
पुणे : भारत सरकारच्या (Indian Government) अर्थ मंत्रालयाद्वारे २६ नोव्हेंबर २०२२ पर्यंत ‘आर्थिक समावेशनातून सशक्तीकरण’ (Empowerment through financial inclusion Project) या प्रायोगिक प्रकल्पांतर्गत पुणे जिल्ह्यातील १ हजार २९४ ग्रामपंचायतींमध्ये मेळावे घेण्यात येत आहेत. त्याची सुरुवात १५ ऑक्टोबरपासून झाली असून, नागरिकांनी या मेळाव्यास उपस्थित राहावे.
तसेच योजनांच्या लाभासाठी अर्ज भरून द्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे. जिल्ह्यातील सुमारे २१ बँकांचा या योजनेत सहभाग आहे. राज्य शासनाचे महसूल, जिल्हा परिषद, पशुसंवर्धन विभाग, कृषी विभाग व मत्स्य विभाग, तसेच गावपातळीवरील तलाठी, ग्रामसेवक, आशा कार्यकर्त्या, कृषी सहायक या मोहिमेत सहभागी झाले आहेत. जिल्ह्यातील सर्व तहसीलदार व गट विकास अधिकारी यासाठी सहकार्य करीत आहेत.
या मोहिमेअंतर्गत प्रधानमंत्री जनधन बचत खाते, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना व अटल पेन्शन योजना या सामाजिक सुरक्षा योजनांसाठी पात्र असलेल्या, मात्र अद्याप त्यामध्ये सहभाग न नोंदविलेल्या ग्रामस्थांना या योजनेचा लाभ देण्यासाठी सहभागी करून घेतले जाणार आहे.
या मेळाव्यांमध्ये शेतकरी क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत पीक कर्जाबरोबरच दुग्ध, पशुपालन, शेळीपालन, कुक्कुटपालन व मत्स्य व्यवसाय इत्यादी व्यवसायांसाठी खेळते भांडवल मिळण्यासाठी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. मुद्रा योजनेअंतर्गत व बचत गटांना खेळते भांडवल व व्यवसायासाठी कर्जाचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी त्यांच्या गावात आयोजित शिबिराच्या दिवशी या योजनांसाठी अर्ज करून सहभाग नोंदवावा. तसेच, या शिबिराचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांना मिळवून देण्यासाठी संबंधित विभागांच्या कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्ह्यात नुकतेच १५ ऑक्टोबर रोजी २८८ गावांमध्ये मेळावे घेतले आहेत. येत्या २९ ऑक्टोबर रोजी २४४, ५ नोव्हेंबर रोजी २१५, १२ नोव्हेंबर रोजी १८९, १९ नोव्हेंबर रोजी १८२, तर २६ नोव्हेंबर रोजी १७६ गावांमध्ये मेळावे घेण्यात येणार आहेत. जिल्हा अग्रणी बँक व जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयीकृत बँका, खासगी बँका, सहकारी व ग्रामीण बँकांच्या सहकार्यातून शिबिरांचे आयोजन केले आहे.
- श्रीकांत कारेगावकर, मुख्य व्यवस्थापक,
जिल्हा अग्रणी बँक, पुणे
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.