Nagar News : राज्य सरकारकडून गाईच्या दुधाला नुकताच ३४ रुपये प्रति लिटर दर बंधनकारक करण्यात आला आहे. २१ जुलैपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झालेली असतानाच या दूध दरापेक्षा कमी ‘फॅट व एसएनएफ’असलेल्या प्रत्येक पॉइंटला होणाऱ्या ‘रिटर्न दरा’तही वाढ काही खासगी संस्थांनी केल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांत नाराजी निर्माण झाली आहे. सरकारने याप्रश्नी हस्तक्षेप करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
पूर्वी ‘एसएनएफ’ कमी लागला, तर प्रति पॉइंट ३० पैसे व फॅट कमी असेल तर प्रति पॉइंट २० ते पंचवीस पैसे दर कमी केला जायचा. आता ‘एसएनएफ’ प्रत्येक पॉइंटला एक रुपया, तर ‘फॅट’च्या प्रत्येक पॉइंटला पन्नास पैसे प्रति लिटरमागे कमी होणार आहे. परिणामी, त्याचा आर्थिक फटका दूध उत्पादक शेतकऱ्यांनाच सोसावा लागणार आहे.
दर दोन रुपयांनी वाढवले असले, तरी ‘रिटर्न दर’ही वाढविले असल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. दोन महिन्यांपासून दुग्धजन्य पदार्थ, पावडर, बटरचे दर कमी झाल्याचे सांगत दूध डेअऱ्यांनी सात ते आठ रुपये प्रति लिटरमध्ये कमी केले होते.
दर कमी होत असल्याने गाईंचे दर निश्चितीसाठी शासनाने केलेल्या समितीच्या शिफारशीनुसार गाईच्या दुधाला ३४ रुपये दर देण्याच्या निर्णयानंतर डेअऱ्यांनी त्यानुसार खरेदीस सुरुवात केली आहे.
मात्र त्यासोबत कमी फॅट व एसएनएफ असलेल्या (रिटर्न) दुधाचे दरही वाढवले असून, ‘एसएनएफ’च्या पॉइंटला ३० पैशाऐवजी एक रुपया व फॅटच्या प्रत्येक पॉइंटला २० ते पंचवीस पैशांऐवजी पन्नास पैसे कमी होणार आहेत, तसे पत्र काही खासगी दूध संघांनी संकलन केंद्रचालकांना पाठवले आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांना असाही आर्थिक फटका बसणार आहे. राज्यात साधारण ७० सहकारी व ३०० पेक्षा खासगी दूध संघांच्या माध्यमातून दोन ते सव्वादोन कोटी लिटर दुधाचे संकलन होते. सध्याचा दुधाला मिळणारा दर आणि पशुखाद्याचे दर पाहता मिळणारी अर्धी रक्कम पशुखाद्यावरच खर्च होत आहे.
आता ३४ रुपये प्रती लिटर दर देणे बंधनकारक केले असले, तरी रिटर्नचे दर कमी करून दर कमी करण्याचा प्रयत्न सुरूच असल्याचे शेतकरी सांगत आहे. खासगी दूध संघांच्या प्रतिनिधींशी या प्रश्नी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांची प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकली नाही.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.