Mumbai APMC : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती होणार बरखास्त
Pune News आपापल्या कार्यक्षेत्रातील बाजार समित्यांचे (APMC) संचालकपद संपुष्टात आल्यानंतर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे (Mumbai APMC) १० संचालक अपात्र ठरले आहेत.
यामुळे १८ पैकी १० संचालक अपात्र झाल्याने आणि संचालक मंडळातील सदस्यांकडे सोपविलेली कर्तव्ये पार पाडण्यास सक्षम नसल्याचा निष्कर्ष काढत पणन संचालक विनायक कोकरे यांनी संचालक मंडळ बरखास्त का करण्यात येऊ नये, अशी नोटीस पाठविली आहे.
यामुळे आता मुंबई बाजार समिती बरखास्त करून, शिवसेना भाजपचे प्रशासकीय मंडळ नियुक्तीच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत.
राज्यात सध्या बाजार समित्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. या रणधुमाळीत ग्रामीण भागातील आर्थिक सत्ता केंद्रे ताब्यात घेण्यासाठी मोठ्या राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत.
यातच देशातील सर्वांत मोठ्या समजल्या जाणाऱ्या आणि मुंबईचे मोठे आर्थिक सत्ता केंद्र असलेली मुंबई बाजार समिती ताब्यात घेण्याचे प्रयत्न शिवसेना-भाजपकडून सुरू झाले आहेत.
याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून तांत्रिकदृष्ट्या अपात्र ठरलेल्या संचालकांच्या संख्येमुळे बाजार समितीचे कामकाज सुरळीत सुरू नसल्याचा तांत्रिक मुद्दा उपस्थित करून बाजार समिती बरखास्त करण्याची प्रक्रिया पणन संचालनालयाद्वारे सुरू करण्यात आली आहे.
विविध तांत्रिक मुद्द्यांचा आधार घेत पणन संचालकांनी ८ संचालकांना नोटीस बजावली आहे. या नोटिसीला १८ एप्रिलपर्यंत लेखी खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत. या संचालकांनी त्यांचा समाधानकारक खुलासा न केल्यास पणन कायद्यानुसार कारवाईचा इशारा दिला आहे.
...काय आहे नोटीसमध्ये
बाजार समितीच्या संबंधित घटकांच्या व शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने कामकाज करण्याकरिता गणपूर्तीअभावी तसेच समिती सदस्यांवर सोपविलेली कर्तव्ये पार पाडण्यास बाजार समिती असमर्थ असल्याने आणि त्यामुळे कायदेशीरदृष्ट्या सक्षम नसल्याने मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे अधिक्रमण करणे आवश्यक झाले आहे.
अध्यक्षपदासाठी शिवसेना-भाजपमध्ये रस्सीखेच
बाजार समिती बरखास्त करून त्यावर शिवसेना-भाजपचे प्रशासकीय मंडळ आणून आर्थिक सत्ता केंद्र ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची चर्चा आहे.
यासाठी शिवसेना भाजपमध्ये मोठी रस्सीखेच आणि स्पर्धा होण्याची चिन्हे आहेत. पणन मंत्रालयाचा कार्यभार सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे.
तर बाजार समितीचे कार्यक्षेत्र मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात ठाणे, कल्याण परिसरांत असल्याने प्रशासकीय मंडळाच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयांची वर्णी लागण्याची शक्यता असली, तरी भाजपकडे सहकार मंत्रालय असल्याने भाजपदेखील आपल्या कार्यकर्त्यांची वर्णी लागण्यासाठी प्रयत्नशील असल्याने अध्यक्षपदी शिवसेना की भाजपकडे जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.