दत्तपूर (वर्धा) येथे ग्रामोपयोगी विज्ञान केंद्राने शेतकऱ्यांसाठी सुमारे १०० पर्यंत विविध तंत्रे खुली केली आहेत. यात सिंचन, पूरक उद्योग, अवजारे, अन्नप्रक्रिया, टाकाऊपासून टिकाऊ अशा विविध पर्यावरणपूरक तंत्रांचा समावेश आहे. शेतकऱ्यांचे अर्थकारण सक्षम व्हावे, रोजगारनिर्मिती व्हावी हा उद्देशाने कार्यरत या केंद्रात प्रशिक्षणाचीही सोय करण्यात आली आहे. पारंपरिक आणि आधुनिक विज्ञानाची सांगड घातली, तर गावे समृद्ध होतील असा विचार ज्येष्ठ गांधीवादी डॉ. देवेंद्रकुमार यांनी मांडला. त्याच विश्वासातून दत्तपूर (वर्धा) येथे ग्रामोपयोगी विज्ञान केंद्राची स्थापना १९८४ मध्ये झाली. संस्थेच्या अध्यक्षा डॉ. विभा गुप्ता आज केंद्राची जबाबदारी समर्थ सांभाळत आहेत. केंद्राने सुमारे शंभरपर्यंत तंत्रे विकसित केली आहेत. त्यासंबंधी प्रशिक्षणही देण्यात येते. विक्रीही करण्यात येते. शेतकऱ्यांचे अर्थकारण सक्षम व्हावे, लघुउद्योग उभारणीतून ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती व्हावी हा त्यामागील उद्देश आहे. ग्रामविकासाला पूरक असलेल्या विज्ञानाला झोपडीत पोचविण्यासाठी संस्थांची गरज डॉ. देवेंद्रकुमार यांनी व्यक्त केली. वैज्ञानिकांना गावातील समस्यांची जाण करून देणे आणि गावपातळीवर वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे हे त्यांना अपेक्षित होते. केंद्राचा पर्यावरणीय विज्ञान व तंत्र विभाग आहे. त्याची जबाबदारी तंत्रज्ञ म्हणून सुनील रघाटाटे पाहतात. २५ वर्षांच्या काळात सुमारे सव्वा लाख शेतकऱ्यांनी केंद्राला भेट दिली असून, दरवर्षी पाच हजार शेतकरी येत असल्याचे त्यांनी सांगितले.
संस्थेने तयार केलेली निवडक तंत्रे मातीची घरे केंद्रामार्फत माती व चुन्यापासून गोल कवेलू पद्धतीची कमी खर्चिक पर्यावरणपूरक घरे बांधून देण्यात येतात. उन्हाळ्यात थंड, हिवाळ्यात उष्ण आणि पावसाळ्यात दमट असे त्यांचे वैशिष्ट्य आहे. देशभरात चार हजारांवर घरे बांधली आहेत. गुजरात राज्यातील भूजमध्ये २००१ मध्ये आलेल्या भूकंपानंतर १३० वस्तींचे ‘इको व्हिलेज’ केंद्राने वसविले. गोल्डावाडी (जि. हिंगोली) गाव, तसेच इंदिरा आवास योजनेतील दोन हजारांवर घरे याच धर्तीवर बांधली आहेत. बारा बलुतेदार व्यवस्थेतील घटकांना या तंत्रज्ञानामुळे रोजगार मिळण्यास मदत झाली. पंधरा राज्यांत एक लाखांपेक्षा अधिक स्वच्छतागृहेही उभारली आहेत.
टाकाऊपासून टिकाऊ केळीच्या बुंध्यापासून कागद, ‘लेटरपॅड’, ‘फाइल्स’, ‘बोर्ड’ आदी उत्पादने तयार केली आहेत. झाडांची तोड थांबून पर्यावरण रक्षणाचा उद्देश त्यातून साधला आहे. काही ठिकाणी तागाच्या पिशव्यांचा वापर केला आहे.
हानी न पोहोचवता मधपालन आग्या मधमाशी व सातेरी मधमाशीपालनाला प्रोत्साहन दिले आहे. असंख्य आदिवासींना त्याचे प्रशिक्षण दिले आहे. आदिवासींकडून वर्षभरात सुमारे ३०० पोळ्यांमधून मध काढला जाते. मधमाशांना कोणतीही हानी न पोचवता धुराडे व अन्य साहित्याचा वापर केला जातो. पोळ्यातील मध आणि वॅक्स (मेण) हेच कप्पे कापून उर्वरित भाग तसाच ठेवला जातो. मध काढताना ‘हॉरिझन्टल फोर्स’चा वापर होतो. त्यामुळे पोळ्यातील अंडीपुंज मधात मिसळत नाही. परिणामी, शुद्ध मध मिळतो. या प्रक्रियेत मधमाश्यांचे त्या भागातील स्थलांतरही रोखता येते. छत्तीसगड राज्यात अशा प्रकारे कार्य करण्यात येणार असून, राज्य सरकारने त्यासाठी संमती दिली आहे. सद्यःस्थितीत ८ राज्यांतील २९ जिल्ह्यांत त्याची अंमलबजावणी झाली आहे.
