
Gondia News : भिवापुरी मिरचीसोबतच (Bhivapuri Chili) विदर्भात रंग, चव आणि उत्पादनाच्या बाबतीत केशोरी मिरचीचे (Keshori Chili) स्वतंत्र अस्तित्व आहे. त्यामुळेच या वाणाचे जतन करण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे.
संधोनात्मकस्तरावर काम करण्यासोबतच मिरचीच्या भौगोलिक मानांकनासाठी देखील प्रयत्न केले जातील, अशी माहिती संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे यांनी दिली.
नागपूरच्या भिवापूर तालुक्यात लागवड होणारी मिरची म्हणून भिवापुरीची ओळख होती. मात्र संशोधनात्मक पातळीवर हे मिरची वाण उपेक्षित राहिल्याने या मिरची लागवड क्षेत्रात सातत्याने घट नोंदविण्यात आली आहे.
गेल्या काही वर्षांत भिवापुरी मिरचीचे क्षेत्र चार हजार हेक्टरवरून अवघ्या १०० हेक्टरपर्यंत मर्यादित राहिले आहे.
भिवापुरी नंतर गोंदिया जिल्ह्यात उत्पादित केशोरी मिरचीला देखील देशाच्या विविध राज्यांतून मागणी आहे. व्यापारी थेट या मिरचीच्या खरेदीसाठी गोंदिया जिल्ह्यात येतात, असे सांगितले जाते.
गोंदिया जिल्ह्याच्या केशोरी गावशिवारात या मिरचीचे उत्पादन होत असल्याने तिला केशोरी मिरची अशी ओळख मिळाली, अशी माहिती कृषी विद्यापीठाच्या मिरची व भाजीपाला संशोधन विभागाचे प्रमुख डॉ. श्याम घावडे यांनी दिली.
...अशी आहेत वैशिष्ट्ये
गर्द लाल रंगाचे तिखट आणि चवही दर्जेदार या गुणवैशिष्ट्यांमुळे आंध्र प्रदेश, तेलंगणा व महाराष्ट्राच्या काही भागांतून केशोरी मिरचीला व्यापाऱ्यांची मागणी राहते. कीड, रोगाला हे मिरची वाण कमी बळी पडते, असेही कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी सांगितले.
ऑक्टोबर महिन्यात याची लागवड होते. भिवापुरी मिरची केवळ नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातच होते. पश्चिम विदर्भात त्याच्या चाचण्या घेतल्या असता झाडांची वाढ झाली नाही. केशोरी मिरची मात्र पश्चिम विदर्भातही चांगल्या प्रकारे उत्पादन देते.
केशोरी मिरचीच्या अकोला कृषी विद्यापीठ प्रक्षेत्रात चाचण्या घेतल्या असता पश्चिम विदर्भातील भौगोलिक वातावरणातही या मिरची वाणाची वाढ चांगली होत असल्याचे निरीक्षण आहे.
गोंदिया जिल्ह्यात ऑक्टोबरमध्ये याची लागवड करतात. ८ ते १० क्विंटलपर्यंत वाळलेली मिरची अशी याची उत्पादकता आहे.
३०० रुपये किलो (३० हजार रुपये क्विंटल) याप्रमाणे दर मिळतो. एका एकरातून दीड ते दोन लाख रुपये उरतात. गोंदिया जिल्ह्यात ज्या भागात हे मिरची उत्पादन होते त्या भागात सिंचनाची सोय आहे.
- डॉ. श्याम घावडे, प्रमुख, मिरची व भाजीपाला संशोधन विभाग, पंदेकृवि, अकोला
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.