Humani Pest management : सामुदायिकरीत्या वेळीच करा हुमणी किडीचे व्यवस्थापन

Bhunga Management : हुमणी अळीच्या व्यवस्थापनासाठी गावपातळीवर सामुदायिकरीत्या उपाय केल्यास भुंगेऱ्यांचा नायनाट करणे शक्य होईल. कडुनिंब किंवा बाभूळ झाडावर रात्रीच्या वेळी एकत्र आलेले प्रौढ भुंगेरे गोळा करून नष्ट करावेत. हा उपाय सोपा आणि अधिक कार्यक्षम उपाय आहे.
Humani pest management
Humani pest management Agrowon
Published on
Updated on

अमोल ढोरमारे

Indian Agriculture : साधारण मे व जून महिन्याच्या कालावधीत पावसाच्या सरी पडल्यानंतर हुमणी अळीचे प्रौढ भुंगेरे सुप्तावस्थेमधून बाहेर पडतात. त्यामुळेच त्यांना मे बीटल किंवा जून बीटल असे देखील म्हणतात. ही बहुभक्षीय कीड असून हळद, ऊस, भुईमूग, आले, हरभरा, सोयबीन, ज्वारी, तृणधान्ये आणि फळझाडे अशा सर्वच पिकांच्या मुळांवर आपली उपजीविका करते.

हुमणीचे भुंगेरे लिंब, बाभूळ, शेवगा, शेवरी अशा विविध प्रकारच्या ५६ पेक्षा जास्त झाडांवर उपजीविका करते. मशागतीवेळी शेतामध्ये शेणखताचा वापर केला जातो. मात्र या शेणखतामधून भुंग्यांची अंडी मोठ्या प्रमाणावर शेतात जातात. त्यामुळे हुमणी अळीच्या प्रसाराचा धोका वाढतो.

शास्त्रीय नाव - होलोट्रिकीया सिराटा (Holotrichia serrata).

सामान्य नाव - हुमणी अळी.

ओळख -

- प्रौढ भुंगेरे हे तपकिरी लालसर रंगांचे असून पंखाची जोडी ही मजबूत असते.

- अळी पांढऱ्या रंगाची असून तिचे डोके बदामी रंगाचे असतात. अळी इंग्रजी ‘सी’ (C) अक्षरासारखी दिसते.

Humani pest management
Humani Control : हुमणी नियंत्रणासाठी लावले ७ हजार ७९५ प्रकाश सापळे

जीवनक्रम

- या किडीच्या अंडी, अळी, कोष व प्रौढ अशा चार अवस्था असतात. त्यातील अळी अवस्था ही अधिक नुकसानकारक असते.

- पहिल्या पावसानंतर मे किंवा जून महिन्यामध्ये प्रौढ भुंगेरे सुप्त अवस्थेतून बाहेर पडतात. रात्रीच्या वेळी बाभूळ किंवा लिंबाच्या झाडावर त्यांचे मिलन होते.

- मादी साधारणपणे ५० ते ७० अंडी जमिनीमध्ये ७ ते १० सेंमी खोलीवर घालते. अंड्यातून ९ ते २४ दिवसांमध्ये अळी बाहेर पडते.

- अळी अवस्था ही ५ ते ९ महिन्यांची असते. त्यानंतर जमिनीत कोष अवस्थेमध्ये जाते.

- कोष अवस्थेतून १४ ते २८ दिवसांनी प्रौढ भुंगेरे बाहेर पडतात. ते जमिनीमध्ये सुप्त अवस्थेत जातात आणि मे किंवा जून महिन्यात पावसाच्या सरी पडल्यानंतर पुन्हा बाहेर येतात.

- अशारीतीने हुमणी अळीची एक पिढी एका वर्षामध्ये पूर्ण होते.

