
Hingoli News : पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत (Pradhan Mantri Agriculture Irrigation Scheme) गेल्या दोन वर्षांत (२०२१-२२ आणि २०२२-२३) हिंगोली जिल्ह्यातील १० हजार २९० शेतकऱ्यांनी ठिंबक संच आणि तुषार सिंचन संच खरेदी केले आहेत.
त्यापैकी ७ हजार ३०२ लाभार्थी शेतकऱ्यांना १३ कोटी ३६ लाख १ हजार रुपये अनुदान अदा करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवराज घोरपडे यांनी दिली.
हिंगोली जिल्ह्यात पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन संच अनुदानासाठी २०२१-२२ मध्ये ५७०१ ‘महाडीबीटी’ पोर्टलद्वारे ५ हजार ७०१ शेतकऱ्यांनी प्रस्ताव सादर केले होते.
त्यापैकी ५ हजार ५७९ लाभार्थ्यांना ९ कोटी ७७ लाख ८२ हजार रुपये अनुदान अदा करण्यात आले आहे. या वर्षी सूक्ष्म सिंचन संचामुळे जिल्ह्यातील ३ हजार ६४३.५१ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे.
२०२२-२३ मध्ये ८ हजार ३५ लाभार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टलद्वारे प्रस्ताव सादर केले. एकूण ४ हजार ७११ लाभार्थ्यांनी खरेदी करून संच कार्यान्वित केलेले आहेत.
त्यापैकी १ हजार ७२३ लाभार्थ्यांना ३ कोटी ५८ लाख २८ हजार रुपये अनुदान अदा करण्यात आले आहे. यामुळे ३ हजार ७६ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे.
सूक्ष्म सिंचन योजनेचा अत्यल्प व अल्प भूधारक अनुक्रमे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला, दिव्यांग शेतकरी व सर्वसाधारण या प्राधान्यक्रमानुसार लाभ घेता येते.
अवर्षण प्रवण क्षेत्रातील अल्प व अत्यल्प भूधारकांसाठी अनुदानाची मर्यादा ५५ टक्के आहे, तर सर्वसाधारण भूधारकांसाठी ४५ टक्के आहे.
या योजनेमध्ये राज्य शासनामार्फत अल्प व अत्यल्प भूधारकांना मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेअंतर्गत २५ टक्के व इतर शेतकऱ्यांना ३० टक्के इतके पूरक अनुदान देण्यात येते.
मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेच्या माध्यमातून २०२१-२२ आणि २०२२-२३ या वर्षामध्ये सूक्ष्म सिंचनाचा लाभ घेणाऱ्या हिंगोली जिल्ह्यातील ५ हजार ७१४ शेतकऱ्यांना ५ कोटी ३ लाख एवढे पूरक अनुदान उपलब्ध करून देण्यात आले, अशी माहिती घोरपडे यांनी दिली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.