Hasan Mushrif : मुश्रीफांच्या बंडामुळे गोकुळ, जिल्हा बँक, बाजार समित्यांचा राजकीय पॅटर्न बदलणार?

Hasan Mushrif : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंड केल्यानंतर निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत.
Hasan Mushrif
Hasan MushrifAgrowon

NCP Rebel Hasan Mushrif : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंड केल्यानंतर निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. अजित पवार यांच्याबरोबर आठ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली, त्यात कोल्हापूर जिल्ह्यातील कागलचे आमदार हसन मुश्रीफ यांचा समावेश आहे. मुश्रीफ हे कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुख्य नेते असून जिल्ह्यातील प्रमुख सहकारी संस्थांवर त्यांचे वर्चस्व आहे.

गेल्या वर्षभरापासून मुश्रीफ यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीही मुश्रीफ यांच्यावर विविध यंत्रणांकडून कारवाईच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न झाला होता. त्यांना भाजपमध्ये ओढण्यासाठी खेळी करण्यात आल्याचे आरोप त्यावेळीही झालेले होते.

परंतु इतके दिवस या कारवायांना न बधता शरद पवार यांच्याशी निष्ठा कायम ठेवणाऱ्या मुश्रीफांनी रविवारी मात्र शस्त्रे म्यान करून मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणावर मोठे परिणाम होणार आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या स्थापनेनंतर मुश्रीफांनी पुढाकार घेऊन प्रमुख संस्थांमधील राजकीय समीकरणे बदलून टाकली. महापालिका, बाजारसमित्या, कोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ), कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्यासह काही साखर कारखान्यांमध्ये महाविकास आघाडीचा पॅटर्न राबवला गेला. परंतु आता मुश्रीफ यांनी सत्ताधाऱ्यांना सामील होण्याचा निर्णय घेतल्याने या संस्थांमधील सत्तेची गणिते बदलण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात हसन मुश्रीफ आणि चंदगडचे राजशे पाटील असे राष्ट्रवादीचे दोन आमदार आहेत. दोघांनीही अजित पवार यांना पाठिंबा दिला आहे.

Hasan Mushrif
Hasan Mushrif : जलसंपदा विभागाने कोल्हापूरची वाट लावली; हसन मुश्रीफांचे गंभीर आरोप

दरम्यान या बदलेल्या राजकिय समीकरणात सर्वात मोठी गोची कार्यकर्त्यांची झालेली आहे. राष्ट्रवादीच्या दुसऱ्या फळीतील अनेक नेते द्विधा मनःस्थितीत आहेत. परंतु काही कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली असता जिल्हा बँक, बाजार समिती, गोकुळसह अन्य मोठ्या संस्थांतील राष्ट्रवादीचे संचालक मुश्रीफ यांच्याबरोबर राहतील, असे चित्र आहे. काही संस्थांमध्ये भाजप, शिंदे गट आणि मुश्रीफ गट अशी युती होऊन सत्ता बदल होईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

दरम्यान पन्हाळा, करवीर आणि कोल्हापूर शहरात शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्यासोबत राहण्याची भूमिका घेतलेली आहे.

``आमचे काही मित्र सांगतील त्याप्रमाणे निर्णय घ्यावा लागेल. राधानगरी, भुदगड आणि आजरा या तालुक्यातील कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल.

गोकुळ दूध संघातील राष्ट्रवादीचे संचालक हे अजित पवार, मुश्रीफ यांच्या पाठीशी राहतील. बाजार समितीत तर मुश्रीफ हेच आमचे नेते, तेच आमचा पक्ष अशी संचालकांची भूमिका आहे,`` असे के. पी. पाटील म्हणाले.

Hasan Mushrif
Kolhapur ZP : कोल्हापूर जिल्ह्याला दुषित पाण्याचा धोका, जिल्हा आरोग्य विभागाकडून धक्कादायक आकडेवारी समोर

गोकुळची समीकरणे बदलणार

राज्यातील सर्वात मोठा दूध संघ म्हणून गोकुळची ओळख आहे. दोन वर्षांपूर्वी कॉंग्रेसचे आमदार सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांनी एकत्र येऊन सत्तांतर घडवून आणले होते. परंतु आता मुश्रीफांच्या मंत्रिपदामुळे गोकुळमध्ये नवीन समीकरणे मांडली जाणार का, अशी चर्चा सुरू आहे.

शिंदे गटातील आमदार प्रकाश आबिटकर यांच्याकडे दोन संचालक आहेत. तसेच माजी आमदार चंद्रदिप नरके यांच्यासोबतही काही संचालक आहेत तर भाजप नेते अमल महाडिक यांच्याकडे ४ संचालक आहेत. याचबरोबर मुश्रीफ यांच्या चिरंजीवासह काही संचालक असल्याने गोकुळमध्ये वेगळा पॅटर्न राबवून सतेज पाटील गटाला धक्का दिला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Hasan Mushrif
Gokul Milk Rate : ‘गोकूळ’च्या म्हैस, गायीच्या दूध खरेदीदरात २ रुपये वाढ

जिल्हा बँक चर्चेत

मागच्या काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ईडीच्या रडारवर आली आहे. मुश्रीफ हेच जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष आहेत. आता मुश्रीफ सत्तेत गेल्याने बँकेच्या मागे लागलेला ईडीचा ससेमिरा थांबणार का, याबद्दल उत्सुकता आहे..

विनय कोरे, महादेवराव महाडिक, प्रकाश आवाडे यांच्यासह अन्य नेत्यांसोबत मुश्रीफ आता हातात हात घालून काम करणार का, याबाबत सतेज पाटील यांची भूमिका काय राहणार असे प्रश्न निर्माण झाले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com