Solpaur News : जिल्ह्यात अनेक तालुक्यांत कमी पाऊस झाल्यामुळे टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. निर्माण होणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईच्या अनुषंगाने नियोजन करताना पिण्याच्या पाण्याला प्रथम प्राधान्य देण्यात यावे. तसेच त्याबाबत सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुरुवारी (ता. ७) दिल्या.
जिल्हा नियोजन भवन येथे पाणीटंचाईबाबत बैठक घेण्यात आली. या वेळी पालकमंत्री विखे-पाटील बोलत होते. बैठकीस खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, ओमराजे निंबाळकर, सर्व आमदार बबनराव शिंदे, शहाजी पाटील, समाधान आवताडे, रणजितसिंह मोहिते पाटील, यशवंत माने, सचिन कल्याण शेट्टी, राम सातपुते, प्रणिती शिंदे, राजेंद्र राऊत, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महापालिका आयुक्त शीतल तेली- उगले, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार जिल्ह्यातील सर्व विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
पालकमंत्री विखे-पाटील म्हणाले, की टंचाई काळात पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्यास कोणतीही अडचण भासणार नाही. प्रशासनाने पिण्याच्या पाण्यापासून एकही गाव वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. जिथे पिण्याच्या पाण्याच्या टँकरची मागणी आहे तिथे तातडीने टँकर उपलब्ध करून द्यावेत. संभाव्य दुष्काळाच्या परिस्थितीमुळे पाण्याचा काटकसरीने वापर करणे व त्याबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे.
चाराटंचाईवर मात करण्यासाठी ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता आहे अशा ठिकाणच्या शेतकऱ्यांना चारा उत्पादनासाठी शेतकऱ्यांची नावे पशुसंवर्धन विभागाने तात्काळ नोंदणी करून चारा डेपो सुरू करण्याबाबत नियोजन करावे. जिल्हा परिषदेअंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजना व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मार्फत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनाचे सर्वेक्षण करून त्याबाबत ग्रामसभा घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
टंचाई आराखडा तयार
सध्याची पावसाची परिस्थिती लक्षात घेता पिण्याच्या पाण्याची टंचाई सर्वाधिक जाणवण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने संबंधित गावे व वाड्यासाठी तालुकास्तरावर पाणीटंचाईबाबत विशेष कृती आराखडा शासनास सादर केला असून, यामध्ये जिल्ह्यातील २०७ गावांचा समावेश केला असून, त्यांचा अंदाजित खर्च ६ कोटी ५७ लाख ५६ हजार इतका आहे.
आमदारांनी मांडले प्रश्न
माळशिरस तालुक्यात आठ गावात पिण्याच्या पाण्याचा टॅंकरने पाणीपुरवठा होत आहे. संबंधित गावात चाराटंचाईची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी केली. तर पाणी व चाराटंचाईवर मात करण्यासाठी उजनी धरणातून पाण्याची एक पाळी सोडावी, अशी मागणी आमदार बबनराव शिंदे यांनी केली. म्हैसाळ योजनेत सांगोला, मंगळवेढा तालुक्यातील १७ गावांचा समावेश असून, या योजनेला टंचाईत समावेश करावा, अशी मागणी आमदार समाधान आवताडे यांनी केली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.