सोलापूर ः उजनी धरणाच्या वरच्या बाजूकडील पुणे जिल्ह्यातील सर्व धरणे ओव्हर फ्लो झाल्याने धरणातील अतिरिक्त पाणी उजनी धरणात सोडण्यात येत आहे.(Heavy Rainfall) शनिवारी (ता.१७) या धरणाकडून सुमारे १ लाख ३७ हजार ३२४ क्युसेक इतके पाणी उजनीमध्ये येत होते. तर पुढे उजनी धरणातून (Ujani Dam) भीमा नदीत ९० हजार क्युसेक आणि वीर धरणातूनही ४० हजार क्युसेक इतके पाणी नीरा नदीत(Neera River) सोडण्यात येत आहे. पण या दोन्ही नद्यांचे पाणी पंढरपुरात येणार असल्याने पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर पंढरपूरसह नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
गेल्या पंधरवड्यापासून थांबलेला पाऊस पुन्हा हजेरी लावत आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत जिल्ह्यात सातत्याने पाऊस झाला. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही हीच परिस्थिती आहे. परिणामी, पुणे जिल्ह्यातील धरणे पूर्ण क्षमतेने भरल्याने उजनीतील विसर्ग वाढवण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी दौंडकडून ५० ते ५५ हजार क्युसेक इतकाच विसर्ग उजनीमध्ये सोडण्यात येत होता. पण वरच्या धरणात पाण्याच्या प्रवाहात सातत्याने वाढ होत असल्याने विसर्गातही वाढ करण्यात आली आहे. आता ९० हजार क्युसेक इतके पाणी उजनीतून भीमा नदीत सोडण्यात येत आहे. तर ४० हजार क्युसेक इतके पाणी वीर धरणातून नीरेत सोडण्यात येत आहे.
हे दोन्ही पाणी पंढरपुरात एकत्र होत असून, सध्या भीमा नदीमध्ये १ लाख ३० हजार क्युसेक इतके पाणी मिसळत आहे. त्यामुळे पंढरपूर आणि नदीकाठच्या भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. भीमा नदीवरील पंढरपूर तालुक्यातील पिराची कुरोली, गुरसाळे, पंढरपूर, गोपाळपूर, मुंडेवाडी, पुळूज हे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. तसेच पंढरपुरातील जुना दगडी पूलही पाण्याखाली गेला आहे. नदी पात्रातील पुंडलिक व विष्णुपद मंदिराला पाण्याने वेढा दिला आहे. पाण्याचा विसर्ग दोन्ही बाजूंनी असाच राहिला. तर पंढरपूरसह नदीकाठच्या गावात पूरस्थितीची शक्यता आहे. त्यासाठी नदीकाठच्या झोपडपट्टी धारकांनी तूर्त दुसरीकडे आश्रय घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.