
Milk Producer : कोल्हापूर ः जिल्ह्यातील दूध संघांनी एक महिन्यापूर्वी केलेली दरकपात सध्याही कायम आहे. नामवंत दूध संस्थांनी एक महिन्यापूर्वी गायीच्या दूध दरामध्ये ३.५ फॅट व ८.५ एसएनएफसाठी प्रतिलिटर २ रुपये कपात केली. १ जुलै पूर्वी गायीच्या दुधाचा दर ३७ रुपये रुपये प्रतिलिटर होता. त्यामुळे गायीच्या दुधाची खरेदी आता ३७ रुपयांवरून ३५ रुपये केली आहे. या कपातीमुळे दूध उत्पादकांची नाराजी कायम आहे. चारा टंचाईसह ‘लम्पी स्कीन’चा प्रादुर्भावही पुन्हा सुरू झाल्याने दुग्धोत्पादक मेटाकुटीला आला आहे.
जिल्ह्यात ५ लाख ३९ हजार लिटर गायीच्या तर ५ लाख ६७ हजार लिटर म्हशीच्या दुधाचे संकलन होते. स्थानिक मातब्बर दूध संघांबरोबर गुजरात, कर्नाटकातील दूध संघही दुधाची खरेदी करतात. शेतकऱ्यांकडून दूध मिळविण्यासाठी काही दूध संघांनी लिटर मागे ५ ते १० पैसे वाढवून दूध मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. तर काही संघांनी अतिरिक्त सुविधा देत दूध संकलन वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत.
गेल्या महिन्यांपासून बहुतांशी दूध संघांनी दर स्थिर ठेवले आहेत. शासनाने ३४ रुपये लिटर या प्रमाणे दर असावा, अशी नियमावली केल्यानंतर अनेक दूध संघांनी दरात बदल केले. जिल्ह्यात मात्र आघाडीच्या दूध संघांनी ३५ रुपयांच्या आसपास दर ठेवले आहेत. जिल्ह्यात खासगी दूध संघांपेक्षा सहकारी दूध संघांचे प्राबल्य जास्त आहे.
जिल्ह्यात सहकारी दूध संघाच्या भूमिकेवरच खासगी दूध संघ आपली दराबाबतची भूमिका ठरवतात. राज्याच्या इतर भागांत खासगी दूध संघांनी दर कमी केले. यामुळे दूध उत्पादक अडचणीत आला. जिल्ह्यात मात्र विशेष करून सहकारी दूध संघांनी दूध घटीचा धोका ओळखून दर कमी करताना काहीशी लवचिक भूमिका घेतली. खासगी दूध संघांनीही सहकारी दूध संघांच्या भूमिकेमुळे दर कमी केले नाहीत.
दोन महिन्यांपूर्वी ३७ रुपयांपर्यंत गायीच्या दुधाचा दर होता. यापूर्वी दर कमी असल्याने उत्पादक तोट्यात होता. ३७ रुपये दर झाल्यानंतर मात्र उत्पादकांमध्ये समाधान होते. पण पुन्हा दर कमी झाल्याने उत्पादकांत नाराजी पसरली आहे. मध्यंतरी पावसाने दडी मारल्याने चाऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला. अगदी बागायती पट्ट्यातही चाऱ्यासाठी वणवण होऊ लागली. यामुळे ऐन पावसाळ्यात दूध उत्पादन घटीचा सामना करावा लागला. भर म्हणून पशुखाद्याच्या दरातही प्रत्येक टप्प्यावर वाढ झाली. याचा फटका दूध उत्पादकांना बसत आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.