बायोगॅस उभारणी पाच हजारांवर जैवइंधन वायू (बायोगॅस) संयंत्रे बसविली. हजारांवर बांधकाम व्यावसायिकांना त्याचे शास्त्रीय प्रशिक्षण दिले. या माध्यमातून गावागावात बायोगॅस उभारणी चळवळीचे रूप घेऊ शकते. प्रकल्पातील स्लरीचा पुनर्वापर करण्याचे खड्डा तंत्र (पीट) तयार केले आहे. यात वरच्या बाजूस गवत टाकले जाते. पीटच्या खालील बाजूस स्लरीचे पाणी तर वरील बाजूस घन स्वरूपातील शेण मिळते. स्लरीचे पाणी काढून ते बायोगॅसमध्ये वापरल्यास इंधन म्हणून तर शेणाचा वापर शेतात करणे शक्य होते. झिरपी सिंचन पाण्याचा काटेकोर वापर करण्यासाठी झिरपी सिंचन (इमिटर इरिगेशन सिस्टीम) पद्धतीचा वापर केला जातो. यात काळी, पांढरी आणि भस्वा (पहाडावरील) माती, सोबत घोडीची लीद, ती उपलब्ध नसल्यास लाकडी भुस्सा यांचा वापर होतो. मातीला विशिष्ट लोखंडी सळईत टाकून भाजले जाते. या मातीच्या गोळ्यांचा वापर या पद्धतीत होतो. झाडाच्या गरजेनुसार पाणी देणे याद्वारे शक्य होते. सेंद्रिय खते चारटाकी (बेड्स) पद्धतीने गांडूळ खतनिर्मिती तंत्र तयार केले आहे. पहिल्या बेडमध्ये खत तयार झाल्यानंतर पुढील बेड्समध्ये गांडुळांसाठी खाद्य तयार ठेवले जाते. त्या अपेक्षेने त्यांचे पुढे स्थलांतर होतील. पारंपरिक पद्धतीत हाताने गांडूळ काढून वेगळे करण्याचे काम यात सोपे होते. गांडुळे मरण्याचे प्रमाण कमी होते. नाडेप तसेच शेण, गोमूत्र, गूळ, धान्य यांचा वापर करून सात दिवसांत खत निर्मिती केली जाते. ‘वॉटर फिल्टर’ चंद्रपूर भागात फ्लोराइडयुक्त पाण्याची समस्या होती. त्यावर उत्तर शोधण्यासाठी ‘वॉटर फिल्टर’ विकसित केला आहे. यात धानाच्या (भात) कुसाची राख वापरली जाते. प्रक्रियेत हायड्रोक्लोरिक ॲसिड, वाळू, सिमेंट यांचा वापर होतो. फिल्टर बेडला प्लॅस्टिकची बारीक जाळी लावली आहे. त्यास झाकण लावून १२० छिद्रे पाडली आहेत. यातून क्लोराइड, फ्लोराइड, नायट्रेट व काही हानिकारक जिवाणू वेगळे होऊन शुद्ध पाणी मिळते. वनस्पतिजन्य अर्कापासून कीडनाशके बेशरम व निंबोळीसारख्या वनस्पतिजन्य अर्कापासून कीडनाशके तयार केली जातात. कपाशी पिकासाठी ते उपयोगी ठरल्याचे अनुभवास आले आहे. बेशरम ही भूगर्भातील पाणी सर्वाधिक खेचणारी वनस्पती आहे. त्याचा अशा प्रकारे उपयोग झाल्यास पर्यावरणाचे संतुलन राखता येईल असा विश्वास डॉ. विभा व्यक्त करतात. दशर्पणी अर्क तयार केला जातो. गोमूत्र व कडुनिंबाची पाने एका माठात १५ दिवस भिजत ठेवली जातात. गाळून फवारणीसाठी वापर होतो. हे अर्क तयार करण्याचे प्रशिक्षणही दिले जाते. वन-उपजांचे मूल्यवर्धन जंगलात वन-उपजांमध्ये डिंकाचा समावेश आहे. प्रति झाडापासून ६० ग्रॅमपर्यंत डिंक मिळतो. केंद्राने संजीवक उपचारातून तो अर्धा किलोपर्यंत मिळविण्यात यश मिळविले. थेट न विकता त्यापासून लाडू, पापड, पॉपकॉर्न, चिक्की, गोळ्या, ब्रेड स्प्रेडर आदी तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. मूल्यवर्धनातून शेतकऱ्यांचा नफा वाढावा हा उद्देश आहे. जंगलातील कंदमुळे लागवड, मोहापासून सरबत, चारोळीपासून उपपदार्थ यांचेही प्रशिक्षण देण्यात येते.
अवजारे निर्मिती केंद्राच्या कार्यशाळेत कल्टिव्हेटर, तिफण, हॅन्डवीडर, हस्तचलित चाफकटर आदी उपकरणे उपलब्ध आहेत. बॉल बेअरिंग व बेल्ट यांचा वापर करून बैलगाडी तयार केली आहे. त्यासाठी कमी वजनाचे पाइप साहित्य वापरले आहे. वजन २८५ किलो आहे. सुमारे २५ हजार रुपयांपर्यंत विक्री केली आहे.
संपर्क : सुनील रघाटाटे, ९३७२४७०४०५ डॉ. विभा गुप्ता, ९४२२९०३०३१
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.