Buldana News : या मोसमात आजवर पावसाची अनियमितता कायम टिकून राहिली. मात्र, दोन दिवसांपूर्वी झालेल्या सार्वत्रिक पावसानंतर जिल्ह्यात पेरण्यांनी एकच गती पकडली आहे. जिल्ह्यातील लागवड आता ६५ टक्क्यांवर पोहोचली आहे.
पाऊस कमी झाल्याने यंदा जुलैमध्ये पेरण्यांना सुरुवात झाली. त्यातही पाऊस भाग बदलून येत असल्याने पेरण्यांना सार्वत्रीकपणा आला नव्हता. बुधवारी (ता.१२) जिल्ह्यात सर्वदूर चांगला पाऊस झाला. त्यानंतर पेरणीला सार्वत्रिक स्वरूप आले. दोन दिवसांत पेरणीची आकडेवारी कमालीची बदलली.
गुरुवार (ता. १३) अखेर जिल्ह्यात ६३ टक्के पेरणी पूर्ण झाली. जिल्ह्याचे खरिपाचे क्षेत्र ७ लाख ३५ हजार ५२१ हेक्टर असून, आतापर्यंत चार लाख ६३ हजार हेक्टरवर पेरणी आटोपल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी दिली.
जिल्ह्यात प्रमुख पिकांमध्ये गणना होणाऱ्या मका ७७४१ हेक्टर, तूर ४३९३६, मूग ३९४१, उडीद ३९९९, सोयाबीन २ लाख ७३ हजार ५८६ हेक्टर, तर कपाशीची १ लाख २९ हजार ४०३ हेक्टरवर पेरणी आटोपली. जिल्ह्यात खरिपात सात लाख ३५ हजार हेक्टरपैकी प्रामुख्याने सोयाबीन तीन लाख ९४ हजार हेक्टरपर्यंत राहते.
आजवर सोयाबीनचे सरासरीच्या ७० टक्के क्षेत्र लागवडीखाली आलेले आहे. अद्यापही सव्वा लाख हेक्टरवरील पेरणी व्हायची आहे. कपाशीची सुद्धा अद्याप ५० हजार हेक्टरवर पेरणी शिल्लक आहे. गेल्या काळात झालेल्या दमदार पावसामुळे या आठवड्यात संपूर्ण पेरणी होण्याची शक्यता आहे.
मूग, उडीद लागवडीला फटका
पेरण्या लांबल्याचा मोठा फटका हंगामात मूग, उडीद लागवडीला बसला. जिल्ह्यात मुगाचे २० हजार ४०० हेक्टर क्षेत्र असून, आतापर्यंतच्या पेरणीत केवळ २० टक्के क्षेत्रावर म्हणजेच ३९४१ हेक्टरवर पेरणी झाली.
उडदाचे २२६९७ हेक्टर क्षेत्र असून १८ टक्के म्हणजेच ३९९९ हेक्टरवर या पिकाची पेरणी झाली. आता या पिकांच्या लागवडीचे दिवस आटोपल्याने फारसे क्षेत्र वाढण्याची चिन्हे दिसत नाहीत. मक्याची लागवड सरासरी २०८३५ हेक्टरच्या ४० टक्के क्षेत्रावरही झालेली नाही.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.