
Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यात मागच्या २० दिवसांत झालेल्या पावसाने अनेक नद्यांना पूरस्थिती निर्माण झाली होती. राधानगरी, कोयना आणि चांदोली धरणातून सुटलेला पाण्याचा विसर्ग आणि पावसाने नद्या पात्राबाहेर गेल्यामुळे जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत पिकांचे नुकसान झाले.
यावर कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी जिल्ह्यात पाऊस आणि पुराने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करा, असे आदेश प्रशासनाला दिले आहेत. प्रत्यक्ष पूरस्थिती, पाऊस यामुळे जे नुकसान झाले, त्याचेच पंचनामे प्राधान्याने होतील, असेही ते म्हणाले आहेत.
पाऊस आणि पुरामुळे सुमारे ५०८ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला. जिल्ह्याच्या बहुतांशी भागात, पूर स्थिती असलेल्या परिसरात ऊस पीक आहे.
दरम्यान यंदा पूर कमी आल्याने नुकसानीचे प्रमाण कमी असण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे. मात्र, पंचनामे पूर्ण झाल्यानंतरच पीक नुकसानीचे नेमके स्वरूप स्पष्ट होईल असे सांगण्यात आले.
शेतीपिकासह अन्य नुकसान
जिल्ह्यात पावसाने आजअखेर सहा घरांची पूर्णत पडझड झाली. १५२ पक्क्या घरांची तर ४३७ कच्च्या घरांची किरकोळ नुकसान झाले आहे. तर ५४ जनावरांच्या गोठ्यांचे नुकसान झाले. यापैकी आतापर्यंत १०४ प्रकरणे भरपाईसाठी पात्र ठरवण्यात आली आहेत.
पाऊस आणि पुराने जिल्ह्यात आतापर्यंत ९ मोठी व ३ लहान दुधाळ जनावरे, ४ ओझी वाहणारी जनावरे अशी एकूण १६ जनावरांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात खासगी व सार्वजनिक मालमत्तेचे आतापर्यंत १ कोटी ४२ लाख ६८ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.
पंचनाम्यांचे गावनिहाय नियोजन होणार
पुराने नुकसान झालेल्यांचे पंचनामे करण्यात येणार असले तरी सरसकट ते होणार नाहीत. ज्यांचे प्रत्यक्ष नुकसान झाले आहे, प्राधान्याने ते प्रथम केले जाणार आहेत. त्यानुसार गावनिहाय नियोजन केले जाणार आहे.
अनेकदा पंचनामे सुरू झाले की, आपल्या क्षेत्राचा प्रथम पंचनामा व्हावा, असा आग्रह अनेकांकडून धरला जातो. मात्र, ज्यांचे अधिक नुकसान झाले आहे, त्यांचे पंचनामे प्राधान्याने केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.