Animal Care : अति उष्णतेमुळे जनावरांना कोणते आजार होतात? त्यावर काय उपाययोजना कराव्यात?

उन्हाळ्यात हिरवा चारा, पिण्याच्या पाण्याची टंचाईमुळे जनावरांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. जनावरांची दूध उत्पादनाची क्षमता २० टक्यांपर्यंत कमी होते. अति उष्णतेमुळे जनावरांच्यामध्ये विविध आजार होतात.
Animal Care
Animal CareAgrowon

डॉ.ईशा आकरे, डॉ.वरद आनंदगावकर, डॉ.रणजीत इंगोले

Animal Care In Summer : पर्यावरणीय तापमान, सापेक्ष आर्द्रता, सूर्यकिरणे आणि हवेच्या हालचालीमुळे जनावरांचे तापमान थर्मोन्यूट्रॅलिटीक्षेत्रापेक्षा जास्त होते.

जेव्हा शरीरातील चयापचय प्रक्रीयाद्वारे तयार होणारी उष्णता, बाह्य वातावरणातून प्राप्त होणारी उष्णता आणि बाह्य वातावरणात फेकली जाणारी उष्णता यांच्या समतोलामध्ये अडथळा निर्माण होतो, त्यावेळी शरीराच्या जैविक यंत्रणेमध्ये बिघाड होऊन त्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊन उत्पादकता कमी होते.

उष्णतेच्या ताणाचे परिणाम:

१) जनावरे अस्वस्थ होतात. तहान-भूक मंदावून वजन कमी होते.

२) लघवीचे प्रमाण कमी होते. लघवी तीव्र होते.

३) जनावराचे शरीराचे तापमान १०४ ते १०६ अंश फॅरानाईट इतके वाढून कातडी कोरडी पडते.

४) दूध उत्पादन क्षमतेमध्ये घट होते. दूध स्निग्धांश आणि प्रथिनांची टक्केवारी कमी होते.

५) सोमॅटिक पेशींची संख्या वाढून कासदाह होण्याची शक्यता निर्माण होते.

६) गाभण गाईमध्ये गर्भपात आणि लवकर भृण मृत्यू धोका वाढून पुनरुत्पादन क्षमता कमी होते.

Animal Care
Animal Reproduction : पशू पुनरुत्पादनामध्ये खनिजांची भूमिका महत्त्वाची...

उन्हाळ्यात होणारे आजार

उष्माघात

१) उष्माघाताच्या वेळी शरीराचे तापमान १०६ ते १०८ अंश फॅरानाईटपर्यंत वाढते. जास्त तापमान, जास्त सापेक्ष आद्रता आणि वाऱ्याचा कमी वेग, अतिप्रखर सूर्याचा किरणे, पिण्याच्या पाण्याचा कमतरतेमुळे हा आजार होतो.

२) वातावरणातील तापमान वाढल्यास जनावरांच्या शरीराचे तापमान आणि वातावरणातील तापमान यामध्ये फरक पडतो. बाहेरील तापमानाला जुळवून घेण्यासाठी शरीरातून घाम स्त्रवत असतो.जनावरांच्या शरीरातील तापमानाचे नियोजन करणाऱ्याग्रंथींमध्ये बिघाड होतो.यामध्ये शारीरिक क्रिया, आहार, पुनरुत्पादन आणि दुध उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होतो.

३) लठ्ठ जनावरे, अंगावर भरपूर केस किंवा लोकर असणाऱ्या जनावरांना उष्माघाताचा जास्त त्रास होतो.

लक्षणे:

कातडी कोरडी पडते, जनावरे थकल्यासारखी दिसतात., भूक मंदावणे,दुधाळ जनावरे असल्यास दूध उत्पादन कमी होणे, डोळे निस्तेज दिसतात, जनावरांना शरीराचा तोल सांभाळता येत नाही, जनावर लाळ गाळते.

नाकातील रक्तस्त्राव

अति उष्णतेमुळे नाकात रक्तस्त्राव होत असतो. हा रक्तस्त्राव संकरित जनावरांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येतो.नाकात अनेक रक्तवाहिन्या असतात, ज्या नाकाच्या पुढच्या आणि मागच्या पृष्ठभागाजवळ असतात. अतिउष्णतेमुळे लहान रक्तवाहिन्या फुटतात.

