
Pune News : मृग नक्षत्रात दडी मारुन बसलेला मॉन्सून आर्द्रामध्ये अवतरला आहे. गेल्या तीनचार दिवसांत राज्यभर मॉन्सूनचा पाऊस झाल्यामुळे चांगली ओल मिळालेल्या भागात शेतकऱ्यांनी खरीप पेरण्या जोमाने सुरू केल्या आहेत. दरम्यान, मूग व उडदाच्या पेऱ्यात यंदा लक्षणीय घट होईल, अशी माहिती जाणकार सूत्रांनी दिली.
राज्यात सरासरी १४२ लाख हेक्टरवर खरिपाचा पेरा होतो. यंदा मृग कोरडे गेल्यामुळे आतापर्यंत हा पेरा अवघा अडीच लाख हेक्टर म्हणजेच १५ टक्के झाला आहे. खरिपाच्या एकूण पेऱ्यात कडधान्याचे सरासरी क्षेत्र २१.३८ लाख हेक्टर इतके असते.
यंदा त्यापैकी अवघ्या ७० हजार हेक्टरवर म्हणजेच एक टक्का पेरण्या झालेल्या आहेत. राज्यात ही पिके अंदाजे प्रत्येकी साडेतीन ते चार लाख हेक्टरवर घेतली जातात. मात्र, २६ जुलैअखेर मुगाचा शून्य पेरा झाला असून उडदाची पेरणी अवघी एक टक्के झाली आहे.
राज्यभर पावसाला चांगली सुरुवात झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत. २६ जूनअखेर राज्यात एकूण सरासरी पाऊस १७९ मिलिमीटर होणे अपेक्षित आहे. यंदा आतापर्यंत केवळ ५२ मिलिमीटर पाऊस झालेला आहे.
२२ जून रोजी राज्यात काही ठिकाणी पावसाला सुरुवात झाली. परंतु, प्रत्यक्षात एकूण पाऊस फक्त ०.७ मिलिमीटर झाला. त्यानंतर २३ जूनला २.२ मि.मी., २४ जूनला ६.४ मि.मी, २५ जूनला १५.३ मिलिमीटर तर २६ जूनला सकाळी आठ वाजेपर्यंत १०.९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
पावसाला सुरुवात झाल्यामुळे यंदा कापूस व सोयाबीन पट्ट्यातील चिंता कमी झाली आहे. राज्यात सरासरी ४२ लाख हेक्टरवर कपाशी तर ४१ लाख हेक्टरवर सोयाबीन पेरले जाते. ‘‘आमच्या अंदाजानुसार यंदा कपाशीचा पेरा ४२ लाख हेक्टरच्याच आसपास राहील.
मात्र, सोयाबीनचा पेरा ४८ ते ५० लाख हेक्टरच्या आसपास राहू शकतो. तूर, मका, धान, कपाशी, सोयाबीन अशा मुख्य खरीप पिकांच्या पेरण्या आता वेग घेतील,’’ अशी माहिती कृषी आयुक्तालयाच्या सूत्रांनी दिली. कपाशीचा पेरा आतापर्यंत पावणेदोन लाख हेक्टरच्या पुढे गेला असून ६१ हजार हेक्टरच्या पुढे धानाचा पेरा पोहोचला आहे.
महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कडधान्य पैदास विभागाचे माजी शास्त्रज्ञ डॉ. अनिल कांबळे म्हणाले की, उडीद व मुगाची उत्पादन वेळापत्रक पूर्णतः मृगाच्या पावसाशी निगडीत आहे. मृगाचा पाऊस न झाल्यास शेतकरी आपोआप पेरा टाळतात. परंतु, अद्यापही या पिकांसाठी वेळ गेलेली नाही.
कमी कालावधीची वाण वापरल्यास ७ जुलैपर्यंत पेरा करण्यास संधी असते. राज्यात मूग व उडदाचे उत्पादन सरासरी एकरी चार क्विंटलपर्यंत येते. आता पेरा झाला केवळ १० ते १५ टक्के घट होईल. मात्र, जुलैच्या पहिल्या आठवड्यानंतर पेरा केल्यास उत्पादनात दर आठवड्याला सरासरी १० टक्के घट होईल.
कृषी विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, की साधारणपणे २५ जूनपर्यंतच मूग, उडदाचा पेरा करण्याची शिफारस केली जाते. कारण, त्यानंतर उशिरा पेरा करण्यास संधी असली तरी पुढे तयार पिके पावसाच्या कचाट्यात सापडतात व पिकाची मोठी हानी होते. आतापर्यंत राज्यभर मूग, उडदाचा १५-२० टक्केदेखील पेरा झालेला नाही. त्यामुळे यंदा या पिकांसाठी हंगाम वाया जाण्याची दाट शक्यता आहे.
राज्यात ३.९३ लाख हेक्टर इतके मुगाचे सरासरी क्षेत्र आहे. गेल्यावर्षी शेतकऱ्यांनी याच कालावधीपर्यंत एक लाख हेक्टरच्या पुढे मुगाचा पेरा केला होता. यंदा तो केवळ २१०० हेक्टरपर्यंत दिसतो आहे. उडदाचे सरासरी क्षेत्र ३.७० लाख हेक्टर असून गेल्या हंगामात जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत २४ हजार हेक्टरवर पेरणी झालेली होती.
यंदा हीच पेरणी केवळ पावणे दोनशे हेक्टरवर अडकून पडल्याचे दिसते आहे. कृषी आयुक्तालयाच्या म्हणण्यानुसार, राज्यात गेल्या आठवड्यात चांगल्या पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे मूग, उडदाच्या पेऱ्यात वाढ होईल. तथापि, ही वाढ लक्षणीय नसेल.
खरीप पेरण्यांची अंदाजे स्थिती
पीक- सरासरी क्षेत्र-- गेल्या वर्षीचा पेरा--चालू वर्षाचा पेरा
धान १५०८३७४----७२४८३-------६१५५५(४%)
ज्वारी २८८६१५----५३७७-------१५ (०%)
बाजरी ६६९०८९----४२८८९--------७९ (०%)
नाचणी ७८१४९---२४०७----------१२७८ (२%)
मका ८८५६०८----७९९३७---------१५०१ (०%)
तूर १२९५५१६---१०६९१०---------२१८८ (०%)
मूग ३९३९५७----२६९५०----------२१ (०%)
उडीद ३७०२५२---२३६०६--------२१ (०%)
भुईमूग १९१५७५----१०९६१-------१४१ (०%)
तीळ १५१६२--------४७---------० (०%)
कारळे १२४६०------५----------० (०%)
सूर्यफूल १३७८०-----१५९२----------८५७(०%)
सोयबीन ४१४९९१२--३८३३८२------८५७(०%)
कापूस ४२०११२८----९३१५९७------१७९९१०(४%)
- सर्व आकडे अंदाजे व हेक्टरमध्ये आहेत.
- कंसातील आकडे सरासरी क्षेत्राच्या तुलनेत यंदा आतापर्यंत झालेल्या पेरणीची टक्केवारी दर्शवितात.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.