
Nagpur News :जगात प्रतिमाणशी जमीनधारणा (Land Holding) कमी झालेल्या देशांमध्ये भारत हा एकमेव आहे. त्यातही लागवडीयोग्य जमिनीचे क्षेत्र (Agriculture Land) प्रतिव्यक्ती ०.११ हेक्टर इतकेच आहे. भविष्यात हे क्षेत्र कुटुंबाचे विभाजन झाल्यानंतर आणखी कमी होणार आहे.
याची दखल घेत जमीन अकृषिक (Non Agriculture Land) करताना कृषक आणि अकृषिक जमिनीचे डिमार्केशन होणे गरजेचे आहे, असे मत राष्ट्रीय मृदा संशोधन व जमीन उपयोगिता संस्थेचे संचालक डॉ. नितीन पाटील (Dr, Nitin Patil) यांनी व्यक्त केले.
डॉ. पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत हा जगातील एकमेव देश आहे, जिथे जमीनधारणा प्रतिमाणसी कमी झाली आहे. लागवडीयोग्य जमिनीचे क्षेत्र प्रतिव्यक्ती ०.११ हेक्टर इतकेच आहे.
पहिली समस्या म्हणजे अतिशय कमी क्षेत्रावर शेती करणे परवडत नाही. अशा छोट्या क्षेत्रासाठी यांत्रिकीकरण फायदेशीर ठरत नाही. परिणामी मजुरांच्या भरवशावर असलेल्या या शेतीत खर्च वाढीस लागतो.
व्यवस्थापनावर मजुरांमुळे अधिक खर्च होतो. छोट्या क्षेत्रासाठी यांत्रिकीकरण परवडणारे नसते. वातावरणातील बदलाचा परिणाम होतो. लहान जमीनधारणा असलेल्या शेतकऱ्यांसमोर आता नव्या अडचणींची भर पडली आहे.
‘‘दरम्यान, गृहनिर्मिती, रस्ते, वीज यासह इतर पायाभूत सुविधांसाठी जमिनीला मागणी राहते. ३३ टक्के भूभाग जंगलासाठी ठेवावा लागतो. अशातूनच मग संघर्ष वाढतो. त्यामुळे जगात कुठेही नसेल इतके मोठे जमीन उपयोगितेचे आव्हान भारतापुढे आहे.
त्या पार्श्वभूमीवर सुपीक जमीन टिकविणे आणि तिचे अस्तित्व राखणे गरजेचे आहे. त्याकरिता अशी जमीन डिमार्क करावी लागणार आहे,’’ डॉ. पाटील म्हणाले.
‘‘सध्या जिल्हाधिकारी त्यांच्या अधिकारात जमीन अकृषिक करण्याचा निर्णय घेतात. परंतु भविष्यातील अन्न सुरक्षेचा आढावा किंवा समीक्षण त्यांच्याव्दारे होत नाही.
ही बाब गांभीर्याने घेण्याची गरज आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या स्तरावर सरसकट जमीन अकृषिक न करता त्याची पडताळणी केली पाहिजे.
त्यातच इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात झपाट्याने शहरीकरण, औद्योगीकरण होत असल्याने या समस्या अधिक विक्राळ रुप धारण करीत आहेत. याच राज्यात सिंचनाच्या सोयी देखील मर्यादित आहेत. त्यामुळे या भागातील शेती ही निसर्गावरच अवलंबून आहे.’’
‘जमिनीचा विषय गांभीर्याने घ्यावा’
आपल्या भागातील मातीचे गुणधर्म कोणत्या पीकपध्दतीला पोषक आहेत. याचाही विचार पीक लागवडीवेळी होत नाही. परिणामी निसर्गावर अवलंबित्व असलेल्या शेतीमधून अपेक्षित उत्पादकता मिळत नाही. या साऱ्या कारणांचा विचार करता येत्या काळात जमीन उपयोगितेचा विषय गांभिर्याने घेण्याची गरज आहे,’’ असेही डॉ. नितीन पाटील यांनी सांगितले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.