
Pune News : शारदानगर (ता. बारामती ) येथील नीरा डावा कालव्याचे अस्तरीकरण शेतकऱ्यांनी सोमवारी (ता.१७) बंद पाडले. अनेक वर्षांपासून ओलिताखाली आलेल्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडवा, उचल पाण्याला अधिकृत परवाना द्या आणि नंतर काम चालू करा, अशी आग्रही मागणी करीत अनेक शेतकऱ्यांनी जलसंपदा खात्याच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. पाण्याअभावी मरण्यापेक्षा पाण्यासाठी आंदोलन करून मरू, अशी आक्रमक भूमिका यावेळी आंदोलक शेतकऱ्यांनी घेतली.
‘‘शारदानगर व मेडद आदी ठिकाणच्या शेतीला पाण्याची टंचाई होणार नाही, याबाबत काय धोरणात्मक निर्णय घेता येतो का, याची चर्चा जलसंपदा खात्यामधील वरिष्ठांशी केली जाईल. तसेच संबंधित शेतकऱ्यांची गावनिहाय स्वतंत्र बैठक घेऊन त्यांचे म्हणणे ऐकले जाईल.
त्यानंतरच सर्वानुमते दुरवस्था झालेल्या कालव्याचे मजबुतीकरण केले जाईल,’’ असे लेखी म्हणणे उपविभागीय अभियंता आश्विन पवार यांनी आंदोलकांना दिले. अधिकाऱ्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत आंदोलक रविराज तावरे, अर्जुन यादव, शिवराज पवार आदी शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.
पाऊस लांबला आहे. पाण्याची मागणी वाढली आहे. नीरा देवधर धरणातील अतिरिक्त पाणी कमी होणार आहे. या प्रतिकूल स्थितीमुळे शेतीच्या पाण्याची भविष्यात होणारी टंचाई विचारात घेऊन जलसंपदा खात्याच्या अधिकाऱ्यांनी नीरा डावा कालव्याचे अस्तरीकरण व मजबुतीकरण करण्यावर सध्या अधिकचा भर दिला आहे. त्यामध्ये शारदानगर, मेडद आदी ठिकाणी सध्या कालव्याच्या कामाला वेग आला होता.
कालव्याचे अस्तरीकरण झाले तर आमच्या शेतीला पाणी मिळणार नाही, जमिनी ओसाड पडतील, अशी ठोस भूमिका घेत अनेक आंदोलक शेतकऱ्यांनी सोमवारी (ता. १७) जलसंपदा खात्याचे काम बंद पाडले. अस्तरीकरणाचे साहित्य कालव्याबाहेर काढायला लावले. त्यावेळी उपविभागीय अभियंता आश्विन पवार यांनी संबंधित आंदोलनकर्त्यांची चर्चा केले व त्यांचे म्हणणे जाणून घेतले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.