Agriculture Drone : ड्रोन पायलट ट्रेनिंग महागडे आहे का? ग्रामीण तरूणांसाठी हे करियर होऊ शकते का?

Drone Technology : ड्रोन पायलट ट्रेनिंग खूप महागडे आहे. हा कोर्स पूर्ण करण्यासाठी साधारणपणे ८० हजार रूपयांचा खर्च येतो.
Agriculture Drone
Agriculture DroneAgrowon
Published on
Updated on

Agriculture Drone Update : काही वर्षांपूर्वीपर्यंत शेतीमध्ये ड्रोनचा वापर ही एक नवलाईची गोष्ट होती. पण आता ठिकठिकाणी ड्रोनचा वापर मोठ्या प्रमाणावर सुरू झाला आहे. यापुढील काळात शेतीच्या विविध कामांसाठी ड्रोनचा वापर ही एक सर्वसाधारण गोष्ट बनलेली असेल.

केंद्र सरकार ड्रोन वापराला प्रोत्साहन देत आहे. केंद्राने ड्रोनसाठी अनुदान देण्याचा निर्णय घेतला. तसेच ड्रोनद्वारे कीडनाशक फवारणीसाठी सुधारित मार्गदर्शक सूचनाही प्रसारित करण्यात आल्या आहेत.

दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रातही शेतीमध्ये ड्रोनचा वापर करण्यासाठी कृषी विद्यापीठे आणि संशोधन संस्थांनी अनेक प्रकल्प हाती घेतले आहेत.

तसेच ड्रोनची वाढती बाजारपेठ लक्षात घेता महाराष्ट्राला जागतिक दर्जाचे 'ड्रोन हब' बनवण्यासाठी धोरण आखले जाणार आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत ‘महाराष्ट्र मिशन ड्रोन’ प्रकल्पाला मान्यता देण्यात आली.

शेतीमध्ये अनेक कामांसाठी ड्रोनचा प्रभावी आणि परिणामकारक वापर होतो. पिकांवर किडनाशकांची फवारणी, खते देणे, पिकांची पाहणी, पीक वाढीचे निरीक्षण, जिओ फेन्सिंग, पीक आरोग्य तपासणी, पशुधन व्यवस्थापन, सिंचन व्यवस्थापन, भूमी अभिलेखाच्या नोंदी आदी गोष्टींसाठी ड्रोनचा वापर अत्यंत फायदेशीर ठरतो.

ड्रोनद्वारे किडनाशकांची फवारणी करण्याचे प्रमाण वाढत आहे. गरजेइतकाच किडनाशकांचा वापर , पाणी, खते व रसायनांची बचत, अचूक आणि कार्यक्षम फवारणी, मजुरीची बचत, पर्यावरणावरील घातक परिणामांमध्ये घट असे याचे अनेक फायदे आहेत.

Agriculture Drone
Agriculture Drone : ड्रोनचा प्रभावीपणे वापर करावा : कुलगुरू डॉ. मणी

परंतु ड्रोनचा वापर कोणालाही करता येत नाही. ड्रोन चालविणाऱ्या व्यक्तीकडे नागरी उड्डायन मंत्रालयाच्या महासचिवांनी दिलेला युनिक आयडेंटिफिकेशन नंबर (युआयएन) आणि अनमॅन्ड एअरक्राफ्ट ऑपरेटर परमीट (युएओपी) असणे बंधनकारक आहे.

थोडक्यात एखाद्याने ड्रोन पायलट ट्रेनिंग पूर्ण करून त्याचे प्रमाणपत्र मिळवले तरच ड्रोनचा वापर करता येऊ शकतो.

ग्रामीण भागातील तरूणांसाठी या क्षेत्रात खूप संधी आहेत. परंतु अडचण एकच आहे. हे ड्रोन पायलट ट्रेनिंग खूप महागडे आहे. हा कोर्स पूर्ण करण्यासाठी साधारणपणे ८० हजार रूपयांचा खर्च येतो.

ही अडचण लक्षात घेऊन काही संस्था ग्रामीण तरूणांना ड्रोन पायलट ट्रेनिंग देण्यासाठी पुढे आल्या आहेत. सलाम किसान ही त्यापैकीच एक संस्था. या संस्थेच्या माध्यमातून कृषी मूल्य साखळीतील सर्व घटकांना एन्ट टू एन्ड सेवा पुरवली जाते. त्याचाच एक भाग म्हणून ग्रामीण रोजगारनिर्मिती आणि तरूणांमधील कौशल्य विकास या क्षेत्रांतही ही संस्था काम करत आहे.

ग्रामीण भागातील तरूणांना विनामूल्य ड्रोन पायलट ट्रेनिंग देण्याचं काम या संस्थेने सुरू केले आहे. संस्थेने आतापर्यंत या प्रशिक्षणासाठी ३० तरूणांची निवड केली आहे. त्यांचा प्रशिक्षण कार्यक्रम आजपासून (ता. २१) सुरू होत आहे.

Agriculture Drone
Drone Hub : महाराष्ट्राला जागतिक दर्जाचे 'ड्रोन हब' बनवणार : देवेंद्र फडणवीस

अशा प्रकारच्या प्रशिक्षण कार्यक्रमामुळे ग्रामीण तरूणांना ड्रोन पायलट म्हणून करिअर करण्याची संधी मिळू शकते. ग्रामीण भागात बेरोजगारीचा प्रश्न उग्र झाला आहे.

ग्रामीण तरूणांना व्यावसायिक प्रशिक्षण मिळाले तर रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. त्या दृष्टीने ड्रोन प्रशिक्षण हा एक महत्त्वाचा उपक्रम ठरणार आहे. तसेच या माध्यमातून प्रशिक्षित पायलट उपलब्ध झाल्यामुळे शेतीमध्ये ड्रोनचा वापर वाढेल.

त्याचा शेतकऱ्यांना थेट फायदा होईल. ग्रामीण भागात प्राथमिक पायाभूत सुविधांची उभारणी झाली तरच नव-नवीन तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये वापर मोठ्या प्रमाणावर वाढेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com