Dam Water Level : उजनी, जायकवाडीच्या पाणी पातळीत वाढ

Ujani Dam : पुणे जिल्ह्यातील धरणांतून पाण्याचा विसर्ग वाढविल्याने सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणाच्या पाणी पातळीत हळूहळू वाढ होऊ लागली आहे.
Ujani Dam
Ujani DamAgrowon

Latest Agriculture News : पुणे जिल्ह्यातील धरणांतून पाण्याचा विसर्ग वाढविल्याने सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणाच्या पाणी पातळीत हळूहळू वाढ होऊ लागली आहे. सोमवारी (ता. ११) धरणातील पाणीपातळी २१.१ टक्क्यांवर पोचली.

तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जायकवाडी प्रकल्पात गत दोन दिवसापासून पाण्याची आवक वाढली असून पाणीसाठा ३४ टक्क्यांवर पोहोचला आहे. दोनही धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

यंदा पावसाचे सव्वातीन महिने उलटत आले, तरी अद्यापही जिल्ह्यात दमदार पाऊस झालेला नाही. काही भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला, पण तो सरसकट झाला नाही. उजनी धरणाच्या क्षेत्रात तर पाऊसच झाला नाही. पण धरणाच्या वरच्या बाजूला असलेल्या पुणे जिल्ह्यातील धरणक्षेत्रात गेल्या आठवड्यात चांगला पाऊस झाल्याने तिकडून उजनी धरणाकडे पाण्याचा विसर्ग सोडण्यास सुरुवात झाली आहे.

त्यामुळे चार दिवसांपूर्वी १८ टक्क्यांवर असणारी धरणातील पाणीपातळी तीन दिवसांतच ३ टक्क्यांनी वाढली आहे. सोमवारी (ता. ११) पुणे जिल्ह्याकडील धरणांतून उजनीकडे १० हजार ९०५ क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत होता. त्यामुळे पाण्याची एकूण पाणीपातळी ४९२.५३५ मीटरपर्यंत पोचली. तसेच एकूण पाणीसाठा ७४.९२ टीएमसी आणि उपयुक्त साठा ११.२६ टीएमसी एवढा राहिला. तर या पाण्याची टक्केवारी २१.१ पर्यंत पोचली.

Ujani Dam
Marathawada Rain Update : दुसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम

सोमवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास जायकवाडी प्रकल्पात १३ हजार ७८ क्युसेकने २४ तासांपासून पाण्याची आवक सुरू होती, अशी माहिती प्रकल्प प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. तसेच जायकवाडी प्रकल्पात सद्यःस्थितीत ३४.२८ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी आजच्याच दिवशी जायकवाडी प्रकल्पात ९६.८६ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता.

यंदा प्रकल्पाच्या उर्ध्वभागात तसेच धरणक्षेत्रात पाऊस न पडल्याने पाण्याची आवक अपेक्षित झाली नाही. त्याचा थेट परिणाम प्रकल्पाच्या पाणी साठ्यावर झालेला दिसतो आहे. या प्रकल्पातून एक सप्टेंबरपासून डाव्या कालव्यातून व त्यानंतर काही दिवसांत उजव्या कालव्यातून सिंचनासाठी पाण्याचे आवर्तन सुरू करण्यात आले. या आवर्तनातून छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी या जिल्ह्यांसह बीड जिल्ह्यांतील शेती सिंचनासाठी उपयोग होणे अपेक्षित आहे.

Ujani Dam
Ujani Dam : उजनी धरणाच्या पाणी पातळीत किंचित वाढ

दरम्यान सोमवारी सकाळच्या सुमारास जायकवाडीच्या उजव्या कालव्यातून ७२१ तर डाव्या कालव्यातून ३०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू होता. दुसरीकडे १३ हजार ७८ क्युसेकने पाण्याची आवकही प्रकल्पात सुरू होती. साधारणतः ९ सप्टेंबरपासून ही आवक सुरू आहे. ९ सप्टेंबरला २७३३ क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती.

१० सप्टेंबरला ही आवक सकाळी ६ वाजता ५०३३ क्युसेक तर सायंकाळी सहा वाजता १५९२५ क्युसेकवर पोहोचली होती. सोमवारी सकाळी सहा वाजता ती १३०७८ क्युसेकवर आली. प्रकल्प प्रशासनाच्या माहितीनुसार एक जून २०२३ पासून आतापर्यंत प्रकल्पात ३०४. ७१ दलघमी म्हणजे १०.७६ टीएमसी पाण्याची आवक झाली. तर एक जून पासून आतापर्यंत १०४१ दलघमी पाण्याचा विसर्ग करावा लागला.

उजनीचे पाणी पिण्यासाठी राखीव

पावसाने पाठ फिरवल्याने खरीप पिके जवळपास हातची गेल्यासारखी स्थिती आहे. शिवाय उजनी धरणातील पाणीही मिळू शकत नाही. त्यामुळे शेतीची अवस्था बिकट झाली आहे. उजनी धरणावर सोलापूर, पंढरपूरसह १२५ हून अधिक गावांच्या पिण्याच्या पाणी योजना अवलंबून आहेत. पण पाऊस आणि उपलब्ध पाण्याची स्थिती विचारात घेऊन सद्यःस्थितीत धरणातील पाणी केवळ पिण्यासाठी म्हणून राखीव ठेवण्यात आले आहे. त्या परिस्थितीत पुण्याकडून येणाऱ्या पाण्याचा विसर्ग सोलापूरकरांना दिलासा देणारा आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com