अमरावती : उपलब्ध मनुष्यबळाचा नियोजनपूर्वक वापर व संवेदनशील क्षेत्रात नियमित गस्त यामुळे व्याघ्र संरक्षणाबाबत मॉनिटरिंग सिस्टिम फॉर टायगर्स-इंटेसिव्ह प्रोटेक्शन अँड इकॉलॉजिकल स्टेट्सद्वारे निर्धारित निकष पूर्ण करण्यात मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला (Melghat Tiger Project) यश मिळाले आहे.
विशेष व्याघ्र संरक्षण दलाच्या कर्मचाऱ्यांचे सहकार्य व वाईल्डलाईफ क्राईम सेलची गतिमान अन्वेषण कार्यवाही यामुळे व्याघ्र संवर्धनासाठी अपेक्षित निकषपूर्ती शक्य होत आहे. ‘मॉनटरिंग सिस्टीम फॉर टायगर्स-इंटेसिव्ह प्रोटेक्शन अँड इकॉलॉजिकल स्टेट्सद्वारे (एमएसटीआरआयपीईएस) निर्धारित निकष पूर्ण होत आहेत, असे विभागीय वनाधिकारी एम. एन. खैरनार यांनी सांगितले. विशेष व्याघ्र संरक्षण दलात सहायक वन संरक्षक, वनक्षेत्रपाल, वनरक्षक व वननिरीक्षक यांची एकूण ११२ पदे आहेत. विशेष व्याघ्र संरक्षण दलाच्या एकूण तीन तुकड्या तयार करण्यात आल्या आहेत. प्रत्येक तुकडीत वनक्षेत्रपालांच्या अखत्यारीत २७ वनरक्षक व ९ वननिरीक्षक आहेत. गुगामल वन्यजीवन विभाग, परतवाडा येथील चिखलदरा सिपना वन्यजीव विभाग व अकोट वन्यजीव विभाग यात प्रत्येकी एक याप्रमाणे तीन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील ६ वन्यजीव विभागात वनरक्षकांची एकूण ४६० मंजूर पदे आहेत.
मागील दोन वर्षात अमरावती वनवृत्तात १५३ वनरक्षकांची वनपाल पदावर पदोन्नती झाल्याने मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत. त्यामुळे विशेष व्याघ्र संरक्षण दलातील वनरक्षक व वननिरीक्षक यांना नियतक्षेत्राचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. एकूण १०२ वनरक्षक व वननिरीक्षकांपैकी ७१ जणांना संवेदनशील नियतक्षेत्राचा कार्यभार देण्यात आलेला आहे. विशेष व्याघ्र संरक्षण दलाची निर्मिती ही गस्तीद्वारे व्याघ्र संवर्धन करणे या उद्देशाने केली होती.
क्राइम सेलची धडाडी
मेळघाट व्याघ्र प्रकल्पात मेळघाट वाइल्डलाइफ क्राइम सेलची निर्मिती २०१३ मध्ये झाली. हा सेल मेळघाट व्याघ्र प्रकल्प व महाराष्ट्राबरोबरच इतर राज्यातील वन विभागांनादेखील वेळोवेळी सायबर डेटा व गुप्त माहिती पुरविण्याचे काम अविरतपणे करीत आहे. सेलद्वारे मागील एक वर्षात ८८ वन गुन्हा प्रकरणांमध्ये सुमारे १४६ संशयितांना अटक करण्यात आलेली आहे. गत सहा महिन्यांत मेळघाट व्याघ्र प्रकल्पात घडलेल्या चार वन गुन्ह्यांमध्ये सेलद्वारे तातडीने आरोपींना अटक व गुन्ह्यामागील पुरावे शोधून काढण्याची मोलाची कामगिरी पार पडली आहे. या कार्यवाहीमुळे वन्यजीवांसंदर्भातील वनगुन्हेगारीवर चाप बसविणे शक्य झाले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.