
Agriculture Irrigation Bhavaninagar : इंदापूर तालुक्यातील सणसर-रायते मळा या ठिकाणी नीरा डाव्या कालव्याला पाटबंधारे विभागाच्या (Irrigation Department) ढिसाळ कारभारामुळे दुसऱ्यांदा भगदाड पडल्याने ३४ शेतकऱ्यांचे सुमारे ४० एकरांवरील पिकांचे नुकसान (Crop Damage) झाले आहे.
यात चार एकर जमीन खरवडून गेली असून, चार घरांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
सणसर (ता. इंदापूर) येथील रायते मळा या ठिकाणी नीरा डावा कालव्याला मोठे भगदाड पडल्याने हे पाणी येथील जमिनीमध्ये पसरले गेले. पाण्याचा वेग एवढा मोठा होता, की शेतातील मातीही वाहून गेली. पिकांचे नुकसान झाले. त्याचबरोबर अनेक घरांमध्ये पाणी शिरले होते.
या अगोदरही याच ठिकाणी महिनाभरापूर्वी नीरा डाव्या कालव्याला भगदाड पडल्याने हीच परिस्थिती निर्माण झाली होती; परंतु याचा गांभीर्याने पाटबंधारे विभागाने निर्णय घेतला नसल्याने पुन्हा नीरा डाव्या कालव्याला भगदाड पडल्याने शेतीचे नुकसान झाले आहे.
ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्यांचे पंचनामे करण्यात आले आहे. परंतु आम्हा शेतकऱ्यांचा कोणी विचार करीत नसल्याने आतापर्यंत आम्हाला कसलीही मदत मिळालेली नाही. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळणार आहे का, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत.
नीरा डाव्या कालव्याला भगदाड पडल्याने यातून हजारो लिटर पाणी मोठ्या प्रमाणात बाहेर पडल्याने शेतकऱ्यांच्या शेतातून वेगाने वाहत गेले. यात शेतकऱ्यांचा काय दोष आहे.
शेतकरी अगोदरच वेगवेगळ्या संकटांनी ग्रासला असून, कोणत्याही पिकामध्ये शेतकऱ्यांना म्हणावा तसा उत्पन्नाचा मार्ग सापडत नाही. त्यातच पुन्हा या नवीन संकटाने अजूनही या ठिकाणी असलेला शेतकरी अडचणीत सापडला आहे.
याचा विचार करून तालुक्याच्या प्रतिनिधींनी तसेच पाटबंधारे विभागाने या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा विचार करून तातडीने या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी आबा कटके केली आहे.
आजी माजी लोकप्रतिनिधींनी दिल्या भेटी :
इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रेय भरणे तसेच माजी सहकार मंत्री व भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकतीच पाहणी केली. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याची व त्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी, अशा सूचना दिल्या आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.