
Jalgaon News : जिल्ह्यात अमळनेर, पाचोरा, भडगाव, पारोळा, धरणगाव, चाळीसगाव आदी तालुक्यातील खरिपाची पिके पावसाअभावी करपत आहेत. विशेषत: कोरडवाहू क्षेत्रातील पिकांची मोठी हानी झाली असून, उत्पादनात घटीचे चित्र आहे.
चाळीसगावात ४९ हजार १६६ हेक्टर क्षेत्रातील पिके धोक्यात आली आहेत. पाऊस झाला काय न झाला काय या पिकांच्या उत्पन्नात मोठी घट येणार आहे. अशीच स्थिती इतर तालुक्यांत किंवा गिरणा, बोरी पट्ट्यात आहे.
जुलै व ऑगस्ट महिन्यात पावसाने खंड दिल्याने खरीप पिकांच्या वाढीवर तसेच येणाऱ्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला असून, बळीराजाचे डोळे आता आकाशाकडे लागले आहेत. तालुक्यातील चाळीसगाव, शिरसगाव, तळेगाव महसूल मंडळांचा समावेश असल्याचे सांगण्यात येते. मात्र कोरडवाहू क्षेत्रातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान आहे.
या पिकांचा देखील सरसकट पंचनामा करण्यात येऊन मदत जाहीर करण्याची मागणी होत आहे. दरम्यान, सर्वच मंडळात दुष्काळाचे विदारक चित्र आहे. चाळीसगाव तालुक्यात खरीप क्षेत्राचे पेरणीयोग्य क्षेत्र ८७ हजार ५०० हेक्टर क्षेत्र असून, त्यापैकी यंदा ८६ हजार १५३ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.
त्यातही ४९ हजार १६६ हेक्टर क्षेत्रावर जिरायती अर्थात कोरडवाहू तर ३६ हजार ९८७ हेक्टर क्षेत्रावर बागायत पिकांची पेरणी झाली आहे. सर्वाधिक पेरा हा कापूस लागवडीचा आहे. त्या खालोखाल मका व इतर पिकांचा समावेश होतो. विहिरींच्या पाण्यामुळे बागायत क्षेत्रातील पिके तग धरून असली तरी कोरडवाहू क्षेत्रातील पिके मात्र दमदार पावसाअभावी जळू लागली आहेत.
त्यामुळे आता पाऊस झाला तरी या पिकांना काहीही फायदा होणार नाही, अशी स्थिती आहे. त्यांची पीकवाढीची क्षमता खुंटली आहे. त्यामुळे उत्पन्नात मोठी घट येणार आहे. सरकारने कोरडवाहू क्षेत्रातील पिकांचे सरसकट पंचनामे करून अनुदान जाहीर करावे, अशी मागणी करण्यात येत आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.