नुकसानीचा प्रकार

- किडीची अळी अवस्था अधिक नुकसानकारक असते. अळी ऊस, हळद, सोयाबीन, कापूस इ. पिकांची मुळे कुरतडून खाते. त्यामुळे झाड सुरुवातीला पिवळे पडून नंतर वाळून जाते.

- प्रौढ भुंगेरे हे लिंब, बाभूळ, शेवगा, शेवरीच्या झाडांच्या पानांवर उपजीविका करतात.

- प्रादुर्भावग्रस्त झाडे सहज उपटली जातात.

- शेतात एका ओळीत प्रादुर्भावग्रस्त झाडे वाळल्याचे दिसून येते.

- प्रादुर्भाव प्रामुख्याने ऑगस्ट ते नोव्हेंबर महिन्यात जास्त दिसून येतो.

एकात्मिक कीड व्यवस्थापन

- पहिला पाऊस पडल्यानंतर हुमणीचे भुंगेरे बाभूळ व लिंबाच्या झाडांवर रात्रीच्या वेळी दिसून येतात. अशा झाडांच्या फांद्या हलवून खाली पडलेले भुंगेरे गोळा करून रॉकेल मिश्रित पाण्यात टाकून नियंत्रित करावेत. हा उपाय गावपातळीवर सामुदायिकरीत्या केल्यास भुंगेऱ्यांचा नायनाट करणे शक्य होईल.

- पीक काढणीनंतर लगेच जमिनीची खोल नांगरट करावी. नांगरट शक्यतो सकाळी किंवा सायंकाळी करावी, जेणेकरून पक्षी अळ्या वेचून खातील.

- जमिनीत शेणखत टाकताना खताबरोबर मेटाऱ्हायझिम ॲनीसोप्ली

किंवा बिव्हेरिया बॅसियाना हे बुरशीजन्य कीटकनाशक हेक्टरी २० किलो प्रमाणे मिसळावे.

- शेतात हुमणीचा प्रादुर्भाव जास्त असल्यास वाहते पाणी द्यावे. शेतात वाफसा होऊ न दिल्यास हुमणीचे नियंत्रण व्यवस्थित होते.

- प्रादुर्भावग्रस्त शेतामध्ये सापळा पीक म्हणून भुईमूग किंवा तागाची लागवड करावी.

- प्रकाश सापळा हेक्टरी १ याप्रमाणे लावावा किंवा किंवा ब्लब लावून त्याखाली प्लॅस्टिकच्या टोपलीमध्ये रॉकेल मिश्रित पाणी टाकावे. म्हणजे प्रौढ भुंगेरे त्या पाण्यात पडून नाश पावतील.

आर्थिक नुकसान पातळी - एक अळी प्रति एक घनमीटर

रासायनिक नियंत्रण -

- मे व जून महिन्यात कडुनिंब किंवा बाभळीच्या झाडांवर क्लोरपायरीफॉस (२० टक्के ई.सी.) २ मिलि प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

किडीने आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यानंतर नियंत्रणासाठी,

- फिप्रोनिल (४० टक्के) अधिक इमिडाक्लोप्रिड (४० टक्के डब्ल्यूजी) (संयुक्त कीटकनाशक)

०.४ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून नॅपसॅक पंपाने फवारणी करावी किंवा

Humani pest management
Humani : हुमणी’चा प्रादुर्भाव सुरू

- थायामेथोक्झाम (०.९० टक्का) अधिक फिप्रोनिल (०.२० टक्का जी.आर.) (संयुक्त कीटकनाशक) १२ ते १५ किलो किंवा फिप्रोनिल (०.३ टक्का दाणेदार) २५ किलो प्रति हेक्टर या प्रमाणात वापर करावा.

(लेबलक्लेम आहेत.)

संपर्क - अमोल ढोरमारे, ९६०४८३३८१५, (सहायक प्राध्यापक, कृषी कीटकशास्त्र विभाग, सौ.के.एस.के (काकू) कृषी महाविद्यालय, बीड)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com