
Ratnagiri News : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात शुक्रवारी (ता. ८) पावसाने जोरदार हजेरी लावली. दुपारपर्यंत पडलेल्या पावसामुळे होरपळलेली भातशेती हिरवी झाली असून शिवारात पाणी साचले आहे. उन्हाच्या कडाक्यात भात करपून जाण्याच्या भीतीने त्रस्त झालेल्या बळीराजाला दिलासा मिळाला.
ऑगस्टच्या दुसऱ्या पंधरवड्यानंतर पावसाने विश्रांती घेतली होती. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातही एखादी सर पडून जात होती. १ सप्टेंबरला तर पाऊसच झाला नव्हता. दिवसभर पडणाऱ्या कडकडीत उन्हामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील भातेशतीवर मोठा परिणाम झाला असून उत्पादन घटण्याची भीती व्यक्त केली जाऊ लागली.
याचा सर्वाधिक फटका कातळावरील दहा ते बारा हजार हेक्टर क्षेत्राला बसला आहे. अनेक ठिकाणी शेते पिवळी पडली असून शेंडे करपून गेले होते. बळीराजाला पावसाची प्रतीक्षा होती. अनेकांनी डोक्याला हात लावला होता. रत्नागिरी जिल्ह्यात भातशेतीवर उदरनिर्वाह अवलंबून नसला तरीही वर्षभरातील तांदळाची गरज भातशेतीमधूनच पूर्ण केली जाते. उर्वरित तांदूळ किंवा भात हे खरेदी-विक्री संघाला दिले जाते.
तसेच काही शेतकरी गावठी तांदूळ मुंबई-पुण्यात विक्री करतात. वातावरणातील या बदलांनी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे गणितचे बदलून गेले होते; मात्र गुरुवारी रात्रीपासूनच ढगाळ वातावरण आणि हलके वारे समुद्र किनारी भागात वाहत होते. काही महसूली मंडलांत हलका पाऊसही झाला. परंतु त्यामध्ये जोर नव्हता.
शुक्रवारी (ता. ८) पहाटेपासून जोरदार सरी कोसळू लागल्या. सर्वत्र पावसाची नोंद झाली असून गेल्या आठ दिवसांनंतर जिल्ह्यात दोन अंकी सरासरी पाऊस नोंदला गेला आहे. या पावसामुळे बळीराजा सुखावला आहे.
याबाबत पावस येथील शेतकरी चंद्राकंत शेडगे म्हणाले, की या पावसामुळे दिलासा मिळाला असला तरीही पुढे सलग पाऊस पडला पाहीजे. शुक्रवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत सरासरी ३८.६७ मिमी पाऊस झाला. त्यात मंडगणड ५०, दापोली ७५, खेड २६, गुहागर ६८, चिपळूण ४०, संगमेश्वर ६, रत्नागिरी २३, लांजा ३३, राजापूर २५ मिमी नोंद झाली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.