लक्षणे:

नाकातून लाल-गडद रंगाचे रक्त वहाते. घश्याचा मागील बाजूस द्रव वाहण्याची संवेदना होणे, वारंवार काहीतरी गिळण्याची तीव्र इच्छा होणे.

शरीरातील पाणी कमी होणे

१) प्यायलेल्या पाण्याच्या प्रमाणापेक्षा शरीरातून अधिक पाणी गमावणे या स्थितीला शरीरातील पाणी कमी होणे किंवा 'डिहायड्रेशन' असे म्हणतात. लघवी, मल, घाम; तसेच उच्छवासावाटेही रोज शरीरातून पाणी बाहेर जात असते. पाण्याबरोबरच शरीर काही प्रमाणात क्षारही गमावते.

२) शरीरातून पाणी गमावणे ही सामान्य प्रक्रिया आहे; परंतु हे प्रमाण वाढले, तर 'डिहायड्रेशन'चा त्रास होतो.'डिहायड्रेशन'मुळे शरीरातील खनिजे आणि इलेक्ट्रोलाइट्स, सोडियम, पोटॅशिअम क्लोराइड यांच्या पातळीत असमतोल किंवा कमतरता होते. त्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते.

लक्षणे:

त्वचेची लवचिकता कमी होते, आळस, त्वचा घट्ट होते. वजन कमी होणे आणि श्लेष्मल त्वचा आणि डोळे कोरडे होतात. त्वचा निस्तेज होते, नेत्रगोलक खोलवर जातात. असामान्य लाळ येते. निर्जलीकरणामुळे जनावर अचानक खाली पडू शकते.

पोट फुगणे

१) गोठ्यात बंधिस्त पद्धतीने पाळल्या जाणाऱ्या जनावरांना हिरव्या चाऱ्याच्या अभावी मिळेल ते खाद्य देवून त्यांची गरज भागविली जाते. त्यामुळे त्यांना बऱ्याच वेळेस निकृष्ट प्रतिचे खाद्य दिले जाते. ज्यामध्ये नवीन उगवलेले गवताचे कोवळे देठ आणि कमी प्रतीचे खाद्य खाऊ घालतात.

२) उन्हाळ्यात असाहिरव्या चारा खाल्ल्याने एका प्रकारचे अपचन होते. गाईचा पचन प्रक्रियेमध्येपोटामध्ये जास्त प्रमाणात वायू तयार होतात. हे वायू ढेकर देऊन नष्ट केले जातात. या वायूच्या निर्मूलनात अडथळा आल्यास पोट फुगणे हा आजार होतो.

लक्षणे:

वायूचा दाब वाढल्याने जनावरांचा दोन्ही बाजूंनी संपूर्ण पोट मोठे होते, श्वास घेताना त्रास होतो, जमिनीवर पाय आपटतात.

Animal Care
Animal Husbandry : कोरडवाहू क्षेत्रातील पशुपालनापुढील आव्हाने

कडव्या

१) हा आजार अति प्रखर सूर्यकिरणांमुळे होतो. प्रामुख्याने पांढरी कातडी असणाऱ्या जनावरांना होतो. पांढरी कातडी असणाऱ्या जनावरांच्या कातडीत 'मेलेनिन' नावाचा घटक कमी प्रमाणात असतो.

२) चाऱ्याच्या कमतरतेमुळे भुकेपोटी जनावरे गाजर गवत खात असतात. अशी जनावरे जास्त वेळ सूर्यप्रकाशात राहिली तर गाजर गवतातील विषारी घटक आणि सूर्यकिरणांमुळे जनावरांचा कातडीवर बदल दिसून येतात.

लक्षणे:

शरीराची कातडी कोरडी पडते, हगवण लागते, श्वास घेताना त्रास होतो, कातडी लाल होणे, पोट फुगते.

विषबाधा

१) मुक्त संचार करणाऱ्या जनावरांमध्ये उन्हाळ्यात हिरव्या चाऱ्याच्या कमतरतेमुळे मिळतील त्या हिरव्या वनस्पती खातात. जसे की घाणेरी, गुंज, धोतरा, बेशरम. या काही वनस्पतींमध्ये विषारी घटक असतात जे जनावरांच्या उतींमध्ये जमा होते आणि विषबाधा होते.

