Rain : राज्यात पावसाचा जोर ओसरला
पुणेः राज्यात शुक्रवारी पावसाचा जोर (Rain Intensity) ओसरला होता. मात्र राज्यातील काही भागांत मध्यम ते जोरदार पाऊस (Heavy Rain) पडला. तर बहुतांश भागांत हलक्या सरी पडल्या. तर हवामान विभागानं सातारा आणि पुणे जिल्ह्यात उद्या सकाळपर्यंत जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट (Rain Orange Alert) जारी केलाय. तर संपूर्ण विदर्भ, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत जोरदार पावसाचा येलो अलर्ट (Yellow Alert) दिलाय.
कोकणात शुक्रवारी पावसाचा जोर काहीसा कमी झाला होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यात किनारपट्टीसह सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यांना वादळी वाऱ्यांसह अक्षरशः झोडपून काढले. समुद्राला उधाण असून वाऱ्याचा वेगदेखील वाढलेला आहे. शुक्रवारी सकाळपासून देखील पावसाच्या सरी कोसळत आहेत. मालवण येथे ६० मिलिमीटर पाऊस झाला. तर रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथे ८० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तसंच ताळा, माथेरान, खालापूर आणि पोलादपूर मंडळाला जोरदार पावसानं झोडपलं. पालघर जिल्ह्यातील जव्हार येथे ८० मिलिमीटर पाऊस झाला. यासोबतच मोखेडा मंडळातही जोरदार पाऊस झाला.
मध्य महाराष्ट्रातही अनेक भागांत जोरदार पाऊस झाला. धरणक्षेत्रात पावसाचा जोर अधिक होता. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे १९० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर इतर भागात हलक्या सरी पडल्या. पुणे जिल्ह्यातील लोणावळा येथे १६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावरही पावसाचा जोर जास्त होता. मात्र इतर भागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस झाला. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी मंडळात १५० मिलिमीटर पाऊस पडला. तसेच चंदगड, आजरा, गगणबावडा, शाहुवाडी आणि पन्हाळा मंडळांमध्ये जोरदार पावसाची नोंद झाली. नाशिक जिल्ह्यातील इगतपूरी येथे ११० मिमी. पाऊस झाला. तसेच त्र्यंबकेश्वर, पेठ, हर्सूल, ओझरखेडा, सुरगणा मंडळांमध्येही पावसाचा जोर अधिक होता.
मराठवाड्यातील अनेक भागांत शुक्रवारी पावसानं उघडीप दिली होती. नांदेड, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या सरी पडल्या. मात्र औरंगाबाद जिल्ह्यात काही मंडळात जोरदार सरी झाल्या. लातूर, बीड, उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये पावसाची उघडीप होती.
विदर्भात अकोला जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडल्या. अकोला जिल्ह्यात शुक्रवारी पावसाचा जोर ओसरला होता. अकोला, अकोट, बाळापूर, बार्शीटाकळी, मुर्तीजापूर या मंडळांमध्ये हलका पाऊस झाला. अमरावती जिल्ह्यातही पावसाचा जोर कमी होता. अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव, बातकुली, चांदूर बाजार, दर्यापूर या मंडळांमध्ये तुरळक पाऊस झाला. भंडारा जिल्ह्यातही पाऊस कमी झाला. बुलडाणा जिल्ह्यातही पाऊस उघडला होता. मात्र मोताळा, संग्रामपूर, मलकापूर या तालुक्यांतील काही भागांत हलक्या सरी पडल्या. चंद्रपूर, नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातही पावासाचो जोर ओसरला.
हवामान विभागानं उद्या सकाळपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांत जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केलाय. सातारा आणि पुणे जिल्ह्याला जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. तर कोकणातील रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर आणि मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. तर विदर्भातील सर्वंच जिल्ह्यांमध्ये काही भागांत जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.