
Akola News : जुलैचा पहिला आठवडा संपला तरीही या भागात पावसाची प्रतीक्षा कायम आहे. गेल्या महिनाभरात अनियमित स्वरूपाचाच पाऊस झाल्याने सार्वत्रिक स्वरूपात पेरण्या सुरू होऊ शकलेल्या नाहीत.
अकोला जिल्ह्यात कमी पावसामुळे आजवर केवळ ११ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली. जिल्ह्याचा कोरडवाहू पट्ट्याचा मुख्य भाग पावसाअभावी पेरणी सरू करू शकलेला नाही. बुलडाणा जिल्ह्यातही पेरण्यांना पावसाची गरज आहे. वाशीम जिल्हा तुलनेने पेरण्यात आघाडीवर निघालेला आहे.
बुलडाणा जिल्ह्यात ८० टक्के क्षेत्रावर अद्याप पेरणी नाही
जिल्ह्याचे खरीप क्षेत्र सात लाख ३५ हजार ५२१ हेक्टर असून आतापर्यंत एक लाख ५४ हजार ६६८ हेक्टरवर पेरणी झाली आहे. यात सर्वाधिक ७४ हजार ४३७ हेक्टरवर सोयाबीन, तर कपाशी ६० हजार ६७२ हेक्टरचा समावेश आहे. तुरीची १४ हजार ६६२ हेक्टर, मका २९४२, मूग ७२६, उडीद ८९२ हेक्टरवर पेरणी झाली आहे.
सरासरी क्षेत्राच्या केवळ २१ टक्के क्षेत्रावर अद्याप पेरणी आटोपली आहे. आतापर्यंत चिखली तालुक्यात सर्वाधिक २९ हजार ४७६ हेक्टर तर मेहकर तालुक्यात या पाठोपाठ २८ हजार ८६२ हेक्टरवर पेरणी झाली. शेगाव तालुक्यात सर्वात कमी म्हणजे १९५६ हेक्टरवर पेरणी झाली असून या तालुक्याच्या सरासरीपेक्षा पाच टक्के क्षेत्रावर अद्याप पेरणी होऊ शकलेली नाही.
अकोल्यात ११ टक्के क्षेत्रावर पेरणी
या खरीप हंगामात असमतोल पावसाचा अकोला जिल्ह्याला मोठा फटका बसण्याची चिन्हे तयार होत आहेत. जुलैचा पहिला आठवडा पूर्ण झाला तरीही जिल्हयात पुरेसा पाऊस झालेला नाही. परिणामी यंदा जिल्ह्यात केवळ ११ टक्के क्षेत्रावर पेरणी होऊ शकलेली आहे.
जिल्ह्याच्या चार लाख ४३ हजार हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी केवळ ५२ हजार ७२५ हेक्टरवर पेरणी होऊ शकलेली आहे. यातही प्रामुख्याने सोयाबीनची २४ हजार ३७१ हेक्टर व कपाशीची २४ हजार २०९ हेक्टरवर पेरणी आटोपली आहे. जिल्ह्यात पावसाअभावी पेरणीला वेग आलेला नाही. पावसाचा सुमारे एक महिना बहुतांश कोरडा गेला. आजवर हलक्या स्वरूपाचाच पाऊस अधिक प्रमाणात झालेला आहे.
वाशीम पेरण्यांमध्ये आघाडीवर
वाशीम जिल्ह्यात अकोला, बुलडाणा जिल्ह्यांच्या तुलनेत पेरण्या अग्रेसर आहेत. या जिल्ह्यात सरासरी क्षेत्राच्या ५० टक्क्यांवर भागावर पेरणी पूर्ण झाली आहे. हा जिल्हा सोयाबीनचे हब म्हणून ओळखल्या जातो. सोयाबीनचे दोन लाख ९७ हजार हेक्टर क्षेत्र असून त्यापैकी आतापर्यंत एक लाख ५९ हजार हेक्टरवर पेरणी आटोपली.
कपाशीची १०० टक्के लागवड पूर्ण झाली आहे. या पिकाचे १८ हजार हेक्टरपर्यंत क्षेत्र असून लागवड आटोपली आहे. तुरीचीसुद्धा ५८ हजार हेक्टरच्या तुलनेत २६ हजार हेक्टरपर्यंत पेरणी पूर्ण झाली.
वऱ्हाडातील तीनही जिल्ह्यात वाशीमने अग्रस्थान पटकावलेले. मागील दोन-तीन दिवसांत जिल्ह्यात भाग बदलून पावसाने दमदार हजेरी लावलेली आहे. यामुळे बहुतांश पेरणी साधली आहे. राहिलेल्या क्षेत्रावर या आठवड्यात बहुतांश प्रमाणात लागवडीचा अंदाज आहे.
जिल्हा सरासरी क्षेत्र प्रत्यक्ष लागवड टक्के
बुलडाणा ७ लाख ३५ हजार ५०० १ लाख ५४ हजार २०.९
अकोला ४ लाख ४३ हजार १२८ ५२ हजार ७२५ ११.९
वाशीम ४ लाख ५ हजार ३६० २ लाख ४० हजार ८९ ५०.३ टक्के
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.