Mahur Tambul
Mahur TambulAgrowon

Mahur Tambul GI : ‘माहूर’च्या ‘तांबूल’ला ‘जीआय’साठी तत्त्वतः मान्यता

GI Tag : रेणुकामातेच्या मुख्य प्रसादात आहे समावेश; वैशिष्ट्यपूर्ण चव आणि गंधासाठी आहे प्रसिद्ध

Renukadevi Temple : साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या माहूरच्या रेणुकादेवी मंदिरातील मुख्य प्रसादात समावेश असलेल्या ‘तांबूल’ (Tambul) ला भौगोलिक मानांकनाकरिता (जीआय) तत्त्वत: मान्यता मिळाली आहे. पुरणपोळीच्या नैवेद्यानंतर तांबूलाचा प्रसाद देवीला दाखविला जातो.

तांबूल देवीच्या मुखात ठेवून त्यातील अर्धा भाग भक्त प्रसाद म्हणून सेवन करतात. याशिवाय अनेक जण सहा महिने, वर्षभर पुरेल एवढा तांबूल विकतही घेऊन जातात.

नागवेलीची पाने, काथ, सुपारी, चुना, बडीशेप, ओवा, लवंग, विलायची, कलमी, ज्येष्ठमध, जायपत्री, आसमान तारा, चमन बहार असे साहित्य वापरून तांबूल तयार केले जाते. तांबूल कुटण्यासाठी विशिष्ट प्रकारचा कोदवा दगड वापरला जातो, तोही याच परिसरात मिळतो.

विड्याची पाने विडूळ (ता. उमरखेड) तसेच शेजारील तेलंगणा राज्यातील आदिलाबाद जिल्ह्यातून आणली जातात. आता माहूर परिसरातील लांजी, गुंडवळ अशा काही गावांत ही पाने उपलब्ध होत आहेत.

Mahur Tambul
Mango GI : गुंता हापूस ‘जीआय’चा!

या तांबूलला ‘त्रयोदशी गुणी’ विडाही म्हटले जाते. याचे महत्त्व आयुर्वेदातही सांगितले आहे. पचनास गुणकारी, रक्तशुद्धीकरण तसेच खोकल्यावर उपयुक्त हा विडा मानला जातो.

जेवणानंतर मुखशुद्धीसाठी विडा, तांबूल वापरतात. तिरुपती बालाजी येथील प्रसादाच्या लाडूला मिळालेल्या ‘जीआय’च्या (भौगोलिक मानांकन) पार्श्‍वभूमीवर माहूरच्या तांबूलाचे वेगळेपण आणि औषधी गुणधर्म पाहता ऑगस्ट २०२२ मध्ये यांस जीआयसाठी अर्ज दाखल करण्यात आला होता.

चार महिने त्यावर संशोधन झाले. हा अर्ज जागतिक बौद्धिक संपदा संघटनेने स्वीकारला असून, त्याचा परीक्षण अहवालदेखील आला आहे.

त्यानुसार माहूरच्या तांबूलला ‘जीआय टॅग’साठी तत्त्वतः मान्यता मिळाली आहे. आता लवकरच हा ‘टॅग’ माहूरच्या तांबूलला मिळेल, असे ग्रेट मिशन ग्रुप कन्सल्टन्सीचे (पुणे) चेअरमन प्रा. गणेश हिंगमिरे यांनी सांगितले.


Mahur Tambul
GI Update : ‘जीआय’साठी या पुढे

आमचा पिढीजात तांबूल करून विक्रीचा व्यवसाय आहे. भाविक आपली श्रद्धा आणि नवसानुसार ११ ते ११०० पानांचा तांबूल रेणुकामातेला अर्पण करतात. जीआय मानांकन मिळाल्यावर याची ख्याती अजून वाढेल, त्यातून व्यवसाय वृद्धी पण होईल.
- अमोल गावंडे, तांबूल विक्रेते, माहूर, जि. नांदेड


माहूरच्या तांबूलला जीआय मान्यता मिळण्याची प्रक्रिया चालू असून, ती काही महिन्यांत पूर्ण होऊन हा टॅग मिळेल. महाराष्ट्राला उच्च पातळीवर नेणारा हा आमचा चाळिसावा जीआय ठरेल, याचा आनंद आणि अभिमान आहे.
- प्रा. गणेश हिंगमिरे, चेअरमन, जीएमजीसी, पुणे

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com