Gujarat Monsoon Update : गुजरातला रविवारपासून (ता. १७) कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने तडाखा दिला असून राज्यातील बडोदा, भरूच, नर्मदा, दाहोड, पंचमहाल, गांधीनगर आदी जिल्ह्यांतील सुमारे ११,९०० नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले. त्याचप्रमाणे, २७० नागरिकांचीही सुटका केली.
मुसळधार पावसामुळे रस्त्यावर कोसळलेले वृक्ष काढून रस्ता साफ करण्यात येत असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिली. राज्यातील २९ तालुक्यांत सोमवारी (ता. १८) सकाळी सहा ते दुपारी दोन दरम्यान ४० मिमी पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली.
दरम्यान, पावसामुळे सरदार सरोवर धरणातून सोडण्यात येणाऱ्या मोठ्या विसर्गामुळे नर्मदा नदीने भरूच जिल्ह्यात धोक्याची पातळी ओलांडली आहे. नदीची धोक्याची पातळी २८ फूट असून अंकलेश्वरला भरूचशी जोडणाऱ्या गोल्डन ब्रिजजवळ नर्मदा नदी सुमारे ३७.७२ फुटांवरून वाहत आहे.
नदीने रविवारी ४० फुटांपेक्षा अधिक पातळीवरून वाहत होती. गेल्या दोन दिवसांत नदीच्या काठावर राहणाऱ्या सहा हजारांहून अधिक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. भरूच शहरासह जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत सोमवारपासून पाणीपातळी ओसरू लागली असली तरी अजूनही गुडघाभर पाणी आहे. मात्र, पाणीपातळी ओसरू लागल्याने परिस्थितीत सुधारणा होत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
दरम्यान, राज्यात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पार्श्वभूमीवर भूपेंद्र पटेल संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सातत्याने संपर्कात आहेत. ते म्हणाले, की राज्यात ‘एनडीआरएफ’ आणि ‘एसडीआरएफ’च्या दहा तुकड्यांच्या मदतीने मदत व बचावकार्य राबविण्यात येत आहे.
बडोदा, भरूच, दाहोड, गांधीनगर आदी जिल्ह्यांतील सुमारे ११,९०० नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे, विविध ठिकाणी अडकलेल्या २७० जणांची प्रशासनाने सुखरूप सुटका केली. रस्त्यांवर कोसळलेली झाडे काढून रस्ता मोकळा करण्याचे काम सुरू आहे. बडोदा जिल्ह्यात नर्मदा नदीतील छोट्या बेटावर अडकलेल्या १२ जणांची लष्कराने ४८ तासांच्या मोहिमेनंतर सुटका केली.
अतिवृष्टीची ठिकाणे
विसावादार (जि.जुनागढ) : २८३ मि.मी.
मेंदरडा (जि.जुनागढ) : १६५ मि.मी.
राधनपूर (जि.पाटण) : १५६ मि.मी.
भाभर (जि.बनासकांठा) : १४४ मि.मी.
वंथाली (जि.जुनागढ) : १२९ मि.मी.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.