ॲग्रोवन वृत्तसेवा
नगर ः अतिवृष्टीच्या (Heavy Rainfall) पावसाने पिकांचे नुकसान (Crop Damage) झाल्याबाबत ६५ हजार ७३४ शेतकऱ्यांनी विमा कंपनीला (Insurance Company) कळवले होते. त्याबाबत बांधावर जाऊन माहिती घेत आतापर्यंत ५० हजारांच्या जवळपास तक्रारीचा निपटारा केला असल्याचे कृषी विभागातून (Agriculture Department) सांगण्यात आले.
नगर जिल्ह्यात मागील महिन्यात अतिवृष्टी, सततचा पावसाने मोठ्या प्रमाणात खरिपातील कापूस, कांदा, तूर व सोयाबीन यासारख्या पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानीचे प्रशासन पंचनामे करत आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांनी पिकांचा पीकविमा उतरला आहे, त्यांनी संबंधित विमा कंपनीला ७२ तासाच्या आत नुकसान झाल्याबाबत माहिती कळविणे बंधनकारक केले होते. मध्यंतरीच्या काळामध्ये विमा कंपनीला कळवूनही विमा कंपनीचे प्रतिनिधी अनेक दिवसानंतरही पाहणी करण्यास आले नव्हते. याबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून ''''ॲग्रोवन'''' ने वस्तुस्थिती मांडल्यानंतर तातडीने दखल घेऊन कृषी विभाग व विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी तातडीने प्रत्यक्ष पाहणीला सुरुवात केली.
नगर जिल्ह्यामध्ये साधारण सव्वा दोन लाख शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभाग घेतला. सप्टेंबर महिन्यामध्ये जोरदार पाऊस झाल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यानंतर आतापर्यंत ६५ हजार ७३४ शेतकऱ्यांनी विमा कंपनीला नुकसान झाल्याबाबत कळवले होते. त्यानुसार विमा कंपनीचे प्रतिनिधींनी व कृषी विभागाचे कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे पिकांचे पाहणी करत आतापर्यंत पन्नास हजारच्या जवळपास तक्रारींचा आतापर्यंत निपटारा केला. असून पाहणी सुरूच असल्याचे कृषी विभागातून सांगण्यात आले. काही शेतकऱ्यांना नुकसानी पोटी अग्रिम रक्कम दिली जात आहे मात्र अग्रिम रक्कम मोजकीच असल्याचे बोलले जात आहे. मिळत असलेल्या रकमेबाबत विमा कंपनी अथवा कृषी विभागाकडून माहिती मिळत नाही.
बहुतांशी शेतकऱ्यांचे शंभर टक्के पिकांचे नुकसान झाले असून त्या तुलनेत विमा कंपनीकडून शंभर टक्के नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी करत आहेत.
आतापर्यंत अकोल्यातून ७१४, जामखेडमधून २९४८, कर्जत तालुक्यातून ५१५, कोपरगाव तालुक्यातून सहा हजार २२२, नगर तालुक्यातून ९५४, नेवासा तालुक्यातून १४ हजार २३, पारनेर तालुक्यातून ७७६ पाथर्डी तालुक्यातून आठ हजार आठशे पासष्ट, राहता तालुक्यातून ७९२३, राहुरी तालुक्यातील ३५०४, संगमनेर तालुक्यातून १५५६, शेवगाव तालुक्यातून १४९७५, श्रीगोंदा तालुक्यातील ५४६, व श्रीरामपूर तालुक्यातून ३०५३ तक्रारी विमा कंपनीकडे दाखल झालेल्या आहेत,
विमा कंपन्यांबाबत नाराजी कायम
नगर जिल्ह्यात शेतकऱ्यांनी पीक नुकसान झाल्याबाबत तक्रारी केल्यानंतर त्याचा निपटारा केला जात असल्याचे सांगितले जात आहे. मात्र तरीही विमा कंपन्यांबाबत शेतकऱ्यांची नाराजी कायम आहे. ज्या प्रमाणात नुकसान झाले, त्या प्रमाणात मदत दिली जात नसल्याच्या तक्रारी शेतकरी करत आहेत. पीकविमा कंपनी विमा भरून घेते, मात्र भरपाई देण्याबाबत गांभीर्याने घेत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.