
पुणे ः राज्यातील पहिली ‘अॅग्रोवन शेतकरी उत्पादक कंपनी महापरिषद’ (Agrowon FPC Mahaparishad) (एफपीसी लिडरशीप कॉन्क्लेव्ह) आज (ता. २) पुण्यात होत असून त्यासाठी निवडक कंपन्यांचे शेतकरी प्रतिनिधी शहरात दाखल होत आहेत. केंद्रीय रस्ते, परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या हस्ते उद्घाटन होत असलेल्या या महापरिषदेतील मंथनामुळे ‘एफपीसी’ चळवळीला (FPC Movement) नवी दिशा मिळण्याचे संकेत आहेत.
श्री. गडकरी यांनी शेतीतील समूहशक्तीच्या बळकटीकरणाला पूर्वीपासून प्रोत्साहन दिले आहे. आजच्या महापरिषदेतील आघाडीच्या शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या निमंत्रित प्रतिनिधींसमोर ते काय भूमिका मांडतात, याविषयी उत्सुकता आहे. पारादीप फॉस्फेट्स लिमिटेड हे या उपक्रमाचे टायटल स्पॉन्सरर तर पॉवर्ड बाय म्हणून इस्राईल केमिकल्स लिमिटेड सहभागी होत आहे. तसेच, वर्डेशियन, बँक ऑफ महाराष्ट्र, स्मार्टकेम टेक्नॉलॉजीज लिमिटेड, फिनोलेक्स प्लासॉन इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड आणि राष्ट्रीय केमिकल्स अॅड फर्टिलाइजर्स लिमिटेड या नामांकित संस्था या महापरिषदेच्या सहप्रायोजक आहेत.
या चळवळीत देशात आघाडीवर असलेल्या सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीचे अध्यक्ष विलास शिंदे, नॅचरल शुगर्स लिमिटेडचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांच्यासह विविध तज्ज्ञांचे मार्गदर्शन महापरिषदेचे वैशिष्ट्य असेल. दिवसभराच्या भरगच्च कार्यक्रमांत कृषिमाल निर्यातीबरोबरच राज्यातील सहकार, कृषीनिविष्ठा, सिंचन व वित्तविषयक सेवांबाबत नामांकित तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. ‘एफपीसीं’मधील नेतृत्वाचा विकास, व्यवसाय व बाजारपेठांमधील आव्हानांवर विविध तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि त्याचबरोबर फळे-भाजीपाल्यासह, धान्ये, प्रक्रियायुक्त पदार्थांच्या ऑनलाइन सुविधा क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून अपेक्षित असलेल्या सहकार्याबद्दल माहिती देतील. राज्यातील ‘एफपीसी’ क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांचे प्रतिनिधी आणि कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारीदेखील आपली भूमिका मांडतील.
‘ॲग्रोवन’चे नवे व्यासपीठ
‘सकाळ अॅग्रोवन’ने ‘सरपंच महापरिषद’ ही संकल्पना यशस्वीरित्या अनेक वर्षांपासून सुरू ठेवली आहे. त्यापाठोपाठ आता ‘अॅग्रोवन शेतकरी उत्पादक कंपनी महापरिषद’ हा अनोखा उपक्रम नव्याने सुरू होतो आहे. राज्यातील कृषी विभाग, निविष्ठा उद्योगातील कंपन्या, शेती व सहकारी क्षेत्रातील संस्थांनी ‘ॲग्रोवन’च्या या नव्या व्यासपीठाचे स्वागत केले आहे. यामुळे शेतकरी उत्पादक कंपन्यांना संधींचे नवे द्वार खुले होणार आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.