Raver Flood : रावेर तालुक्यातील अनेक गावांना पुराचा वेढा

Latest Rain Update : सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही. तरी सावध राहण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. बॅक वॉटरचे पाणी शेती शिवारात व रस्त्यावर आल्याने शेती पिकांचे नुकसान झाले.
Raver Flood
Raver FloodAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : तापी नदीच्या उगम स्थानात आणि मध्य प्रदेशात झालेल्या जोरदार पावसामुळे शनिवारी (ता. १६) तापी नदीला मोठा पूर आला. हतनूर मध्यम प्रकल्पाचे सर्व ४१ दरवाजे उघडूनही त्यातून पुराचे पाणी न निघाल्याने तालुक्यातील गावांमध्ये बॅक वॉटरचे पाणी ऐनपूर, विटवा, निंबोल, पातोंडी, अजनाड, खिरवड आदी गाव, शेतशिवारात शिरले. सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही. तरी सावध राहण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. बॅक वॉटरचे पाणी शेती शिवारात व रस्त्यावर आल्याने शेती पिकांचे नुकसान झाले.

येथील तहसीलदार बी. ए. कापसे मंडळाधिकारी विठोबा पाटील, अजनाडचे उपसरपंच विजय पाटील यांनी भर पावसात अजनाड, अटवाडे या तापी काठावरील गावात जाऊन पाहणी केली व ग्रामस्थांना सतर्कतेच्या सूचना दिल्या. मध्य प्रदेशात अजूनही पाऊस पडत असल्यामुळे प्रशासन स्थितीवर लक्ष ठेऊन आहे.

केळीचे मोठे नुकसान

रावेर तालुक्यात रात्रीपासून मध्यम स्वरूपाचा संततधार पाऊस तापी नदीला पूर आल्याने बँक वॉटरमुळे ऐनपूर निंबोलचा संपर्क तुटला आहे. पाणी शेतीशिवारात शिरल्यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. हवेमुळे झाडे पडल्यामुळे वाहतूक खंडित झाली तर केळीची खोडे आडवी पडून नुकसान होत आहे.

नदी-नाले दुथडी

रात्रीपासून मध्यम स्वरूपाचा संततधार पाऊस होत असल्यामुळे तालुक्यातील सर्वच नदी नाले दुथडी भरून वाहत आहे. तापी नदीला महापूर आल्यामुळे हतनूर धरणाचे बॅक वॉटर शेती शिवार व रस्त्यावर आल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

बॅक वॉटरचे पाणी ऐनपूर, निंबोल, खिरवड, नेहेते, दोधे, अजनाड या गावांच्या रस्त्यावर आले आहे. खानापूर - दोधे व रावेर रेल्वे स्थानकावर झाड पडल्यामुळे काही तास वाहतूक खंडित झाली होती. रावेर शहरासह तालुक्यातील वीजपुरवठा दिवसभर खंडीत होता. याचा परिणाम पाणी पुरवठा व छोट्या उद्योग व्यवसायावर झाला होता.

Raver Flood
Akola Rain : सातपुड्याच्या पायथ्याशी पावसाची जोरदार हजेरी

केळी पिकांचे नुकसान

तालुक्यात रात्रीपासून पावसाबरोबच हवा होती. यामुळे केळी बागेतील केळीची झाडे खाली पडत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

७४ टक्के पाऊस

रावेर तालुक्यात ४९२.१४ (७३.६५) टक्के पाऊस झाला. आज व आज अखेर एकूण मंडळनिहाय पडलेला पाऊस असा. रावेर -२६(५८९), खानापूर -२०(४३६), ऐनपूर - २५(४५१), खिर्डी - २१ (४७३), निंभोरा -२४ (४३७), सावदा -२३(४६७), खिरोदा - २८(५९१). दरम्यान मध्य प्रदेशात पावसाचा जोर कायम असून, महसूल प्रशासनाने तापी काठ व नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला असून, प्रशासन परिस्थितीकडे लक्ष ठेऊन आहे.

Raver Flood
Pune Rain Update : पुणे जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात हलक्या सरी

पाणीपुरवठा विस्कळित

रावेर शहराला होणारा पाणीपुरवठा तापी नदीला आलेल्या पुरामुळे विस्कळीत झाला आहे. ऐनपूरजवळील तापी नदीवरून शहराला पाणीपुरवठा होतो. या पाणीपुरवठा केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्यावर सुमारे १० ते १५ फूट पुराचे पाणी आले आहे. तर या पाणीपुरवठा केंद्राला वीजपुरवठा करणारे २ ट्रान्स्फॉर्मर देखील पाण्याखाली आले आहेत.

यामुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळित झाला आहे. उद्या (ता. १७) सायंकाळपर्यंत देखील तापी नदीतून पाणी वापरता येणार नाही. यामुळे पालिकेच्या कूपनलिकांवरून शहराला पाणी पुरवण्यात येत आहे. यामुळे होणारा पाणीपुरवठा हा उशिरा, कमी वेळ व कमी दाबाने होईल. पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.

आमदारांच्या सूचना

आमदार चंद्रकांत पाटील यांनी ऐनपूर येथेही भेट दिली. ऐनपूर निंबोलसह बॅकवॉटरचा धोका होऊ शकेल, अशा गावांमध्ये घरे आणि गोठे रिकामे करण्यासाठी पोलिसांची ही मदत घेण्यात येत आहे. दरम्यान, तापी नदी काठावरील खिरवड, नेहता रस्त्यावर पुराचे पाणी आले आहे. या गावादरम्यान असलेल्या पुलावर पुराचे सुमारे ३० फूट इतके पाणी आहे.

ऐनपूर-निंबोल-विटवा गावांचा संपर्क तुटला

ऐनपूर, ता. रावेर : तापी नदीला आलेल्या पुरामुळे हतनूर धरणाच्या बॅकवॉटरच्या पाण्याचा फुगवटा मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे या गावांचा संपर्क तुटलेला असून, ऐनपूर येथे बाजार पट्ट्यापर्यंत पुराचे पाणी पोहोचले आहे. ऐनपूर-निंबोल रस्त्यावर पाच फुटापेक्षा अधिक पाण्याची पातळी वाढली असल्याने निंबोल-विटवा गावांशी संपर्क तुटला आहे.

ऐनपूर गावात तिन्ही बाजूंनी पाण्याचा वेढा असून, येथील प्राथमिक उर्दू शाळेत पुराचे पाणी शिरले असून, वर्ग-खोल्या पूर्नताः पाण्यात आहेत. असे वारंवार पूर येत असल्याने येथील स्थानिक लोकांना पुराच्या समस्यांना सामोरे जावे लागते. तसेच जुने निंबोल-विटवा रस्त्यावर सुद्धा पाण्याची पातळी वाढत असल्याने या तिन्ही गावांचा संपर्क तुटलेला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com