Humani Pest Control : हुमणी अळीच्या नियंत्रणासाठी कृषी विभागाचा पुढाकार

Agriculture Department : चालू वर्षी पावसाअभावी पुणे जिल्ह्यात हुमणी अळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.
Humani Pest
Humani Pest Agrowon
Published on
Updated on

Pune News : चालू वर्षी पावसाअभावी पुणे जिल्ह्यात हुमणी अळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन हुमणी अळीच्या नियंत्रणासाठी कृषी विभागाने आतापासून पावले उचलण्यास सुरुवात केली आहेत.

पुढील एक ते दीड महिन्यात तब्बल ८ हजार ८४० प्रकाश सापळे लावण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्याबाबतच्या सूचना जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाकडून देण्यात येत आहेत. त्यामुळे उसाचे हुमणीपासून मोठे नुकसान टाळता येणार आहे.

गेल्या काही वर्षांपासून पावसाळ्यात उसावर हुमणी अळीचा मोठा प्रादुर्भाव होत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. यावर उपाययोजना करण्यासाठी कृषी विभागाकडून २०२२-२३ मध्ये योग्य पावले उचलण्यात आली होती. त्या वेळी ९६५ गावांमध्ये तब्बल ७ हजार ७९५ प्रकाश सापळे शेतकऱ्यांनी लावले होते.

त्या माध्यमातून सुमारे दोन हजार १४५ किलो भुंगेरे सापडल्याने उसाचे काही प्रमाणात नुकसान टाळण्यास मदत झाली होती. त्याचा चांगला अनुभव कृषी विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना आल्याने चालू वर्षी याची व्याप्ती वाढविण्याचे ठरवले असून, मोठ्या प्रमाणात हे अभियान स्वरूपात राबविण्यात येणार आहे.

Humani Pest
Humani Control : हुमणी नियंत्रणासाठी लावले ७ हजार ७९५ प्रकाश सापळे

पुणे जिल्ह्यात उसाचे सरासरी एक लाख १७ हजार ७१ हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी एक लाख ४३ हजार ४५२ हेक्टरहून अधिक क्षेत्रावर आडसाली, सुरू आणि खोडवा ऊस उभा असतो. जून, जुलैमध्ये कमी पाऊस झाल्यानंतर जिल्ह्याच्या विविध भागांत हुमणी अळी डोके वर काढत असते. सुमारे वर्ष-दीड वर्षे तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या उसाचे ऐन गळीत हंगामाच्या तोंडावर हुमणी अळीमुळे नुकसान होते.

शिरूर, दौंड, इंदापूर, बारामती, खेड, जुन्नर, आंबेगाव तालुक्यांतील गावागावांतील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात उसाचे क्षेत्र हुमणीखाली येते. प्रादुर्भाव झाल्यानंतर नुसत्या हातानेही उसाचे अख्खे बेट उपटून निघते.

या रोगाचा प्रचंड झपाट्याने प्रादुर्भाव होत असल्याने धास्तावलेल्या काही शेतकरी गळीत हंगामाची वाट न पाहता जनावरांच्या चाऱ्यासाठी म्हणून मिळेल त्या भावाने ऊस तोडून देतात. हे होऊ नये यासाठी कृषी विभाग व आत्मा आणि स्थानिक साखर कारखाने यांच्या माध्यमातून पुढाकार घेतला जातो.

Humani Pest
Humani Pest management : सामुदायिकरीत्या वेळीच करा हुमणी किडीचे व्यवस्थापन

हुमणी किडीचा बंदोबस्त योग्य वेळी म्हणजेच जून ते ऑगस्ट या काळात करणे अत्यंत महत्त्वाचे असते. हुमणीची बारा महिन्यांत एकच पिढी तयार होत असली, तरी अळीचा कालावधी जास्त दिवसांचा असतो. तसेच पिकांच्या मुळांवर हुमणीची उपजीविका करण्याची क्षमता अधिक असल्याने पीक मोठ्या प्रमाणात नष्ट होते. त्यामुळे हुमणी कीड नष्ट करण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन किंवा सर्वांगीण उपाय करणे आवश्यक असते.

Humani Pest
Crop Protection Practices : उन्हाळ्यातील मशागतीने टाळता येतील खरीपातील कीड, रोग

हुमणी किडीच्या सर्व अवस्था जमिनीत आढळतात. त्याला एकच अपवाद म्हणजे पावसाळ्याच्या सुरुवातीला सूर्यास्तानंतर खाण्यासाठी बाभळीच्या किंवा कडुनिंबाच्या झाडांवर जमा होणारे भुंगेरे हे होय.

या झाडावरील फांद्या हलवून जमिनीवर पडलेले भुंगेरे गोळा करून रॉकेल मिश्रित पाण्यात टाकून मारणे गरजेचे असते. भुंगेरे गोळा करून नष्ट करणे हे नियंत्रण उपायांमध्ये सर्वांत प्रभावी व कमी खर्चाचे असल्याने अनेक शेतकरी या पर्यायाकडे वळताना दिसत आहे. त्यामुळे उसाचे नुकसान होण्याचे टाळले जाते.

...असा वाढतो हुमणीचा प्रादुर्भाव

- हुमणीच्या सर्व अवस्था जमिनीच्या खाली असल्यामुळे पिकांचे जास्त नुकसान होते.

- पावसाळ्याच्या सुरुवातीलाच प्रथम अवस्थेतील अळी अंड्यातून बाहेर निघाल्यावर जमिनीतील कुजलेल्या सेंद्रिय पदार्थावर उपजीविका करते.

- दुसऱ्या व तिसऱ्या अवस्थेतील अळ्या ऊस व इतर पिकांची मुळे जून ते ऑक्टोबर महिन्यात खातात.

- पिकांचे अन्न व पाणी घेण्याचे कार्य बंद पडून संपूर्ण पीकच वाळते.

- हुमणीच्या प्रादुर्भावामुळे उसाच्या उगवणीत ४० टक्के, तसेच प्रादुर्भाव जास्त असल्यास १०० टक्क्यांपर्यंत नुकसान होते.

आत्मा व कृषी विभागाच्या माध्यमातून मागील चार वर्षांपासून प्रकाश सापळे लावण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जात आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असून, शेतकऱ्यांनाही कमी खर्चात फायदेशीर उपाय मिळत आहे. गेल्या वर्षी एकट्या दौंड तालुक्यात सुमारे ४००-५०० शेतकऱ्यांनी हा प्रयोग राबविला होता. त्याचा फायदाही त्यांना दिसून आल्याने चालू वर्षीही हा प्रयोग मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच ऊस उत्पादकांनी सहभागी व्हावे.
- संजय काचोळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, पुणे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com