ई-पंचनामा’ हा प्रायोगिक प्रयोग राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.
डिसेंबर २०२२ पासून मोबाईल अप्लिकेशन व सॉफ्टवेअर तयार करण्यास सुरुवात झाली. राज्य शासनाच्या महारिमोट सेंसिंग विभाग (एमसॅक) आणि महसूल व मदत व पुनर्वसन विभागाच्या मदतीने तयार केलेल्या या अॅप्लिकेशनचा वापर सुरू करण्यात आल्याचे, श्रीमती बिदरी यांनी सांगितले.
नागपूर विभागात नैसर्गिक आपत्तीमुळे जवळपास ३० हजार ५९९ हेक्टर पिकांचे नुकसान झाले असून ५२ टक्क्यांपर्यंत पंचनामे पूर्ण झाले आहेत. या कामास गती देऊन महसूल सप्ताहातच ५ ऑगस्टपर्यंत उर्वरित पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश जिल्ह्यांना देण्यात आल्याचे बिदरी यांनी सांगितले.
असा होतो ई-पंचनामा
नुकसानीची पाहणी करण्याकरिता स्वत: तलाठी शेतकऱ्याच्या बांधावर जातात. तेथील छायाचित्र घेऊन ॲप्लिकेशनवर अपलोड करतात. अप्लिकेशनवर भरण्यात आलेल्या मंडळनिहाय सर्वे व गट क्रमांक निहाय नुकसानीची ही माहिती तलाठी, ग्रामसेवक, कृषी सेवकांद्वारे भरण्यात येते.
या माहितीची शेतकऱ्यांकडून ई-पीक पाहणीमध्ये भरण्यात आलेल्या माहितीची पडताळणी होते. अंतिम माहिती तहसीलदारांकडून तपासली जाते. मंजुरीनुसार विभागीय महसूल अधिकारी, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात येईल. येथून माहिती शासनाकडे पाठविण्यात येणार व नियमानुसार जाहीर मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल, असे श्रीमती बिदरी यांनी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.