Water Shortage News : तालुक्यातील खारेपाटात दरवर्षी भीषण पाणीटंचाई भेडसावते. आठवडाभरापासून उष्म्याचे प्रमाण वाढत असल्याने अंगाची लाही लाही होत आहे.
त्यात भर उन्हात महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. प्रशासनाकडून खारेपाटाची तहान भागविण्यासाठी १४ टॅंकरव्दारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मात्र टँकर आला की पाणी साठवून ठेवण्यासाठी नागरिकांची तारांबळ उडते.
खारेपाटातील वाशी, वढाव, शिर्की, दिव, मसद, बोर्झे, कणे यासह अनेक गाव-पाड्यांत वर्षोनुवर्षे पाणीटंचाई भेडसावते. जलजीवन मिशन योजनेअंतर्गत खारेपाटातही कामे सुरू करण्यात आली आहेत, मात्र बहुतांश कामे अपूर्ण असल्याने ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती सुरूच असून ते अक्षरशः मेटाकुटीला आले आहेत.
पेण पंचायत समितीच्या माध्यमातून टँकरसाठी यावर्षीचा आराखडा तयार करण्यात आला असून विंधन विहीर दुरुस्तीसह शहापाडा येथील जलवाहिनी दुरुस्तीसाठी साधारण एक कोटी २४ लाखांची तरतूद करण्यात आली आहे.
सध्या तालुक्यात १४ टँकरने पाणीपुरवठा सुरू असला तरी एका गावात चार-चार दिवसांनंतर पाणी येते. त्यामुळे पाणी भरून ठेवताना, त्याची साठवणूक करताना महिलावर्गाची पुरती दमछाक होत आहे.
पेण खारेपाट विभागासाठी पाणीपुरवठा सुरळीत व्हावा, याकरिता कोट्यवधींचा निधी सरकारने दिला असला तरी आजतागायत ही योजना अपुरीच राहिली आहे. जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेली कामेही पूर्ण झालेली नाहीत.
या पाणीटंचाईने नागरिक त्रस्त असून रोजची भटकंती धावपळीमुळे आरोग्याच्या व्याधीही बळावल्या आहेत. त्यामुळे सरकारने कोणतीही योजना राबवावी मात्र खारेपटाला पिण्याचे पाणी लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावे, अशी सामाजिक कार्यकर्ते किरण पाटील यांनी केली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.