

Kolhapur Water Issue : शिरोळ तालुक्यातील विशेषतः दत्तवाड, जुने दानवाड नवे दानवाड, घोसरवाड व हेरवाड या गावांमधील पाणीटंचाईची भीषणता आहे. या भागामध्ये पाणी देण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, सांगली येथील राजापूर कष्णा नदीवरील बंधाऱ्यातील पाणीपातळी आवश्यक इतकी ठेवून शिरोळ तालुक्यातील अन्य गावांना टंचाईपासून वाचविण्याच्या सूचना आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी प्रशासनाला केल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात दूधगंगा धरणाच्या लाभक्षेत्रातील शिरोळ तालुक्यातील गावांतील पिण्याच्या व शेतीच्या पाण्यासाठीच्या टंचाईबाबत माजी राज्यमंत्री आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, कोल्हापूर पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता महेश सुर्वे, पाटबंधारे विभाग (उत्तर) कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर, जलसंपदाचे अधिकारी यांच्यासोबत बैठक घेतली.
शिरोळ तालुक्यातील काही गावांमधील पाणीटंचाईची भीषणता आमदार श्री. यड्रावकर यांनी निदर्शनास आणून दिली. या वर्षीच्या हंगामी पावसाने ओढ दिली आहे व उन्हाळी हंगामात अवकाळी पाऊस पडलेला नाही. यामुळे दूधगंगा खोऱ्यात पिण्याच्या व शेतीच्या पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने या प्रश्नांवर योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकरांनी यांनी केली.
सध्या दूधगंगा नदीपात्र कर्नाटक सीमेलगतच्या भागात पूर्णतः कोरडे पडले आहे. दूधगंगा धरणातील विसर्ग हा जेमतेम असल्याने सुळकूड बंधाऱ्यापर्यंत पाणी उपलब्ध होत आहे. या बंधाऱ्यांच्या अधोबाजूस कर्नाटक राज्याचे बंधारे आहेत व त्याच्याखाली दत्तवाड हा महाराष्ट्र राज्यातील बंधारा आहे. सध्या या बंधाऱ्यामध्ये अत्यल्प प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. तसेच कृष्णा नदीवरील कल्लोळ बंधाऱ्याचे नूतनीकरण व बांधकाम चालू असल्याने या मार्गाने या गावांना पाणी उपलब्ध करता येत नाही.
दूधगंगा धरणात सध्या फक्त मृत पाणीसाठा शिल्लक आहे. तसेच वेदगंगा नदीवरील पाटगांव धरणातही अत्यल्प पाणी शिल्लक आहे. दूधगंगा धरणातून पूर्ण विसर्ग क्षमतेने पाणी सोडून ७० ते ७५ किमी लांबीपर्यंत पाणी पोहोचविणे सद्यःस्थितीत शक्य नसल्याचे पाटबंधारेकडून स्पष्ट करण्यात आले.
बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा
जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी तातडीने बेळगाव जिल्हाधिकारी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून पाणी टंचाईवर उपाययोजना करण्याबाबत चर्चा केली व कर्नाटक राज्यातील गावात शेतीसाठी उपसाबंदी लागू करून नदीतील उपलब्ध पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याबाबत सकारात्मक चर्चा केली.
शिरोळ तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांमध्ये तातडीने पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करण्याबाबत जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी प्रांताधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.