
सोलापूर ः आगामी वर्ष २०२३ मध्ये आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष (Millet Year) साजरे होणार आहे, या पार्श्वभूमीवर कृती आराखड्यातील इतर कामांसह लघूतृणधान्य व पौष्टीक तृणधान्य यांचा प्रचार व प्रसार करण्यावर भर देण्याचा निर्णय कृषी विज्ञान केंद्राच्या (KVK) शास्त्रीय सल्लागार समितीच्या बैठकीत झाला.
कृषि विज्ञान केंद्राची २२ वी शास्त्रीय सल्लागार समिती सभा नुकतीच झाली. त्यात हा निर्णय झाला. शबरी कृषी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रदीप गायकवाड अध्यक्षस्थानी होते. तर दूरस्थ पद्धतीने अटारी पुणेचे संचालक डॉ. लाखनसिंग व महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे प्रभारी विस्तार शिक्षण संचालक डॉ. टी. के. नरोटे, कृषी विज्ञान केंद्र सोलापूरचे वरीष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. लालासाहेब रा. तांबडे, विभागीय कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. विजय अमृतसागर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी विवेक कुंभार, ‘नाबार्ड’चे जिल्हा व्यवस्थापक नितीन शेळके, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राचे प्रधान शास्त्रज्ञ डॉ. दिनेश बाबू, शेतकरी सभासद म्हणून कृषिभूषण नागेश नन्नवरे, किणीवाडीचे सचिन बिराजदार, पानमंगळूरचे नान्नजकर, उद्योजिका वनिता तंबाखे, अनिता माळगे उपस्थित होते.
गायकवाड म्हणाले, की शेतकरी केंद्रस्थानी ठेऊन कृषी विज्ञान केंद्राचे विशेष प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये सर्व कृषी संलग्न विभागाचे कार्यक्षम सहकार्य हवे आहे. याद्वारे शेतकऱ्यांची सेवा करण्यासाठी आपण सर्वजन कटिबद्ध आहोत. विभाग प्रमुखांनी दिलेल्या सूचनांचा अंतर्भाव कृषी विज्ञान केंद्र, सोलापूरच्या कृती आराखड्यामध्ये केला जाईल, असे सांगितले. डॉ. तांबडे यांनी सभेसमोर मागील शास्त्रीय सल्लागार सभेने सूचविलेल्या सूचनांवर झालेल्या कार्यवाहीचे सादरीकरण केले. प्रदीप गोंजारी यांनी सूत्रसंचालन केले.
कृती आराखड्याचे सादरीकरण
कृषी विज्ञान केंद्र, सोलापूरच्या २०२३ च्या कृषी आराखड्याचे कृषिविद्या, पीक सरंक्षण, उद्यानविद्या, पशुविज्ञान,गृहविज्ञान, कृषी विस्तार, मृदा विज्ञान, संगणक, प्रक्षेत्र व्यवस्थापक इत्यादी विभागांचे सादरीकरण करण्यात आले. विषय विशेषज्ञ अमोल शास्त्री, समाधान जवळगे, विकास भिसे, डॉ. प्रकाश कदम, अनिता सराटे, प्रदीपकुमार गोंजारी, राजेंद्र नेहे, विवेक माने, व डी. एन. मूर्ती यांनी सादरीकरण केले.
पीक प्रात्यक्षिकांची पाहणी
उपस्थित सदस्यांनी कृषी विज्ञान केंद्र, सोलापूरच्या पीक प्रात्यक्षिकांना भेट दिली. यामध्ये ज्वारी, गहू, हरभरा, सोयाबीन, करडई, मका, हुरडा, राळा, वरई, रागी, वांगी, टोमॅटो, भेंडी, मिरची, ढोबळी, कलिगंड, खरबूज, बीट, गाजर, कोबी, फ्लावर, झेंडू, डाळिंब, चारापिके, हायब्रिड नेपिअर, डी.एच.एन-६, दशरथ, मारवेल इत्यादी पिकांची पाहणी करण्यात आली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.