Monsoon Update : मॉन्सून अर्ध्यावर; असमाधानकारक पावसामुळे पेराही अर्धवट

Monsoon 2023: राज्यात अजून ५० टक्के पेरण्या बाकी; २२९ तालुक्यांमध्ये अपुरा पाऊस
Monsoon Update
Monsoon Update Agrowon
Published on
Updated on

अॅग्रोवन वृत्तसेवा
Kharif Season Sowing : पुणे ः जुलैचा पंधरवडा संपत आला तरीदेखील राज्यात सर्वत्र समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे खरिपाचा निम्मा पेरा अद्याप अपूर्ण आहे. जवळपास २२९ तालुक्यांमध्ये ७५ टक्क्यांच्या आत पाऊस झालेला आहे. परिणामी, चालू आठवड्यातील मॉन्सूनची वाटचाल उर्वरित भागातील पेरण्यांचे भवितव्य ठरविणारी असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

नाशिक, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, लातूर, अमरावती व नागपूर जिल्ह्यांच्या काही भागांत गेल्या आठवड्यात बहुतेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस झालेला आहे. त्यामुळे उर्वरित पेरण्यांसाठी पोषक स्थिती तयार झालेली आहे. ११ जुलैअखेर शेतकऱ्यांनी राज्याच्या १४२ लाख हेक्टरपैकी ४७ टक्के म्हणजेच ६७ लाख हेक्टरपर्यंत पेरा पूर्ण केला होता. अजून जवळपास ५० टक्के पेरा बाकी आहे. गेल्या वर्षी याच कालावधीपर्यंत १०५ लाख हेक्टरवर पेरा पूर्ण झालेला होता. मागील वर्षीच्या सरासरीच्या पेऱ्याची तुलना करता यंदा २० ते २५ टक्क्यांनी पेरा पिछाडीवर असल्याचे दिसून येते.

Monsoon Update
Monsoon Update : देशात सर्वदूर पोहोचला मॉन्सून

एक जून ते दहा जुलैपर्यंत राज्यातील एकूण पावसाची वाटचाल बघता सांगली, कोल्हापूर, परभणी, हिंगोली, अकोला जिल्ह्यांत ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झालेला आहे. तालुकानिहाय स्थितीचा विचार केल्यास ८८ तालुक्यांमध्ये अपुरा म्हणजेच २५ ते ५० टक्के पाऊस झालेला आहे. १४१ तालुक्यांमध्ये बरा म्हणजेच ५० ते ७५ टक्के पावसाची नोंद झाली आहे.

८८ तालुक्यांमध्ये १०० टक्क्यांपर्यंत तर केवळ ३७ तालुक्यांमध्ये १०० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे. कोकणात पाऊस चांगला असून तेथे भात व नागलीच्या रोपवाटिकांची उगवण अपेक्षित स्थितीत आहे. नाशिक विभागात मात्र पावसाअभावी अनेक गावांमध्ये पेरण्या रखडल्या आहेत. ज्वारी, बाजरी, सोयाबीन, कापूस, मका भुईमूगाच्या पेरा पूर्ण होण्यासाठी तेथे चांगल्या पावसाची आवश्यकता आहे.

Monsoon Update
Monsoon Update : पूर्व विदर्भात मॉन्सून दाखल

पुणे विभागातदेखील हीच स्थिती असून मका, कापूस सोयाबीन, तुरीच्या पेरण्या पावसाअभावी संथगतीने चालू आहेत. कोल्हापूर विभागातही मका, बाजरी, सोयाबीन, भुईमुगाच्या पेऱ्यासाठी अपेक्षित पाऊस झालेला नाही. औरंगाबाद विभागात जवळपास ५५ टक्के पेरण्या खोळंबल्या आहेत. लातूर विभागात अजून ४० टक्के पेरा बाकी आहे.
अमरावती विभागात पेरा ६५ टक्क्यांपर्यंत गेला आहे. मात्र काही गावांमध्ये अजिबात पाऊस झालेला नाही. त्यामुळे १०० मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरा करू नका, असा सल्ला कृषी विभागाने या विभागासाठी जारी केलेला आहे. नागपूर विभागात एकूण पेरा ४६ टक्के झालेला आहे. परंतु, कापूस, तूर, सोयाबीनच्या पेरण्यांसाठी अपेक्षित पाऊस काही भागांमध्ये झालेला नाही, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे.
पावसाची चिंताजनक वाटचाल बघता पंतप्रधान पीकविमा योजनेत अर्ज दाखल करण्यासाठी शेतकरी घाई करीत आहेत. ११ जुलैअखेर राज्यातील २६ लाख ५३ हजार शेतकऱ्यांनी पीकविम्यासाठी अर्ज दाखल केले. त्यामुळे जवळपास १६ लाख ८४ हजार हेक्टर खरीप क्षेत्र विमा संरक्षित झाले आहे, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.



खरीप पेरण्यांची अंदाजे स्थिती
पीक- सरासरी क्षेत्र- - गेल्या वर्षीचा पेरा--चालू वर्षाचा पेरा
धान १५०८३७४----३१८३८५------१६२६६५(११%)
ज्वारी २८८६१५----९१५४८-------४१८५७ (१५%)
बाजरी ६६९०८९----२५५४९८--------६६५९७ (१०%)
नाचणी ७८१४९---८७८९----------२३८५ (३%)
मका ८८५६०८----५९९७४५---------३३४२२२ (३८%)
तूर १२९५५१६---९१०८०५---------५७२४७२ (४४%)
मूग ३९३९५७----२०९४५०----------६४८०४ (१६%)
उडीद ३७०२५२---२४५८०१--------५२७७८ (१४%)
भुईमूग १९१५७५----९८१५७-------४१९०६ (२२%)
तीळ १५१६२--------३४२३---------१३६६ (९%)
कारळे १२४६०------१९४८----------७०५(६%)
सूर्यफूल १३७८०-----६३११----------११०(१%)
सोयबीन ४१४९९१२--३८१४०९५------२५१८३६७(६१%)
कापूस ४२०११२८----३६८७७८२------२८११२५५(६७%)
- सर्व आकडे अंदाजे व हेक्टरमध्ये आहेत.
- कंसातील आकडे सरासरी क्षेत्राच्या तुलनेत यंदा आतापर्यंत झालेल्या पेरणीची टक्केवारी दर्शवितात.


शेवटच्या टप्प्यात चांगला पाऊस होईल, अशी अपेक्षा आहे. पेरा झालेल्या भागांमध्ये शेतकऱ्यांनी मशागतीची काळजी घ्यावी. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे यंदा एक रुपयात पीकविमा मिळतो. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेत सहभाग घ्यावा.
- दिलीप झेंडे, कृषी संचालक, विस्तार व प्रशिक्षण विभाग, कृषी आयुक्तालय

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com