विनोद इंगोले ः ॲग्रोवन वृत्तसेवा
Leenta Waghmare : वर्धा ः कौटुंबिक जबाबदाऱ्या असतानाही नवे काही करण्याची जिद्द असलेल्या लीनता वाघमारे (शेळके) यांनी राज्यात कृषी क्षेत्रातील पहिल्या महिला ड्रोन पायलट होण्याचा मान मिळविला आहे. ग्रामीण भागातून आलेल्या लीनता यांनी आता याच क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला आहे. खासगी कंपनीच्या माध्यमातून त्या ड्रोनद्वारे कीटकनाशक फवारणीसाठीच्या सेवा सशुल्क देणार आहेत.
बोरगाव मेघे (वर्धा) हे लीनता यांचे सासर. त्यांचे वडील प्रभाकर शेळके हे शेतकरी. शेतकरी कुटुंबातून आलेल्या लीनता यांचे शिक्षण बीएससी (कृषी) व एमएससी (बॉटनी)पर्यंत झाले आहे. २०१८ मध्ये त्यांचा झडशी (ता. सेलू, जि. वर्धा) येथील प्रीतम वाघमारे यांच्याशी विवाह झाला. त्यांचे पती प्रीतम हे वर्धा अर्बन बॅंकेत धामणगावरेल्वे शाखेत नोकरीला आहेत. साडेतीन वर्षांचा मुलगा आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या असतानाही लीनता यांना सातत्याने नवे काही तरी करण्याची जिद्द स्वस्थ बसू देत नव्हती.
दरम्यान, पुणे येथील एका कंपनीद्वारे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात दोन ड्रोन पायलटची नियुक्ती केली जाईल, असे त्यांच्या वाचनात आले. त्यासाठी सात दिवस कालावधीचे प्रशिक्षण दिले जाणार होते. संबंधित कंपनीकडे त्यांनी नियमानुसार अर्ज केला आणि त्यांची प्रशिक्षणार्थी म्हणून निवडही झाली. आता त्यांना ड्रोन पायलट म्हणून अधिकृत परवानाही मिळाला आहे. परिणामी, त्यांचा उत्साह व्दिगुणीत झाला आहे. सध्या त्यांचा प्रशिक्षणार्थी (प्रोबेशनरी) कालावधी आहे. वर्धा जिल्ह्यात ड्रोन पायलट म्हणून काम करणार आहे. कृषी क्षेत्रात कीटकनाशक फवारणीकामी ड्रोन सेवा देणाऱ्या त्या पहिल्या महिला पायलट ठरल्या असल्याने सर्वदूर त्यांचे कौतुक होत आहे.
ड्रोनच्या वापरामुळे शेतीची उत्पादकता वाढते. वेळ, श्रम, पैसे, मजूर यांची बचत होते. रसायनांचा वापर कमी झाल्यामुळे पर्यावरणाची हानी कमी होते. त्यामुळे शेतीत ड्रोनचा वापर वाढत चालला आहे.
ड्रोनच्या वापरासाठी नागरी विमान उड्डाण महासंचालनायलयाच्या (डीजीसीए) विविध परवानग्या आणि परवाना लागतो. आजमितीला देशात केवळ पाच कंपन्यांकडे डीजीसीए मान्यताप्राप्त ड्रोन आहेत. ड्रोन भाडेतत्त्वावर देणाऱ्या पुरवठादारांची संख्या १५ च्या आसपास आहे.
महाराष्ट्रात `सलाम किसान` या कंपनीकडून शेतकऱ्यांना भाडेतत्त्वावर ड्रोनची सेवा पुरवली जाते. या कंपनीकडून ग्रामीण तरूणांना ड्रोन पायलट प्रशिक्षणही दिले जाते.
राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात दोन कृषी पायलटची नियुक्ती केली आहे. वर्धा जिल्ह्यात देखील माझ्यासह दोन पायलट आहेत. ५५० रुपये प्रतिएकर प्रमाणे ड्रोनच्या माध्यमातून फवारणी करण्यासाठी शुल्क आकारले जाईल. पहिली महिला ड्रोन पायलट म्हणून हा माझ्यासाठी निश्चितच नवा अनुभव ठरेल.
- लनीता वाघमारे (शेळके),
कृषी ड्रोन पायलट, वर्धा
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.