लक्षणे:

जनावरे गुंगल्यासारखी करतात. चारा खात नाहीत. स्नायू अशक्त होतात.जनावरे खाली बसतात. त्यानंतर न उठता पाय सोडून लगेच मरतात.

कॅल्शियम कमतरता

१) उन्हाळ्यामध्ये हिरव्या चाऱ्याच्या कमतरतेमुळे शेतकरी जनावरांना उसाचे वाढे खाऊ घालतात. हे वाढे जास्त प्रमाणात खाल्ल्याने वाढ्यातील ऑक्सालेट खनिजे आणि जनावरांच्या शरीरातील कॅल्शियम एकत्र येऊन लघवीवाटे शरीरातून बाहेर निघून जातात. त्यामुळे शरीरातील कॅल्शियमची पातळी कमी होते.

लक्षणे:

जनावरे एकदम थकून खाली बसतात. शरीराचे तापमान कमी होते, रवंथ न करणे, भूक मंदावते, दूध उत्पादन कमी होते. जनावरे मान टाकून बसणे.

उन्हाळ्यातील आजारावर उपाययोजना

• जनावरांना उष्माघातापासून वाचवण्यासाठी जनावरे थेट सूर्यप्रकाशात येणार नाही याची काळजी घ्यावी. जनावरांना झाडाखाली किंवा गोठ्यात बांधावे.

• गोठ्यामध्ये जनावरांना हालचाल करण्यासाठी सरासरीपेक्षा जास्त जागा देणे आवश्‍यक आहे. एकाच जागेवर जास्त गर्दी झाल्यास, उष्णतेचे निस्सारण होण्यास जास्त वेळ लागतो. त्यामुळे जनावरांना जास्त उष्णता जाणवते.

• गोठा हवेशीर असावा. गरम हवा बाहेर जाण्यासाठी व थंड हवा आत येण्यासाठी गोठ्यामध्ये जागा असावी. त्यामुळे जनावरांना श्वसनाचा त्रास होणार नाही.

• गोठ्याच्या छताला पांढरा रंग द्यावा. त्यामुळे उष्णतेचे परावर्तन होऊन जनावरांतील उष्णतेचा त्रास कमी होऊ शकतो.

• गोठ्याच्या छतावर पालापाचोळा किंवा पाचट टाकावे, त्यावर पाणी शिंपडावे. असे केल्याने छताचे तापमान जास्त वाढत नाही. गोठा थंड राहतो.

• हवा खेळती राहण्यासाठी गोठ्यात पंखे लावावेत.गोठ्याच्या छतावर पाण्याचे स्प्रिंकलर्स लावावेत. जनावरांच्या शरीरावर स्प्रिंकलर,फॉगर्सद्वारे पाणी फवारावे. त्यामुळे जनावरांचे शरीर थंड राहण्यास मदत होते.

Animal Care
Animal Exhibition : राज्यस्तरीय पशुप्रदर्शनात अठरा प्रकारच्या चाऱ्यांचे प्रदर्शन

• गोठ्याचा भोवती बारदान बांधावे. जेणेकरून आत येणारी गरम हवा थंड होऊन येईल आणि आतील थंड हवा आतच राहील.

• जनावरांना स्वच्छ व थंड पाणी मुबलक प्रमाणात गोठ्यामध्ये उपलब्ध करून द्यावे. मुक्त संचार गोठ्यातील पाणी थंड राहावे त्यासाठी पाण्याच्या टाक्या सिंमेटच्या असाव्यात.शक्य असल्यास त्या पाण्यात मीठ, साखर किंवा गूळ टाकावा.

• जनावरांना जास्त चावावा लागणारा चारा सकाळी किंवा सायंकाळी द्यावे. कारण चारा चावण्यासाठी जनावरांच्या शरीरात अतिरिक्त उष्णता तयार होते. तसेच दुपारच्या वेळेस चरण्यासाठी पाठवू नये.

• ताण सहन करण्यासाठी शरीरातील बिघडलेला क्षारांचा समतोल साधण्यासाठी योग्य प्रमाणात क्षारांचे प्रमाण द्यावे.

• जनावरांना पशूतज्ज्ञांच्या सल्ल्याने औषधोपचार करावेत.

संपर्क - डॉ. रणजीत इंगोले, ९८२२८६६५४४ (स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला )

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com